स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी करणार सीईओंची नियुक्ती 

स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी करणार सीईओंची नियुक्ती 

औरंगाबाद - स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचा विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त करण्यासह, पाच शहर बस खरेदी, क्रांती चौक ते रेल्वेस्टेशन रस्ता स्मार्ट रस्ता म्हणून विकसित करणे आणि सोलर सिटीसाठी ५३ लाख रुपये खर्चाच्या प्रस्तावाला गुरुवारी (ता. ३०) झालेल्या स्मार्ट सिटीच्या विशेष उद्देश वहन (एसपीव्ही) कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. जानेवारीपासून शहर बस सुरू करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती एसपीव्हीचे चेअरमन तथा राज्याचे अप्पर मुख्य सचिव सुनील पोरवाल यांनी या वेळी दिली. 

स्मार्ट सिटीची बैठक श्री. पोरवाल यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात घेण्यात आली. बैठकीला एसपीव्हीचे स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्त करण्यात आलेले भास्कर मुंडे, महापौर नंदकुमार घोडेले, सभापती गजानन बारवाल, विरोधी पक्षनेता फेरोज खान, नगरसेवक प्रमोद राठोड, भाऊसाहेब जगताप, प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. सुमारे साडेतीन तास चाललेल्या या बैठकीत स्मार्ट सिटीतील प्रस्तावित विविध प्रकल्पांवर चर्चा झाली. श्री. पोरवाल यांनी सुरवातीपासून आढावा घेतला. पीएमसी असलेल्या सीएचटूएम कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पातील ग्रीनफिल्ड व पॅनसिटीतील प्रस्तावित प्रकल्पांची माहिती दिली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना श्री. पोरवाल म्हणाले, ‘‘स्मार्ट सिटीच्या कामाला गती देण्यासाठी इतर शहरांप्रमाणे स्वतंत्र सीईओ नियुक्त करण्यात येणार आहे. उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी शासनाकडून घेण्यात येणार आहे. त्यांच्यासोबत स्वतंत्र संचालक म्हणून भास्कर मुंडे हे काम पाहणार आहेत. स्वतंत्र सीईओ नेमल्यानंतर महत्त्वपूर्ण निर्णयांसाठीच माझ्याकडे या,’’ अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. 

ग्रीनफिल्डला पदाधिकाऱ्यांचा विरोध 
बैठकीत महापालिका पदाधिकाऱ्यांनी ‘ग्रीनफिल्ड’ला विरोध केला. शहराची सध्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. हजारो पर्यटक येतात. ते रस्त्यांवर पडलेले खड्डे पाहून जगभर शहराची बदनामी करतात. त्यामुळे पॅनसिटीला आधी महत्त्व देऊन त्यासाठी काय करता येईल ते पाहा, अशी मागणी महापौरांसह इतर पदाधिकाऱ्यांनी केली. ग्रीनफिल्डलाच  अधिक पैसे ठेवण्यात आल्याचा आक्षेपदेखील या वेळी घेण्यात आला; मात्र शासनाने ठरवून दिलेल्या धोरणानुसार आपल्याला जावे लागणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिस आयुक्तांनीदेखील शहराची डर्टी अवस्था बदलण्याची गरज व्यक्त केली. 

वायफाय सेवा, सीसीटीव्ही प्रकल्पांवर होणार काम
पहिल्या टप्प्यात शहरात पॅनसिटीतून विविध प्रकल्पांचे काम सुरू करण्यावर बैठकीत शिक्कामोर्तब झाले. स्मार्ट ट्रान्सपोर्टिंगअंतर्गत शहरात विविध ठिकाणी वायफाय सेवा, सीसीटीव्ही, सोलर व सिग्नल सिस्टिम विकसित केली जाणार आहे. त्यासाठी पुढील बैठकांमध्ये निर्णय होऊ शकतो. 

स्मार्ट रस्त्याचे रूप बदलणार 
महापालिकेने क्रांती चौक ते रेल्वेस्टेशन हा रस्ता सुमारे तीस कोटी रुपये खर्च करून सिमेंट क्राँक्रिटचा केला आहे. या रस्त्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे. आता हा रस्ता स्मार्ट रस्ता म्हणून विकसित केला जाणार आहे. त्यात रस्त्यांच्या दुतर्फा सौंदर्यीकरण करणे व इतर कामांचा समावेश राहणार आहे. 

गरज दीडशे बसची, घेणार पन्नास 
शहराची लोकसंख्या लक्षात घेता दीडशे बसची गरज आहे; मात्र स्मार्ट सिटी योजनेत महापालिका ५० बस खरेदी करणार आहे. जानेवारीपासून शहर बस सुरू करण्याचा प्रयत्न राहणार आहे. सध्या पाच बस खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या बस सध्या एसटी महामंडळाला देण्यात येतील. त्यानंतर खासगी एजन्सीची नियुक्ती करून महापालिका टप्प्याटप्प्याने बसची संख्या वाढवून शहर बस सुरू करेल. बंगळूर शहराच्या धर्तीवर शहर बसचा प्रोजेक्‍ट राहणार आहे. 

महापालिका इमारतींवर सोलर 
महापालिकेचा केंद्र शासनाच्या सोलर सिटी योजनेत समावेश करण्यात आला होता; मात्र त्यासाठी अद्याप निधी मिळालेला नाही. असे असले तरी स्मार्ट सिटीतून सोलरसाठी ५३ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. महापालिका इमारतींवर आता सोलर पॅनेल बसणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com