दोन दिवसांआड पाण्यासाठी पत्रांचा खेळ चाले...!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जुलै 2018

औरंगाबाद - उन्हाळ्यानंतरही शहरातील पाण्याचा प्रश्‍न कायम असून, आता पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी पत्र काढून शनिवारपासून (ता. १४) शहरात दोन दिवसांआड पाणी देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांना दोन दिवसांआड पाण्यासाठी शनिवारपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

औरंगाबाद - उन्हाळ्यानंतरही शहरातील पाण्याचा प्रश्‍न कायम असून, आता पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी पत्र काढून शनिवारपासून (ता. १४) शहरात दोन दिवसांआड पाणी देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांना दोन दिवसांआड पाण्यासाठी शनिवारपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

शहरातील पाणीप्रश्‍न चार महिन्यांपासून गंभीर बनला आहे. काही भागात चार-पाच दिवसांनी, तर जुन्या शहरातील अनेक भागांत सात ते आठ दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिक, नगरसेवकांनी रस्त्यावर उतरून वेळोवेळी आंदोलने केली. भाजप नगरसेवकांनी अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात ‘झोपा काढा’ आंदोलन केल्यानंतर तत्कालीन प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दोनऐवजी तीन दिवसांआड पाणी देण्याचे नियोजन केले होते. मात्र, त्यानंतरही शहरात पाण्याची ओरड कायम असल्यामुळे  महापौर नंदकुमार घोडेले यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर स्थायी समितीचे सभापती राजू वैद्य यांनी दोन दिवसांआड पाणी देण्याचे नियोजन करा, असे आदेश दिले होते. त्यानुसार गेल्या आठवड्यात आयुक्तांनी दोन दिवसांआड पाणी देण्याचे आदेश काढले होते. मात्र, प्रशासनाने फक्त प्रायोगिक तत्त्वावर ही तयारी दर्शविली होती. दरम्यान, बुधवारी (ता. ११) कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी शनिवारपासून शहरात दोन दिवसांआड पाणी देण्याचे प्रयत्न करण्यात येतील, असे पत्र काढले आहे. 

आतापर्यंत काय झाले?
सिटी वॉटर युटिलिटीकडे पुरवठा असताना एक दिवसाआड पाण्याचा प्रयोग करण्यात आला. 
महापालिकेने योजनेचा ताबा घेताच दोन दिवसांआड पाणी देण्याचा निर्णय घेतला. 
भाजप नगरसेवकांच्या आंदोलनानंतर तीन दिवसांआड पाण्याचे वेळापत्रक करण्यात आले.
गेल्या आठवड्यात दोन दिवसांआड पाणी देण्याचे आदेश आयुक्तांनी काढले.

आकडे काय सांगतात?
जायकवाडीवरून पाण्याचा उपसा - १४५ एमएलडी.
शहरात येणारे पाणी  - १२० एमएलडी. 
पाण्याची एकूण मागणी - २८० एमएलडी.

Web Title: aurangabad news water issue