स्वतःपासून करा भ्रष्टाचारमुक्तीचा जागर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

औरंगाबाद - भ्रष्टाचार हा समाज, देशाच्या विकासातील मोठा अडसर असून, याचे उच्चाटन होण्यासाठी स्वत:पासून सुरवात करण्याची गरज आहे. भ्रष्टाचारमुक्त शासनासाठी प्रयत्न व्हावेत, असा सूर भ्रष्टाचारमुक्ती जनजागरण कार्यक्रमात निघाला. ‘सकाळ’चे तनिष्का व्यासपीठ, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व रिलायबल अकॅडमीतर्फे गुरुवारी (ता. दोन) मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात दक्षता जागृती सप्ताहानिमित्त कार्यक्रम झाला. 

औरंगाबाद - भ्रष्टाचार हा समाज, देशाच्या विकासातील मोठा अडसर असून, याचे उच्चाटन होण्यासाठी स्वत:पासून सुरवात करण्याची गरज आहे. भ्रष्टाचारमुक्त शासनासाठी प्रयत्न व्हावेत, असा सूर भ्रष्टाचारमुक्ती जनजागरण कार्यक्रमात निघाला. ‘सकाळ’चे तनिष्का व्यासपीठ, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व रिलायबल अकॅडमीतर्फे गुरुवारी (ता. दोन) मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात दक्षता जागृती सप्ताहानिमित्त कार्यक्रम झाला. 

या वेळी मंचावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, अपर अधीक्षक शंकर जिरगे, उपअधीक्षक किशोर चौधरी, ‘सकाळ’चे कार्यकारी संपादक संजय वरकड, उपसरव्यवस्थापक रमेश बोडके, ‘रिलायबल’चे बाळकृष्ण डाके यांची उपस्थिती होती.

श्री. परोपकारी म्हणाले, ‘‘लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि त्याच्या कामकाज पद्धतीला समजून घेण्याची गरज आहे. आपण जागरूक राहून लाच मागणाऱ्यांविरुद्ध खुलेपणाने तक्रार द्यावी, आमचा विभाग कायम तत्पर आहे.’’ या वेळी त्यांनी उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले. श्री. वरकड म्हणाले, ‘‘कोणत्याही समस्यांवर उपचार म्हणून जागृती होते; परंतु लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जनसामान्यांपर्यंत पोचून जागृतीचे काम हाती घेतले हे स्तुत्य आहे.’’ 

या वेळी उपअधीक्षक वर्षाराणी पाटील व वैशाली पवार, गोविंद रोडगे यांनी विचार व्यक्त केले. यात भ्रष्टाचार कसा वाढीस लागतो, त्याची विविध कारणे व भ्रष्टाचार रोखण्यासाठीचे उपाय, तक्रारी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी कसा संपर्क साधावा, याची माहिती देण्यात आली. ३० ऑक्‍टोबर ते चार नोव्हेंबरदरम्यान दक्षता जनजागृती सप्ताह सुरू असून, यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून उपक्रम राबविण्यात येत आहेत.

पथनाट्यातून प्रकाश...
मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात दुपारी तीनला पोलिस कर्मचारी रमेश भालेराव, मुरलीधर आढाव, उमाकांत चौधरी, महेश पतंगे यांनी ‘भ्रष्टाचाराची नशा करी जीवनाची दुर्दशा’ हे विशेष पथनाट्य सादर केले. यातून सरकारी, निमशासकीय स्तरावर होणारा भ्रष्टाचार व त्यातून सामान्यांची होणारी ससेहोलपट यावर प्रकाश टाकण्यात आला.

बहारदार नृत्य सादरीकरण
कार्यक्रमात ‘यिन’च्या सदस्य प्रियांका पठाडे, देवश्री पुजारी, मिलिना पाटील यांनी लावणीवर बहारदार नृत्य सादर केले. शुभांगी भोकरे, प्रेरणा भारसाखळे, चैताली पालकर, आश्‍लेषा सौंदरमल यांनी गवळणीवर नृत्य केले. 

‘तनिष्कां’चा झाला गौरव
सामाजिक परिवर्तनासाठी काम करणाऱ्या ‘तनिष्कां’चा गौरव या वेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यात प्रिया धारूरकर, अंजली वडजे, अर्चना मुंदडा, शुभांगी लातूरकर, उमा जैस्वाल, किरण शर्मा, सुरय्या बेगम, लता शिंदे, अंजली चिंचोलीकर, सुनीता कोकाटे यांचा समावेश होता.

Web Title: aurangabad news tanishka corruption