'साहेब तेथे कार जाणार नाही, दुचाकीने जावे लागेल' 

शेखलाल शेख
मंगळवार, 30 मे 2017

केंद्रेकर यांनी दोन किलोमीटर दुचाकीने तर एक किलोमीटर पायी चालुन खुलताबाद तालुक्‍यातील गोळेगाव येथील डोंगर गाठले. येथे सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामाची पाहणी केली. केवळ पाहणीच केली नाही तर आपण अभियांत्रीकी शाखेचे असल्याची जाणीव कृषी विभागाचे कर्मचारी, अधिकाऱ्यांना करून दिली. त्यांच्या अचानक भेटीने केवळ कृषी विभागच नाही तर शेतकरीही अवाक्‌ झाले

औरंगाबाद - कोणत्याही ठिकाणी पदभार घेतल्यानंतर अनेकांनी सुनिल केंद्रेकर यांच्या कामाचा धडाका अनुभवला आहे. आता राज्याच्या कृषी आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर याचा अनुभव कृषी विभागातील अधिकाऱ्यांना ही आला. मंगळवार (ता.30) औरंगाबादेत आल्यावर त्यांनी नियोजित ठिकाणी दौरा न करताच वेगळ्याच ठिकाणी जाण्याचे सांगितले. साहेब तेथे गाडी जाणार नाही दुचाकीने जावे लागेल असे अधिकाऱ्यांनी उत्तर दिल्यावर त्यांनी काढा दुचाकी म्हणत दोन किलोमीटर दुचाकीने तर एक किलोमीटर पायी चालुन खुलताबाद तालुक्‍यातील गोळेगाव येथील डोंगर गाठले. येथे सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामाची पाहणी केली. केवळ पाहणीच केली नाही तर आपण अभियांत्रीकी शाखेचे असल्याची जाणीव कृषी विभागाचे कर्मचारी, अधिकाऱ्यांना करून दिली. त्यांच्या अचानक भेटीने केवळ कृषी विभागच नाही तर शेतकरीही अवाक्‌ झाले. 

राज्याचे कृषी आयुक्‍त सुनिल केंद्रेकर यांनी मंगळवारी (ता.30) सकाळी साडेदहाच्या सुमारास औरंगाबाद गाठले. त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानांतर्गत सुरू असलेल्या कार्यक्रमांसह कृषी विभागामार्फत सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामाची पाहणी करण्याची इच्छा व्यक्‍त केली. खुल्ताबाद तालुक्‍यातील गोळेगाव येथे उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानांतर्गत शेतकरी संवाद निश्‍चित झाला. अकराच्या सुमारास गोळेगावात दाखल झाले. शेतकऱ्यांचे म्हणने ऐकूण घेतले. 
 
सहकार्य मिळत नसेल तर थेट आमच्याशी संपर्क साधा 
सुनिल केंद्रेकर यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून तुमच्या गरजेचे ते घ्या. बोलते व्हा, आणि त्यांनाही बोलते करा. सहकार्य मिळत नसेल तर थेट आमच्याशी संपर्क साधा. कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनाही लागलीच सुचना करतांना शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांची सोडवणूक तातडीने व्हायला हवी. केवळ उत्पादनवाढीपर्यंत मर्यादित न राहता त्यांना विक्रीव्यवस्थेपर्यंत सहकार्य अनिवार्य असल्याची सुचना त्यांनी केली. 

जलसंधारणाच्या काम पाहण्याची गेले दुचाकीने 
केंद्रेकर यांनी जलसंधारणाच्या कामाची पाहणी करण्याची इच्छा व्यक्‍त केली. कामाची पाहणी करण्यासाठी जायचे असल्यास चारचाकी जाणार नाही. दुचाकीने जावे लागेल असं समोर आलं. क्षणाचाही विलंब न करता आयुक्‍त केंद्रेकर दुचाकीवर बसून धुळ खात काम सुरू असलेल्या ठिकाणी गेले. तिथे त्यांनी कामाचे स्वरूप कृषीच्या कर्मचाऱ्यांकडून समजून घेतले. कृषी सहाय्यक अशोक पठाडे यांनी कामाविषयी माहिती दिली. यावेळी त्यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना केलेल्या प्रश्‍नोत्तरात ते अभियंता असल्याची जाणीव करून दिली. कामासंदर्भात कुणी जाणून बुजून खोडी करीत असेल तर खपवून घेवू नका, कुणाच्या दबावात येवू नका, मात्र प्लॅनिंगनुसार, डिझाईननुसार काम होत नसेल तेही खपवून घेतले जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रभारी विभागीय कृषी सहसंचालक रमेश भताने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, उपविभागीय कृषी अधिकारी उदय देवळाणकर, तालुका कृषी अधिकारी हांगे, यांची उपस्थिती होती

Web Title: Aurangabad News: Sunil Kendrekar visits