औरंगाबाद-धुळे एसटीच्या मार्गात बदल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - संततधार पावसाने चाळीसगाव घाटात रस्ता खचला. त्यामुळे या रस्त्यावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे. परिणामी राज्य परिवहन महामंडळाने घाटमार्गे औरंगाबाद-धुळे जाणाऱ्या बसगाड्या बंद केल्या आहेत. त्याऐवजी न्यायडोंगरी मार्गे गाड्या सुरू केल्या आहेत, मात्र अंतर वाढल्याने प्रवाशांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. 

कन्नड-चाळीसगाव घाटातून राष्ट्रीय महामार्ग धुळे- सोलापूर क्र. २११ हा गेलेला आहे. या रस्त्यावर औरंगाबादहून चाळीसगाव, धुळे, जळगाव जिल्ह्यात जाण्यासाठी वाहनांची मोठी वर्दळ असते. मागील आठवड्यात जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. त्यामुळे चाळीसगाव घाटातील म्हसोबा देवालयाजवळचा पूल खचला आहे. त्यामुळे रस्ता बंद करण्यात आल्याने जड वाहने, ट्रक, खासगी बससह महामंडळाचीही बससेवा वळविण्यात आली. एसटी महामंडळाची औरंगाबाद-धुळे विनावाहक बससेवा याच मार्गावरून धावते. मात्र शनिवारी (ता. २६) घाट मार्गे जाणाऱ्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आला. त्यानुसार औरंगाबाद, देवगाव रंगारी, न्यायडोंगरी, चाळीसगाव व धुळे असा तात्पुरता मार्ग निश्‍चित करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवास भाडे १६५ ऐवजी १९६ रुपये म्हणजे ३२ रुपये अधिकचे मोजावे लागत आहेत. 

चाळीसगाव घाटातील रस्ता खचला असल्याने रस्ता दुरुस्ती होईपर्यंत प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून महामंडळाने वाहतूक मार्गात बदल केला आहे. औरंगाबाद-धुळे मार्गे देवगाव रंगारी, न्यायडोंगरी, चाळीसगावसाठी प्रत्येक तासाला बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 
- संदीप रायलवार, विभागीय वाहतूक अधिकारी

Web Title: aurangabad news st bus