शिक्षिकेच्या अवयवदानातून तिघांना जीवनदान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - शिक्षिकेच्या अवदानामुळे तिघांना जीवनदान, तर दोघांना दृष्टी मिळाली. डॉक्‍टरांनी केलेल्या समुपदेशनानंतर संबंधित शिक्षिकेच्या कुटुंबीय, नातेवाइकांनी अवयवदानाला होकार दिला आणि स्वातंत्र्यदिनी पुढील प्रक्रिया पार पडली. यकृत मुंबईला पाठविण्यात आले, तर दोन किडन्या, डोळ्यांचे येथील गरजूंवर यशस्विरीत्या प्रत्यारोपण झाले. औरंगाबाद शहरातील अकरावे, तर मराठवाड्यातील हे तेरावे अवयवदान ठरले.

औरंगाबाद - शिक्षिकेच्या अवदानामुळे तिघांना जीवनदान, तर दोघांना दृष्टी मिळाली. डॉक्‍टरांनी केलेल्या समुपदेशनानंतर संबंधित शिक्षिकेच्या कुटुंबीय, नातेवाइकांनी अवयवदानाला होकार दिला आणि स्वातंत्र्यदिनी पुढील प्रक्रिया पार पडली. यकृत मुंबईला पाठविण्यात आले, तर दोन किडन्या, डोळ्यांचे येथील गरजूंवर यशस्विरीत्या प्रत्यारोपण झाले. औरंगाबाद शहरातील अकरावे, तर मराठवाड्यातील हे तेरावे अवयवदान ठरले.

चौसाळा (ता., जि. बीड) येथील रत्नमाला बाळासाहेब निनाळे (वय ५२) या अंगणवाडीत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. रविवारी (ता. १३) सुटी असल्यामुळे त्यांनी माजलगाव येथे दोन लहान बहिणींना भेटीचा बेत आखला. त्यानुसार सकाळी मोठा मुलगा प्रवीणसोबत त्या दुचाकीने माजलगावला निघाल्या. माजलगाव दहा किलोमीटरवर असताना सकाळी दहाच्या सुमारास नित्रुड पित्रुड गावाजवळ दुचाकी खड्ड्यात आदळली. त्यात खाली पडल्यामुळे डोक्‍याला मार लागून रत्नमाला गंभीर जखमी झाल्या. बीड जिल्हा रुग्णालयातून त्यांना रात्री दहाच्या सुमारास येथील दुनाखे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. रत्नमाला यांच्या मेंदूतून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने उपचारांना साथ मिळत नव्हती. प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने सोमवारी (ता. १४) दुपारी एकला या रुग्णालयातील डॉक्‍टरांनी रत्नमाला यांच्या कुटुंबीयांना अवयवदानाबाबत कल्पना दिली. त्यांचे समुपदेशन केले. डॉ. शरद बिरादार यांनी सायंकाळनंतर रत्नमाला यांना ‘ब्रेनडेड’ घोषित केले. अवयवरूपी दानातून रत्नमाला यांच्या स्मृतींचे जतन व्हावे, या भावनेने पती, दोन मुले, दीर, बहिणींनी डॉक्‍टरांच्या समुपदेशनाला होकार दिला.  

घटनाक्रम असा 
डॉ. मिलिंद दुनाखे यांनी विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीला ((झेडटीसीसी) अवयवदानासंदर्भात माहिती दिली. समितीचे अध्यक्ष डॉ. सुधीर कुलकर्णी यांनी रत्नमाला यांना ‘ऑर्गन रिट्रायबल सेंटर’ला हलविण्याची सूचना दिली. ‘ऑर्गन रिट्रायबल सेंटर’ म्हणून मान्यता असलेल्या ‘माणिक हॉस्पिटल’मध्ये सोमवारी मध्यरात्री साडेबाराला रत्नमाला यांना हलविण्यात आले. तेथे मध्यरात्रीनंतर सव्वादोनला चाचणी झाली. फॉर्म दहानुसार अधिकृतरीत्या ब्रेनडेड म्हणून घोषित करण्यात आले. नियमानुसार मंगळवारी सकाळी सव्वाआठला दुसरी चाचणी झाली. दरम्यानच्या काळात ‘क्रॉसमॅच’ची प्रक्रिया सुरू झाली. यकृत प्रत्यारोपणासाठी ‘झेडटीसीसी’ने मुंबईच्या ‘ग्लोबल हॉस्पिटल’चे नाव निश्‍चित केले. पोलिसांची परवानगी, विभागीय आयुक्त, पोलिस आयुक्तांनी ‘ग्रीन कॉरिडॉर’साठीची प्रक्रिया पूर्ण केली. ‘क्रॉसमॅच’चा दुसरा रिपोर्ट आल्यानंतर ‘झेडटीसीसी’ने किडनी व डोळ्यांच्या प्रत्यारोपणासाठी ‘वेटिंग लिस्ट’नुसार नावे निश्‍चित केली.

डॉक्‍टरांची धावपळ
मंगळवारी दुपारी चारला यकृत, किडनी, डोळे काढून घेण्याची प्रक्रिया डॉ. उल्हास कोडपल्ले, डॉ. प्रवीण सूर्यवंशी, डॉ. अभय महाजन, डॉ. भास्कर मुसांडे, डॉ. समिध पटेल, डॉ. मकरंद काजळकर या टीमने पार पाडली. पोलिसांनी सायंकाळी सहाला माणिक हॉस्पिटल ते चिकलठाणा विमानतळपर्यंत ‘ग्रीन कॉरिडॉर’ उपलब्ध करून दिला. ॲम्ब्युलन्सने हे अंतर केवळ सात मिनिटांत कापले. रात्री आठच्या विमानाने यकृत मुंबईला रवाना करण्यात आले. या वेळी मुंबईच्या ‘ग्लोबल हॉस्पिटल’चे डॉ. प्रशांता राव, डॉ. स्वप्नील शर्मा, किजू नायर यांची टीम येथे दाखल झाली होती. एक किडनी येथील कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये, एक सिग्मा हॉस्पिटलमध्ये, तर दोन्ही डोळे कसबेकर आय हॉस्पिटलमध्ये दान करण्यात आले. अवयवदान ते प्रत्यारोपणापर्यंतच्या प्रक्रियेसाठी माणिक हॉस्पिटलचे सीईओ राजेंद्र प्रधान, ‘झेडटीसीसी’चे अध्यक्ष डॉ. सुधीर कुलकर्णी, समन्वयक मनोज गाडेकर यांनी प्रयत्न केले. येथील घाटी रुग्णालयात रत्नमाला यांची बुधवारी (ता. १६) उत्तरीय तपासणी झाली. त्यानंतर चौसाळा येथे दुपारी दोनला त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शेतकरी कुटुंब असले, तरी अंगणवाडीच्या माध्यमातून आरोग्यासह विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचे काम आई करीत होती. त्यामुळे अवयवदानाबाबत थोडी माहिती होती. याबाबत असलेले काही गैरसमज डॉक्‍टरांनी दूर केले. त्यामुळे आम्ही होकार दिला.
- प्रवीण बाळासाहेब निनाळे, रत्नमाला यांचा मुलगा

माझ्या बहिणीने आयुष्यभर समाजसेवा केली. तिच्या अवयवदानामुळे इतरांचे प्राण वाचतील. रत्नमालाचे आयुष्य अपघातामुळे संपले असले तरी अवयवरूपाने तिच्या स्मृतीचे जतन होईल.
- शारदा सुरेश सुपेकर, रत्नमाला यांची बहीण (माजलगाव)

Web Title: aurangabad news teacher organ Donation