महापौर निवडणूक; शिवसेनेचे आणखी एक पाऊल पुढे 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - महापौरपदाची निवडणूक अवघ्या आठ दिवसांवर आली असून, शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महापौरपदासाठी उमेदवार जाहीर करून आघाडी घेतलेल्या शिवसेनेने आणखी एक पाऊल पुढे टाकत अपक्षांचा एक गट सहलीवर पाठविला आहे. त्यात दहा ते बारा नगरसेवकांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेनेच्या या खेळीने भाजपवरील दबाव वाढला असून, आमचा निर्णय 25 ऑक्‍टोबरपर्यंत होईल, असे प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी सांगितले. 

औरंगाबाद - महापौरपदाची निवडणूक अवघ्या आठ दिवसांवर आली असून, शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महापौरपदासाठी उमेदवार जाहीर करून आघाडी घेतलेल्या शिवसेनेने आणखी एक पाऊल पुढे टाकत अपक्षांचा एक गट सहलीवर पाठविला आहे. त्यात दहा ते बारा नगरसेवकांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेनेच्या या खेळीने भाजपवरील दबाव वाढला असून, आमचा निर्णय 25 ऑक्‍टोबरपर्यंत होईल, असे प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी सांगितले. 

विद्यमान महापौर भगवान घडामोडे व उपमहापौर स्मिता घोगरे यांचा कार्यकाळ 28 ऑक्‍टोबरला संपणार आहे. त्यामुळे आगामी महापौर, उपमहापौर निवडीसाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. रविवारी (ता. 29) विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिकेत शिवसेना-भाजप युतीची सत्ता असून, युतीच्या करारनाम्यानुसार आगामी अडीच वर्षांसाठी महापौरपद शिवसेनेकडे राहणार आहे; मात्र युतीमध्ये वाढलेल्या कुरबुरी व भाजपला मिळणारा प्रतिसाद पाहता पक्षाचा महापौर होऊ शकतो, असे भाजप पदाधिकारी व नगरसेवकांचे म्हणने आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात महापौर निवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या सूचना केल्या असल्या तरी अद्याप स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विषय सोडलेला नाही. नुकत्याच झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत पक्षानेच काय तो निर्णय घ्यावा, असे पदाधिकाऱ्यांनी पक्ष निरीक्षकांना सांगितले होते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीदेखील चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट केले.

या भाजपच्या अनिश्‍चिततेच्या पार्श्‍वभूमीवर दुसरीकडे शिवसेनेनेदेखील ऐनवेळी दगाफटका होऊ नये म्हणून खेळी खेळण्यास सुरवात केली आहे. तीन दिवसांपूर्वीच पालकमंत्री रामदास कदम यांनी अपक्ष नगरसेवकांसह इतर पक्षांच्या सुमारे पंधरा ते वीस नगरसेवकांची भेट घेतली होती. त्यात या नगरसेवकांनी शिवसेनेला साथ देण्याचा शब्द श्री. कदम यांना दिला होता. महापौरपदासाठी अनुभवी नगरसेवक नंदकुमार घोडेले यांचे नाव जाहीर करून एक पाऊल पुढे टाकणाऱ्या शिवसेनेने ऐन दिवाळीच्या सणात दहा ते बारा अपक्ष नगरसेवकांना सहलीवर पाठविले आहे. शिवसेनेचे 28 नगरसेवकदेखील येत्या चार दिवसांत सहलीवर जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

लवकरच निर्णय होणार 
स्वबळावर महापौर करून शिवसेनेला धक्का देण्याची तयारी करणाऱ्या भाजपमध्ये अद्याप उमेदवारावरही एकमत होत नसल्याचे चित्र आहे. युतीसंदर्भात प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, महापौर निवडणुकीसंदर्भात निर्णय घेण्याच्या सूचना प्रदेशाध्यक्षांनी दिल्या आहेत. कोअर कमिटीच्या तीन बैठकाही झाल्या. 25 ऑक्‍टोबरपासून अर्ज भरण्यास सुरवात होणार आहे. तोपर्यंत पक्षाचा निर्णय होईल. वरिष्ठ नेत्यांसोबत आमची बोलणी सुरू आहे.

Web Title: aurangabad news shiv sena amc