सौरऊर्जेवर चालणार पाणीपुरवठा योजना

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जानेवारी 2018

औरंगाबाद - महापालिका मुख्यालयावर सौर पॅनेल बसविण्याच्या कामाचा प्रारंभ झाल्यानंतर आता संपूर्ण पाणीपुरवठा योजनेसाठी सौर ऊर्जेचा वापर करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार जायकवाडी धरण व फारोळा जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात सौर पॅनेल बसविण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी खासगी एजन्सीला दिल्या आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्पातून होणाऱ्या या कामामुळे महापालिकेचे महिन्याकाठी दोन कोटी रुपयांचे वीजबिल वाचणार आहे. 

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत महापालिकेने प्रशासकीय इमारतीवर सौर पॅनेल बसविण्याचा निर्णय घेतला आहे. या कामाचा शुक्रवारी प्रारंभ झाला. आगामी वीस दिवसांत हे काम पूर्ण होणार असून, त्यातून मिळणाऱ्या विजेवरच महापालिका कार्यालय चालणार आहे. त्यामुळे महिन्याला किमान दीड लाख रुपये महापालिकेची बचत होणार आहे. त्याचबरोबर आता संपूर्ण पाणी योजना सौर ऊर्जेवर चालविण्यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत.

यासंदर्भात आयुक्त डी. एम. मुगळीकर म्हणाले, आगामी काळात अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढावा यासाठी शासनाचे प्रयत्न आहेत. त्यामुळे जायकवाडी धरण व फारोळा जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात सौर पॅनेल बसवून त्यातून मिळणाऱ्या विजेवर पाणीपुरवठा योजना चालविण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एक फेब्रुवारीला स्मार्ट सिटी संचालक मंडळाची बैठक होत असून, त्यात हा अहवाल सादर करण्यात येईल. 

शाळांवरही लावणार पॅनेल 
केंद्र शासनाच्या सौरसिटी प्रकल्पात औरंगाबाद शहराची निवड करण्यात आली होती. मात्र, पुढे हा प्रकल्प रेंगाळला. असे असले तरी स्मार्ट सिटीतून महापालिका सौर ऊर्जा प्रकल्प राबवीत आहे. त्यानुसार आगामी काळात शहरातील पोलिस ठाणे, हर्सूल कारागृह, महापालिकांच्या शाळांवर देखील सौर पॅनेल बसविले जाणार आहेत.

वीस कोटींचा खर्च 
या प्रकल्पासाठी सुमारे १५ ते २० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. महापालिकेला जायकवाडी धरणातून वीज पंपाद्वारे पाण्याचा उपसा करून ते शहरात आणावे लागते. त्यामुळे सरासरी दोन ते अडीच कोटी रुपये प्रत्येक महिन्याला बिल येते. सौर ऊर्जेचा वापर केल्यास दोन कोटी रुपये वाचणार आहेत.

Web Title: aurangabad news water supply scheme on solar power