सोशल मीडियावर हाक मी निघालोय, तुम्हीही या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - मराठा क्रांती महामोर्चात यावचं लागतंय, माझ्या भविष्यासाठी सहभागी व्हा, ताकद दाखवावीच लागतीय, आता लढायचं, अशा विविध लक्षवेधी टॅगलाईन देत सोशल मीडियावर आठवडाभरापासून जोरदार जागरुकता निर्माण करण्याचे मराठा बांधव करीत आहेत. त्यास जोरदार प्रतिसादही मिळत आहे.

औरंगाबाद - मराठा क्रांती महामोर्चात यावचं लागतंय, माझ्या भविष्यासाठी सहभागी व्हा, ताकद दाखवावीच लागतीय, आता लढायचं, अशा विविध लक्षवेधी टॅगलाईन देत सोशल मीडियावर आठवडाभरापासून जोरदार जागरुकता निर्माण करण्याचे मराठा बांधव करीत आहेत. त्यास जोरदार प्रतिसादही मिळत आहे.

मराठा क्रांती मोर्चाची सुरवातच मुळात गेल्यावर्षी क्रांतिदिनी झाली आणि पुन्हा एक वर्षानंतर त्याच दिवशी मुंबईतील महामोर्चा होत आहे. त्यामुळे समाजाने त्याच जोमाने तयारी केली आहे. राज्यासह देश, विदेशात मोठ्या संख्येनी; पण शिस्त, संयम ठेवून मोर्चे काढूनही  सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे संताप व्यक्‍त केला जात असतानाच महामोर्चाची हाक देण्यात आली आहे. या मोर्चाची दोन महिन्यांपासून तयारी सुरू आहे. बैठका, जनजागरणपर कार्यक्रम घेत वातावरण निर्माण करण्यात आले आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावरूनही सतत एकच चर्चा, मराठा क्रांती मोर्चा, अशा प्रकारच्या मजकुरासोबतच छायाचित्राद्वारे जनजागृती करण्याचे काम सुरू आहे. 
विशेष म्हणजे, शेतकरीही मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. त्यामुळे मोर्चाला आणखी धार चढत आहे. 

मराठा समाजाचे ‘मराठा क्रांती मोर्चा’, यावंच लागतयं, खूप झालं इतरांसाठी आता समाजासाठी, ‘सकल मराठा समाज’, ‘फक्त मराठा’, ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘नऊ ऑगस्ट क्रांती महामोर्चा’ आदी नावांनी सोशल मीडियावर ग्रुप तयार करण्यात आले आहेत. ग्रुपद्वारे मोर्चात सहभागी होण्यासाठी समाजाला हाक दिली जात आहे. ‘अभी नहीं तो कभी नहीं’ शासनाकडे आरक्षण मागून मिळत नाही, त्यामुळे मोर्चे काढून आरक्षण मिळवायचेच, ऊठ मराठा जागा हो, मोर्चाचा धागा हो, असे संदेश फिरत आहेत. एका भागात झालेल्या बैठकांची माहिती दुसऱ्या भागात पोचताच, तेथेही कामाला सुरवात होईल, अशा पद्धतीने वातावरणनिर्मिती करण्यात आली आहे.  

पहिला मराठा क्रांती मोर्चा काढण्यात आल्यानंतर सोशल मीडियावर काही मंडळींकडून बनावट नावाने टीका टिप्पणी केली होती. मात्र, त्यावेळीही त्यांना योग्य उत्तर देण्याचे काम समाजातील तरुणांनी केले. महिनाभरापासून व्हॉट्‌सॲपसह फेसबुक, ट्विटर, इन्स्ट्राग्राम यांसारख्या सोशल साईट्‌सवरून जागरुकता केली जात असताना कुणीही यावर टिप्पणी केली नाही.

काळे टी-शर्ट, टोपी अन्‌ भगवे झेंडे
अंगावरील कापडावरूनही निषेधाचे संकेत मिळावेत, यासाठी पहिल्या मोर्चापासून सुरवात करण्यात आलेले पुरुषांच्या अंगावर काळे टी-शर्ट, तर महिलांच्या अंगावर काळ्या रंगाच्या साड्या, असा ड्रेसकोड या महामोर्चातही असणार आहे. शहर, जिल्ह्यात २५ हजारांहून अधिक टी-शर्ट, मराठा क्रांती मोर्चा असे लिहिलेल्या टोप्या, वाहनांवर स्टिकर्स आणि भगवे झेंडे यांचे वाटप करण्यात आले आहे. शिवाय बहुतांश जणांनी काळ्या रंगाचे ड्रेस खरेदी केले आहेत. कधी नव्हे, असे नियोजन करण्यात आले असून व्हॉटस्‌ॲपच्या माध्यमातून विविध सूचना दिल्या जात आहेत. कधीही सामाजिक कार्यात सहभागी न होणाऱ्या महिला क्रांती मोर्चाच्या माध्यमातून पुढे आल्या आहेत. त्यामुळे महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात जागरुकता निर्माण झाल्याने महाविद्यालयीन युवतींचा सहभागही लक्षवेधी असेल, असे चित्र बघावयास मिळत आहे. विविध क्षेत्रांत पुरुषांच्या खांद्याला खाद्या लावून महिला काम करीत असल्याची चर्चा होते. मोर्चातही पुरुषांबरोबरच महिलाही मोठ्या संख्येने सहभागी होतील, असे महिला समन्वयकांनी सांगितले.

एसटी, रेल्वे प्रशासन सज्ज 
मराठा क्रांती मोर्चात जिल्ह्यातील जास्तीत-जास्त समाज बांधव सहभागी व्हावेत यासाठी गावपातळीपासून ते शहरापर्यंत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यामतून आवाहन करण्यात येत आहे. यासाठी खासगी बसगाड्या, खासगी बसचेही नियोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयीन तरुणांनी गट करून चारचाकींनी मुंबईला जाण्याचे नियोजन केले आहे. ज्यांच्याकडे चारचाकी आहे त्यांना आवाहन करून त्यांची गाडी घेऊन जाण्याचे नियोजन केले जात आहे. मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी रविवारपासून मराठवाड्यातून असंख्य कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. सोमवारी सकाळी विविध मराठा संघटना, तसेच  समाजातील कार्यकर्तेही मुंबईकडे पार्किंग व इतर नियोजनासाठी रवाना झालेत. मराठवाड्यातून रेल्वेने जवळपास २० हजारांहून अधिकजण जाणार आहेत. याचपद्धतीने नियोजनही तालुका पातळीवरून करण्यात आले आहे. ही संख्या वाढल्यास रेल्वेचे डब्बे वाढविण्याची तयारी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातर्फे करण्यात आली आहे. एसटीनेही प्रत्येक डेपोतून किमान तीन ते चार बस जादा सोडण्याची तयारी केली आहेत. खासगी ट्रॅव्हल्स चालकांनीही इतर मार्गावर ट्रॅव्हल्स मुंबईकडे पाठविणार आहेत. यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहेत.

Web Title: aurangabad news social media maratha kranti mahamorcha