पक्षप्रमुखांचे आदेश डावलून शिवसेनेने बदलला सभागृहनेता

पक्षप्रमुखांचे आदेश डावलून शिवसेनेने बदलला सभागृहनेता

औरंगाबाद - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापालिकेतील सभागृहनेत्याच्या विषयावर डिसेंबरमध्ये निर्णय घेऊ, असे सांगून चोवीस तास उलटत नाहीत; तोच मंगळवारी (ता.३१) सकाळी महापौर नंदकुमार घोडेले यांनी सभागृहनेता बदलण्यात येत असल्याचे पत्र आयुक्तांना गुपचूप दिले. त्यानंतर त्यांनी दुपारी याबाबत प्रसिद्धी माध्यमांना माहिती दिली. गजानन मनगटे यांना केवळ दहा महिन्यांत या पदावरून दूर करण्यात आले असून त्यांच्या जागेवर आता विकास जैन यांची वर्णी लागली आहे. शिवसेनेत अचानक घडलेल्या या ‘घडामोडी’मागे कोण? असा प्रश्‍न  उपस्थित केला जात आहे.

शिवसेनेचे अनुभवी नगरसेवक श्री. घोडेले यांनी रविवारी (ता.२९) झालेल्या महापौर निवडणुकीत दणदणीत विजय मिळविला. त्यानंतर सोमवारी (ता.३०) त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मुंबईत ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन आशीर्वाद घेतले. यावेळी श्री. ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांसोबत अर्धा तास चर्चाही केली. त्यात डिसेंबर महिन्यात सभागृहनेत्याचे एक वर्षे संपत असल्याचा विषय मांडण्यात आला. त्यावर त्यांनी पाहू डिसेंबर महिन्यात, अशा सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्याला चोवीस तास उलटत नाहीत तोच सकाळी ११ वाजता नवनिर्वाचित महापौर नंदकुमार घोडेले यांनी आयुक्तांना पत्र देऊन श्री. मनगटे यांच्या जागेवर आता सभागृहनेता म्हणून श्री. जैन यांची निवड करण्यात येत असल्याचे नमूद केले होते. संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांच्या सूचनेनुसार हा बदल करण्यात येत असल्याचे त्यात म्हटले आहे. विशेष म्हणजे हे पत्र देईपर्यंत श्री. मनगटे यांना कसलीच कल्पना नव्हती. नेहमीप्रमाणे ते आपल्या दालनात येऊन बसले. काही वेळानंतर त्यांनाही कुणकूण लागली, त्यानंतर ते महापालिकेतून निघून गेले. यासंदर्भात जिल्हा प्रमुखांसह इतर पदाधिकाऱ्यांना देखील कल्पना नव्हती. मात्र, दुपारी श्री. घोडेले यांनी पक्षाच्या आदेशानुसार सभागृहनेता बदलण्यात आल्याचे प्रसिद्धी माध्यमांना सांगितले. 

अनेकांचा होता दावा 
शिवसेनेचे महापालिकेत २८ नगरसेवक असून, अडीच वर्षाचा कालावधी उलटला असला तरी अनेकांना पदे मिळालेली नाहीत. त्यामुळे सभागृनेतेपदी वर्णी लावण्यासाठी अनेकजण इच्छुक होते; मात्र महापौरपद दोन वेळा, सभापतीपद उपभोगलेल्या श्री. जैन यांची सभागृह नेतेपदी वर्णी लागल्याने नव्या नगरसेवकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

‘घडामोडीं’मागे कोण? 
सभागृहनेता निवडताना यंदा प्रथमच शिवसेनेने परंपरेला फाटा दिला आहे. पक्षाचे प्रमुख नेते महापालिकेत येऊन महापौरांना पत्र देऊन संबंधित नगरसेवकाची निवड करीत. त्यानंतर पदभार दिला जायचा; मात्र यावेळी गुपचूप पत्र देण्यात आल्यामुळे या ‘घडामोडी’मागचा सूत्रधार कोण? अशी चर्चा महापालिकेत सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com