मराठवाड्यातील स्‍थानके गजबजली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - कर्मचाऱ्यांच्या संपामुळे चार दिवस थांबलेली ‘एस. टी.’ची चाके पाचव्या दिवशी शनिवारी (ता. २१) पहाटेपासून फिरू लागली. ऐन दिवाळीत प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आणि दुप्पट ते चौपट भाडे देऊन खासगी वाहनांकडून झालेली पिळवणूक सहन करावी लागली. कर्मचाऱ्यांनी संप मागे घेताच नित्य प्रवाशांसह भाऊबीजेनिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आणि मराठवाड्यातील बहुतांश स्थानके गजबजून गेली. संपकाळात हजारो फेऱ्या रद्द झाल्याने महामंडळाला कोट्यवधींचा फटका बसला.

औरंगाबाद - कर्मचाऱ्यांच्या संपामुळे चार दिवस थांबलेली ‘एस. टी.’ची चाके पाचव्या दिवशी शनिवारी (ता. २१) पहाटेपासून फिरू लागली. ऐन दिवाळीत प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आणि दुप्पट ते चौपट भाडे देऊन खासगी वाहनांकडून झालेली पिळवणूक सहन करावी लागली. कर्मचाऱ्यांनी संप मागे घेताच नित्य प्रवाशांसह भाऊबीजेनिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आणि मराठवाड्यातील बहुतांश स्थानके गजबजून गेली. संपकाळात हजारो फेऱ्या रद्द झाल्याने महामंडळाला कोट्यवधींचा फटका बसला.

संपकाळात बहुतांश आगारांत कर्मचाऱ्यांनी निदर्शने, निषेध, घोषणाबाजी, परिवहनमंत्र्यांच्या प्रतिमेची प्रतीकात्मक अंत्ययात्रा, मुंडण आदी आंदोलने करीत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले. बाहेरगावांहून आलेल्या आणि अडकलेल्या कर्मचाऱ्यांचे हाल झाले. स्थानिक कर्मचाऱ्यांसह अन्य काहींनी त्यांना मदतीचा हात दिला. पहाटेपासून एसटी वाहतूक सुरू झाली तरी वेळापत्रकाच्या तंतोतंत अंमलबजावणीसाठी अधिकाऱ्यांची दमछाक झाली. दुपार, सायंकाळनंतर बहुतांश आगारांनी वेळापत्रकात सुसूत्रता आणली.

एसटीच्या औरंगाबाद विभागातील बससेवा पहाटे चारपासून सुरू झाली. दरम्यान, संपामुळे औरंगाबाद विभागाचे अडीच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी संदीप रायलवार यांनी दिली. 

विभागात ५१० बस असून दररोज २ हजार ३५० फेऱ्या होतात. संपकाळात ९ हजार ४०० फेऱ्या रद्द झाल्या.  

दररोज सरासरी साठ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. त्यामुळे अडीच कोटींचे उत्पन्न बुडाले. आगारनिहाय नुकसान असे - औरंगाबाद आगार क्र. १ - ८० लाख, सिडको (क्र. २) - ३६ लाख, वैजापूर : २० ते २५ लाख, सोयगाव : १६ लाख, गंगापूर : २० ते २५ लाख, सिल्लोड : २० ते २५ लाख, कन्नड : २० ते २५ लाख, पैठण : २० ते २५ लाख. 

जालना विभागाला १ कोटी ४ लाखांना फटका
जालना : जालना विभागाला १ कोटी ४ लाख रुपयांचा फटका बसल्याची माहिती विभागीय कार्यालयातर्फे देण्यात आली. विभागातील अंबड, जालना, परतूर, जाफराबाद आगारांतून दरदिवशी २७० बसच्या ५९३ फेऱ्या होतात. २ हजार ३७२ फेऱ्या रद्द झाल्या.

सेवा सुरू, पूर्ववत व्हायला उशीर
बीड - जिल्ह्यात सकाळपासून बससेवा सुरू झाली. मात्र वेळापत्रकाची तंतोतंत अंमलबजावणी करण्यासाठी सायंकाळ झाली. जिल्ह्यातील ३२०० कर्मचारी संपात सहभागी होते. आठ आगारांद्वारे रोज ४५० बसच्या १००० फेऱ्यांतून ३६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. दिवाळीत हेच उत्पन्न रोज ४० लाखांच्या पुढे जाते. त्यामुळे महामंडळाचे पावणेदोन कोटीचे उत्पन्न बुडाले. 

लातूरमध्ये दिलासा
लातूर - जिल्ह्यात रोज ४५ लाख याप्रमाणे एक कोटी ३५ लाखांचे उत्पन्न बुडाल्याचे विभाग नियंत्रक लांडगे यांनी सांगितले. एकूण दोन हजार २९६ बसच्या फेऱ्या रद्द कराव्या लागल्याचे त्यांनी सांगितले. दिवाळी सुरू होण्यापूर्वी बंद झालेल्या बसगाड्या भाऊबीजेदिवशी सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला. 

सात हजारांवर फेऱ्या रद्द
उस्मानाबाद - उस्मानाबाद विभागाच्या सहाही आगारांतील जवळपास सात हजार १३० फेऱ्या रद्द झाल्या. त्यामुळे सुमारे सव्वादोन कोटींच्या उत्पन्नाला मुकावे लागले. 

नांदेड, परभणी विभाग
नांदेड - नांदेड विभागातून सुमारे चार हजार ९३६ फेऱ्या रद्द झाल्या आहेत. एकट्या नांदेड आगाराला दोन कोटींचा फटका बसला. हदगाव, भोकर, माहूर, देगलूर, मुखेड, कंधार, धर्माबाद, बिलोली, किनवट या मोठ्या आगारांचेही मोठे नुकसान झाले. आज दुपारपर्यंत नऊ आगारांतील बसच्या ४० ते ४५ फेऱ्या पूर्ण झाल्या होत्या. परभणी, हिंगोली एकच विभाग असून ३९६ बस रोज धावतात. दिवसाला सरासरी १८ ते २० लाख रुपये उत्पन्न मिळते. ७० ते ७५ लाखांचे उत्पन्न बुडाले.

कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्यानंतर औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानकातून पहाटे पाचपासून बससेवा सुरळीत झाली. विभागातील सर्व आगारांतील वाहतूकही सुरळीत झाली.
- आर. एन. पाटील, विभाग नियंत्रक, औरंगाबाद

Web Title: aurangabad news st bus MSRTC