स्वच्छ परिसरासाठी लढवली ‘पिके’ची शक्‍कल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

उमरगा - तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीत अवघ्या महिनाभरापूर्वी कामकाज सुरू झाले असताना अनेक कोपरे थुंकीने रंगले आहेत. या प्रकाराने वैतागलेल्या तहसील प्रशासनाने चक्क ‘पिके’ चित्रपटातील शक्‍कल लढवत तळघरात दोन्ही बाजूच्या जिन्याखाली विघ्नहर्ता श्री गणेशाच्या मूर्तीची पूजा सुरू केली आहे.

उमरगा - तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीत अवघ्या महिनाभरापूर्वी कामकाज सुरू झाले असताना अनेक कोपरे थुंकीने रंगले आहेत. या प्रकाराने वैतागलेल्या तहसील प्रशासनाने चक्क ‘पिके’ चित्रपटातील शक्‍कल लढवत तळघरात दोन्ही बाजूच्या जिन्याखाली विघ्नहर्ता श्री गणेशाच्या मूर्तीची पूजा सुरू केली आहे.

तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीतील भिंती, कोपरे थुंकीने रंगल्या आहेत. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाने प्रारंभी शिपायामार्फत संबंधितांना रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र इमारत दुमजली असल्याने एक-दोन शिपाई किती जणांना रोखणार, असा प्रश्‍न आहे. त्यानंतर जिन्यावरील भिंतीच्या कोपऱ्यात आरसे बसविण्यात आले. आरशातील स्वत:च्या प्रतिमेवर कोणी थुंकणार नाही, असा विचार करून ही उपाययोजना करण्यात आली होती; मात्र आरशावरही पिंक मारणाऱ्यांची संख्या कमी नव्हती.

दरम्यान, तळमजल्यात जाण्यासाठी दोन्ही बाजूंनी जिने आहेत. तळघरात सेतू सुविधा केंद्र, संजय गांधी निराधार योजना, पुरवठा व निवडणूक विभाग असल्याने नागरिकांची मोठी वर्दळ असते. दोन्ही जिन्याखाली जणू थुंकी केंद्रच झाले होते. काही केल्या घाणीचा प्रकार थांबत नसल्याने तहसील प्रशासनाने जिन्याखाली एका टेबलवर चक्क श्री गणेशाची मूर्ती ठेवली असून, कर्मचारी दररोज पूजा करतात. त्यामुळे हे प्रकार रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे; मात्र काही कर्मचाऱ्यांची पंचाईत झाली आहे. अशांना गुटखा, सुपारी बाहेरच खाऊन यावे लागत आहे.

नवीन इमारतीत होणारी घाण थांबविण्यासाठी श्री गणरायाची मूर्ती ठेवण्याचा पर्याय शोधला. मूर्ती सुरक्षित राहण्यासाठी व घाणीचा प्रकार थांबविण्यासाठी विशिष्ट आच्छादन करण्यात येणार आहे. नागरिकांनी सार्वजनिक मालमत्तेच्या ठिकाणी स्वच्छता ठेवली पाहिजे. आता संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
-अरविंद बोळंगे, तहसीलदार

Web Title: aurangabad news umarga news