पर्यटन बसच्या तिकिटात घोळ प्रकरणी चौकशीचे आदेश 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - औरंगाबाद-वेरूळ या पर्यटन व्हॉल्वो बसचे तिकीट वेगळवेगळ्या दराने फाडले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकाराने एसटीला मोठा आर्थिक फटका बसत होता. या प्रकरणाची "सकाळ'ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर एसटी प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ आगारप्रमुख स्वप्नील धनाड यांनी दिली. 

पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबादेतून अजिंठा व वेरूळसाठी पर्यटन विकास महामंडळाच्या मदतीने एसी व्हॉल्वो बस सुरू करण्यात आलेली आहे. या पैकी औरंगाबाद-वेरूळ या पर्यटन बसचे तिकीट गेल्या सहा महिन्यांपासून वेगळवेगळ्या दराने दिले जात होते. नियमित वाहक सुटीवर असल्यानंतर बदलीचा वाहक असेल त्या दिवशी कमी दराने तिकीट फाडले जात होते. नियमित वाहक असेल तर 276 रुपये आणि त्याच्या सुटीच्या दिवशी सोमवारी 251 रुपये या प्रमाणे तिकीट आकारणी केली जात होती. यामध्ये नेमके खरे तिकीट कोणते असा प्रश्‍न प्रवासी विचारत होते. विशेष म्हणजे या प्रकाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहितीही नव्हती. या अनागोंदी प्रकारावर "सकाळ'ने प्रकाश टाकताच एसटी प्रशासनाला जाग आली. या प्रकरणाची चौकशी करून तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश आगारप्रमुखांनी दिले आहेत. नेमके कोणत्या वाहकाचे तिकीट बरोबर आहे, ही चूक कुणाची आहे याचा तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणात आता संबंधित वाहक, एसटीचा इश्‍यू विभागासह आणि मशीन पुरवणाऱ्या कंपनीचीही चौकशी केली जाणार आहे. इलेक्‍ट्रॉनिक इश्‍यू मशीनने तिकीट देताना नॉर्मल आणि फ्लॅटरेटची निवड न केल्याने वाहकाकडून वेगवेगळ्या दराने तिकीट दिले गेले असावे, असा अंदाज आहे; मात्र इश्‍यू विभागाने वाहकांच्या ई-मशीनमध्ये बदल का केला नाही असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या मुळे एसटीला मोठा आर्थिक फटका बसला आहे. 

औरंगाबाद-वेरूळ पर्यटन बसच्या नियमित वाहकांच्या सुटीच्या दिवशी वेगवेगळ्या दराने तिकीट दिल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात नेमकी चूक कुणाची हे शोधून कारवाई करण्यात येणार आहे. 
- स्वप्नील धनाड, वरिष्ठ आगार व्यवस्थापक 

Web Title: aurangabad news tourism bus ticket