स्मार्ट सिटीच्या कामांची दीड वर्षानंतरही प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

औरंगाबाद - केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत औरंगाबाद शहराचा समावेश होऊन दीड वर्ष उलटले असले तरी कामे अद्याप आराखड्यामध्येच अडकलेली आहेत. निधी खर्च होत नसल्याने केंद्र शासनाने नुकतीच नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर महापालिका पदाधिकाऱ्यांनी कामांना गती देण्यासाठी पुढाकार घेतला असून, आता प्रत्येक आठवड्यात बुधवारी स्मार्ट सिटीसाठी बैठक घेतली जाणार आहे. 

महापौर नंदकुमार घोडेले यांनी गुरुवारी (ता. चार) महापौर बंगल्यावर बैठका घेतल्या. यात स्मार्ट सिटीच्या कामाचाही आढावा घेण्यात आला. या वेळी स्मार्ट सिटीसाठी पीएमसी (प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार) म्हणून नियुक्त केलेल्या सीएचटूएमचे प्रतिनिधी उपस्थित होते. आतापर्यंत पीएमसीने काय नियोजन केले आहे, याची माहिती महापौरांनी घेतली. याबाबत महापौर म्हणाले, पीएमसीचे केवळ नियोजन सुरू आहे. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अद्याप कागदावरच आहे. इतर प्रकल्पही सुरू झालेले नाहीत. त्यामुळे कामांना गती देण्यासाठी यापुढे प्रत्येक बुधवारी एसपीव्हीच्या संचालक मंडळाची आढावा बैठक घेतली जाणार आहे. 

शहर बससाठी दिली तंबी  
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी २३ जानेवारीला शहर बस सुरू करण्याचा संकल्प महापौरांनी केला आहे. त्यासाठी काहीही करा, मात्र बस खरेदी झाल्याच पाहिजेत, अशी तंबी यावेळी देण्यात आली.

एलईडी प्रकल्पाचे तळ्यात - मळ्यात 
महापालिकेसाठी डोईजड ठरलेला १२० कोटींचा एलईडी पथदिव्यांचा प्रकल्प स्मार्ट सिटीतून राबविण्यासाठी प्रशासन, पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, एसपीव्हीचे सीईओ सुनील पोरवाल यांनी नवे प्रकल्पच स्मार्ट सिटीतून करता येतील, असे सांगून एलईडीला नकार दिला. त्यामुळे एलईडी प्रकल्प अद्याप अधांतरी आहे.  

Web Title: aurangabad news smart city work