नोकरीचे आमिष दाखवून शिक्षकाला घातला गंडा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 सप्टेंबर 2017

औरंगाबाद - शाळेवर शिक्षक म्हणून नोकरी देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या तिघांविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. 1) रात्री नऊच्या सुमारास गुन्ह्याची नोंद झाली. या प्रकरणी राजेंद्र बडे मिरकळा (ता. गेवराई) यांनी तक्रार दिली होती. 

औरंगाबाद - शाळेवर शिक्षक म्हणून नोकरी देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या तिघांविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. 1) रात्री नऊच्या सुमारास गुन्ह्याची नोंद झाली. या प्रकरणी राजेंद्र बडे मिरकळा (ता. गेवराई) यांनी तक्रार दिली होती. 

बाबासाहेब शंकरराव घनवट (म्हाडा कॉलनी, वाळूज), रेश्‍मा मुकुंदराज जाधव (स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय, घाणेगाव, ता. गंगापूर), सुनील अशोक जायभाय (रा. गढी, ता. गेवराई. जि. बीड) अशी फसवणूक करणारांची नावे आहेत. बडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते नोकरीच्या शोधात होते. त्या वेळी एकाने बाबासाहेब घनवट यांच्यासोबत ओळख करून दिली. बडे यांच्यासोबत नोकरीसंदर्भात चर्चा करीत घनवट यांनी आमची शिक्षण संस्था आहे, तिथे नोकरी लावून देतो, असे सांगितले. नोकरी लावून देण्यासाठी आठ लाख रुपये लागतील, असे घनवट यांनी स्पष्टपणे सांगितले. नोकरी मिळणार म्हणून बडे हे पैसे देण्यास तयार झाले. त्यानुसार घनवट यांनी रामचंद्र माध्यमिक विद्यालय, रांजणगाव शेणपुंजी येथील संस्थेवर शिक्षक पदावर नियुक्ती देतो, असे सांगितले. पैशाची जमावाजमव केल्यानंतर बडे यांनी घनवट यांना पैसे दिले. त्यानंतर संस्थेच्या कार्यालयात नेऊन सहशिक्षकपदी नियुक्ती दिली. शाळेमध्ये काही दिवस काम केल्यानंतर झालेल्या नियुक्तीबद्दल बडे यांना शंका आली. दिलेल्या आदेशाबद्दल चौकशी केल्यानंतर सहशिक्षक पदाला शासकीय मान्यताच नसल्याचे समजले. संस्थाचालकाने शासनाची मान्यता, पद नसतानाही आदेश दिल्याचे त्यांना समजले. या संदर्भात संस्थाचालकासह बाबासाहेब घनवट, रेश्‍मा जाधव, सुनील जायभाये यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर बडे यांनी थेट पोलिस ठाणे गाठले व तक्रार दिली होती. आतापर्यंतचे मोबाईल रेकॉर्डिंग, व्हिडिओ सादर केले आहेत. शनिवारी (ता. 2) घनवट याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, शिक्षण संस्थेबाबत शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून अधिकृत माहिती घेणे आहे, संस्था ही अनुदानित आहे का ? घनवट याचे साथीदार संशयित आरोपी रेश्‍मा जाधव, सुनील जायभाये यांची माहिती घेऊन तपास करणे बाकी आहे, त्यांचे आणखी कोणी साथीदार आहेत का, बडे यांना दिलेला नियुक्तीचा बनावट आदेश कोठे बनविला त्याची पाहणी करून पुरावा हस्तगत करणे बाकी असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. ही विनंती मान्य करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. मावतवाल यांनी बाबासाहेब घनवट याला बुधवार (ता. 6) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 

Web Title: aurangabad news teacher crime