अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना मिळणार तात्पुरता प्रवेश 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - अभियांत्रिकी पदवीच्या विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षासाठी सरसकट कॅरिऑन मिळाल्यानंतर द्वितीय, तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत विशेष कार्य अधिकारी डॉ. वाल्मीक सरवदे यांनी सोमवारी (ता. २८) परिपत्रक काढले आहे.

अभियांत्रिकीच्या द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना ५० टक्‍के एटीकेटी ही फक्‍त थेअरी विषयात देण्यात आली आहे. त्यांना पुढील वर्षात प्रवेश देण्यात यावा; मात्र या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यापूर्वी मागील वर्गातील कालावधी पूर्ण करणे आवश्‍यक आहे. डिटेन्ड स्टुडंटस्‌ना कॅरिऑनअंतर्गत पुढील वर्गात प्रवेश देण्यात येणार नाही.

कॅरिऑनअंतर्गत पुढील वर्गात तात्पुरता प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी  पुढील वर्गात प्रवेशासाठी आवश्‍यक अर्हता प्राप्त केल्याशिवाय परीक्षेस बसता येणार नाही. म्हणजे द्वितीय वर्ष उत्तीर्ण किंवा एटीकेटी झाल्याशिवाय तृतीय वर्षाची, तसेच द्वितीय वर्ष उत्तीर्ण आणि तृतीय वर्ष उत्तीर्ण, एटीकेटी झाल्याशिवाय अभियांत्रिकी पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षा देता येणार नाही. यासाठी रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशन, रिपब्लिकन विद्यार्थी सेना, एनएसयुआय, एबीव्हीपी या विद्यार्थी संघटनांनी निवेदने दिली होती.

स्कॉलरशिपची जबाबदारी विद्यार्थ्यांची
स्कॉलरशिप आणि फेलोशिप मिळणाऱ्या विद्यार्थ्यांबाबतची जबाबदारी विद्यार्थ्यांवर राहील. विद्यापीठ व महाविद्यालयावर राहणार नाही, असे स्पष्टपणे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: aurangabad news student marathwada university