सावधान! तुमच्यावरही आहे चोरटे, भामट्यांची नजर

मनोज साखरे 
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - मोठ्या रकमेची, दागिन्यांची ने-आण करताय? तर सावध राहा! अगदी बॅंकांजवळच नव्हे; तर तुमच्या मागेपुढेही चोर, भामटे फिरत आहेत, असे समजा. तुमच्या मेहनतीच्या पैशांवर त्यांची नजर आहे. हे भामटे, चोर नानाविधप्रकारे थापा मारून प्रसंगी जोरजबरदस्ती करून तुम्हाला लुबाडू शकतात, अशा भामट्यांपासून सावध राहण्याची गरज आहे. 

औरंगाबाद - मोठ्या रकमेची, दागिन्यांची ने-आण करताय? तर सावध राहा! अगदी बॅंकांजवळच नव्हे; तर तुमच्या मागेपुढेही चोर, भामटे फिरत आहेत, असे समजा. तुमच्या मेहनतीच्या पैशांवर त्यांची नजर आहे. हे भामटे, चोर नानाविधप्रकारे थापा मारून प्रसंगी जोरजबरदस्ती करून तुम्हाला लुबाडू शकतात, अशा भामट्यांपासून सावध राहण्याची गरज आहे. 

सध्या पीककर्ज आणि पीकविम्यासाठी बॅंकांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे. अशा गर्दीचा, उडालेल्या धांदलीचा फायदा भामटे घेऊ शकतात. त्यांची गंडवण्याची एकप्रकारे मोड्‌सच असून, शहरातील अनेक बॅंका, एटीएम केंद्राजवळ चोरटे, भामटे उभे राहतात. एवढेच काय तर औषधालय, रुग्णालय परिसरातही त्यांचा वावर असतो. पोलिस असल्याचे, सीआयडी असल्याचे सांगत अनेकजणांना या भामट्यांनी गंडवल्याचे प्रकार घडले आहेत. आता शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहारांचे दिवस आहेत. त्यामुळे त्यांना भामट्यांकडून लक्ष्य केले जाण्याची शक्‍यता अधिक असून, बॅंकेतून रकमा घेऊन येणाऱ्यांवर खास नजर भामट्यांची असते. यातच महिला लक्ष्य होण्याचे प्रमाणही वाढत आहे. महिलांना समोर अनुचित प्रकार घडल्याचे सांगत सुरक्षेची सबब पुढे करून दागिने काढायला भाग पाडून हातचालाखीने ते लांबविल्याचे प्रकार घडले आहेत. यात खासकरून ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक असून, अशा घटना गारखेडा, सेव्हनहिल, आकाशवाणी भागात घडल्याचे पोलिसांकडे नोंद गुन्ह्यांवरून लक्षात येते. 

अशी आहे मोड्‌स...
१) बॅंकेत येणाऱ्या नागरिकांवर दोन ते तीनजणांकडून वॉच ठेवला जातो. त्यातील एकजण बॅंकेत शिरकाव करून मोठी रक्कम काढणाऱ्या बॅंक खातेदाराकडे लक्ष ठेवले जाते. त्यानंतर त्या व्यक्तीचा भामटे-चोर पाठलाग करतात. निर्जनस्थळी अथवा गर्दीत फायदा घेऊन रकमेची बॅग हिसकावून पोबारा करतात. 

२) व्यापारपेठा, बाजारपेठा मोठे व्यवहाराच्या ठिकाणीही भामटे वावर करून माहिती मिळवितात. इतरत्र असलेल्या सहकाऱ्यांना ही माहिती देऊन पाळत ठेवली जाते. त्यानंतर लुबाडण्याचे प्रकार घडतात. कापूस व्यापाऱ्यांवर पाळत ठेवून त्यांची अकरा लाखांची रक्कम दुचाकीस्वारांनी लांबविल्याची घटना घडली होती. 

३) मोठी रुग्णालये, औषधालय व कमी गर्दीच्या रस्त्यांवर भामट्यांचा वावर असतो. ग्रामीण भागातील व्यक्ती दिसली की, त्यांना आपण पोलिस असल्याच्या थापा मारतात, समोर तपासणी, नाकेबंदी सुरू आहे, दंगल झाली अशा थापा मारतात, त्यानंतर पिशवीची तपासणी करून हातचालाखीने पैसे आणि दागिनेही लांबवितात. 

४) बॅंकेच्या रांगेत किंवा इतर ठिकाणी तुमच्या पायावर पाण्यात मुरवलेल्या बिस्किटचा चुरा टाकतात आणि तुमच्या अंगाला घाण लागली आहे, असे म्हणत लक्ष विचलित करून हातचलाखीने रक्कम हडप करतात.

अशा करा उपाययोजना.. 
मोठी रक्कम काढण्यासाठी एकटे बॅंकेत जाऊ नका 
मोठ्या रकमेसाठी बॅंकेत सोबत सहकारी घेऊन जावे 
पैसे घेतल्यानंतर थेट घरी अथवा नियोजित स्थळी जावे 
दुचाकीच्या डिक्कीत पैसे ठेवणे टाळलेलेच बरे 
अनोळखी व्यक्तीशी बोलू नका, त्याच्या कृतीला प्रतिसाद देऊ नका 
संशयित व्यक्ती आढळल्यास बॅंक, पोलिसांना माहिती द्यावी 
पोलिस, सीआयडी असल्याचे सांगणाऱ्यांची चौकशी करावी 
अशांना ओळखपत्र विचारणा करून खातरजमा करावी 
दागिने काढून सुरक्षित ठेवा म्हणणारे भामटेही असू शकतात. 
 भामटे, चोरा असल्याचा संशय आल्यास पोलिसांना कळवा

Web Title: aurangabad news theft