दुबार पेरणीच्या संकटाचे मराठवाड्यावर ढग

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

औरंगाबाद - जूनच्या सुरवातीला दमदार सलामी देत आशा, आकांक्षा वाढवून शेतकऱ्यांना पेरणीच्या कामात गुंतविणाऱ्या पावसाने गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून डोळे वटारले आहेत. ऐन पावसाळ्यात उन्हाळासदृश स्थिती निर्माण झाल्याने आकाशात नाहीत; पण शेतीवर मात्र संकटाचे काळे ढग जमा होऊ लागले आहेत. येत्या चार-आठ दिवसांत सर्वदूर चांगला पाऊस न झाल्यास मोठ्या प्रमाणावर दुबार पेरणीशिवाय पर्याय राहणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांतील अस्वस्थता वाढू लागली आहे.

औरंगाबाद - जूनच्या सुरवातीला दमदार सलामी देत आशा, आकांक्षा वाढवून शेतकऱ्यांना पेरणीच्या कामात गुंतविणाऱ्या पावसाने गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून डोळे वटारले आहेत. ऐन पावसाळ्यात उन्हाळासदृश स्थिती निर्माण झाल्याने आकाशात नाहीत; पण शेतीवर मात्र संकटाचे काळे ढग जमा होऊ लागले आहेत. येत्या चार-आठ दिवसांत सर्वदूर चांगला पाऊस न झाल्यास मोठ्या प्रमाणावर दुबार पेरणीशिवाय पर्याय राहणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांतील अस्वस्थता वाढू लागली आहे.

शेतकरी संप, कर्जमाफी घोषणा, दहा हजारांच्या तातडीच्या कर्जाची चर्चा अन्‌ घोषणा होत असताना जूनच्या प्रारंभी मॉन्सूनपूर्व पावसाने जोरदार सलामी दिली. यंदा चांगला पाऊस होईल, या हवामान विभागाच्या अंदाजानुसार मॉन्सूनपूर्व पाऊस त्याची नांदीच असेल असे समजून शेतकऱ्यांनी वावर गाठले आणि पेरणीचे काम हाती घेतले. कर्जमाफीची अंमलबजावणी, दहा हजारांचे तातडीचे कर्ज आदींची वाट पाहून अखेर उधार-उसनवारीवर अनेकांनी पेरण्या आटोपल्याही. मराठवाड्यात सध्या ७० ते ९० टक्‍क्‍यांच्या आसपास पेरणीचे काम पूर्ण झाले आहे. पेरलेले उगवले, जोमदार वाढूही लागलेले असताना पावसाने पाठ फिरविली. मॉन्सून सक्रिय न झाल्याने सध्या या भागात उन्हाळ्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे पिके कोमेजू लागली आहेत. काही भागांत किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. काही भागांत तुरळक पाऊस होत असला, तरी तो पिकांना आधार देणार नाही. येत्या चार-आठ दिवसांत पाऊस सक्रिय न झाल्यास दुबार पेरणीची टांगती तलवार आहे.

२२ हजार हेक्‍टर धोक्‍यात
औरंगाबाद विभागातील औरंगाबादसह बीड, जालना जिल्ह्यांपैकी औरंगाबाद जिल्ह्यातील तीन तालुक्‍यांत दुबार पेरणीच्या संकटाची शक्‍यता कृषी विभागानेही व्यक्त केली आहे. औरंगाबाद तालुक्‍यातील पेरणी झालेल्या ६० हजार ५६५ हेक्‍टरपैकी २४१ हेक्‍टरवर दुबार पेरणी संभवते. जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात म्हणजेच पैठण तालुक्‍यातील पेरणी झालेल्या ५५ हजार ९३५ हेक्‍टरपैकी ९ हजार ७२६ हेक्‍टर दुबार पेरणीची भीती आहे. यात कपाशीचे ६ हजार २००, बाजरीचे ८८०, तूर ८००, मूग १ हजार २२६, सोयाबीनचे १८१, उडिदाच्या ३९ हेक्‍टरचा समावेश असल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. गंगापूर तालुक्‍यात ७२ हजार ३४९ हेक्‍टरपैकी ११ हजार ०८७ हेक्‍टर दुबार पेरणीचे संभाव्य क्षेत्र आहे. विभागातून केवळ औरंगाबाद जिल्ह्यातील तीन तालुक्‍यांत एकूण २१ हजार ८६० हेक्‍टर क्षेत्र हे दुबार पेरणीचे संभाव्य क्षेत्र असल्याचे सांगण्यात आले. अर्थात समाधानकारक पाऊस न झाल्यास अन्य तालुक्‍यांतही दुबार पेरणीच्या क्षेत्रात वाढीची शक्‍यता व्यक्त होत आहे.

७० टक्के पेरण्या पूर्ण; पण...
जालना - जिल्ह्यात ७० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पंधरा दिवसांपासून पावसाने ताण दिल्याने पिके माना टाकत आहेत. जालना, बदनापूर तालुक्‍यांत सोमवारी (ता. १९) काही ठिकाणी पाऊस झाल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. परतूर, अंबड परिसरात आठ जुलैला, तर एकादशीदरम्यान जाफराबाद, भोकरदन तालुक्‍यांत पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सद्य-स्थितीत पिके मोडून दुबार पेरणीची शक्‍यता कमी आहे. आठवडाभरात पाऊस न झाल्यास दुबार पेरणी करावी लागेल, असे मत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे यांनी व्यक्त केले.

बहुतांश भागांत सावट
बीड - कृषी विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यात आतापर्यंत ९७ टक्के पेरण्या झाल्या असून, प्रत्यक्षात हा आकडा ११० टक्‍क्‍यांच्या जवळपास असल्याचे सांगितले जाते. ३.२६ लाख हेक्‍टरवर कपाशी, १.५० लाख हेक्‍टरवर सोयाबीन, ५७ हजार हेक्‍टरवर बाजरी, ३२ हजार हेक्‍टरवर तूर, १८ हजार हेक्‍टरवर मूग, तर ३२ हजार हेक्‍टरवर उडिदाची पेरणी झाली आहे. पिकांची उगवण झाल्यानंतर पावसाने गेल्या वीस दिवसांपासून दडी मारली आहे. येत्या आठवडाभरात चांगला, सर्वदूर पाऊस न झाल्यास बहुतांश भागांत दुबार पेरणीचे संकट घोंघावत आहे. आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या २६.६२ टक्के पाऊस झाला आहे. 

चांगला पाऊस न झाल्यास...
लातूर - जिल्ह्यात पंधरा ते वीस दिवसांपासून पावसाने दडी मारली असून, पिके सुकू लागली आहेत. येत्या आठ दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट अटळ आहे. जिल्ह्यात खरिपाचे चार लाख सहा हजार हेक्‍टर क्षेत्र असून, ९५ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. यात ७० टक्के क्षेत्रावर सोयाबीनचा समावेश आहे. तूर, कपाशीचाही चांगला पेरा झाला आहे. आतापर्यंत सरासरी २०८ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

पिकांनी टाकल्या माना
उस्मानाबाद - पावसाअभावी जमिनीतील ओलावा कमी झाल्याने पिकांनी मान टाकायला सुरवात केली आहे. आतापर्यंत ७४ टक्के पेरणी झाली असून, सर्वाधिक सोयाबीन आहे. सोयाबीनला १५ दिवसांतून एकदा पाण्याची पाळी देणे अपेक्षित असते; परंतु २० दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने शेतकरी धास्तावले आहेत. 

जिल्ह्याची पावसाची सरासरी ७४७ मिलिमीटर असून आतापर्यंत सरासरी २४७ मिलिमीटर (३१ टक्के) पाऊस झाला आहे.

आभाळाकडे डोळे
नांदेड - गेल्या आठवडाभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट कायम आहे. सोमवारी (ता. दहा) मध्यरात्री काही ठिकाणी पाऊस पडला असला तरी त्यांचे प्रमाण कमी अत्यल्प होते. येत्या आठवडाभरात चांगला पाऊस न झाल्यास कोवळी पिके वाचण्याची शक्‍यता कमीच आहे. उगवलेले जगावे म्हणून अनेक शेतकरी कुटुंबीयांसह घागरीने पाणी देण्याचा प्रयत्न करीत आहेत. पाऊस पडावा म्हणून ग्रामीण भागात ‘धोंडी धोंडी पाणी दे’ म्हणत साकडे घातले जात आहे. हिमायतनगर तालुक्‍यातील पळसपूर शिवारात युवा शेतकरी बबन भिसे याने शिवारातील कपाशीचे पीक वखर फिरवून मोडून टाकले. महिनाभर पाणी नसल्याने ते विवंचनेत होते. जिल्ह्यात एकूण आठ लाख २४ हजार हेक्‍टर क्षेत्रापैकी सात लाख ५७ हजार हेक्‍टरवर (९२ टक्के) पेरणी झाली आहे. यंदा तुरीच्या पेऱ्यात घट झाली असून, सोयाबीन, कपाशीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. आतापर्यंत केवळ १८ टक्के पाऊस झाला आहे.

किडींचा हल्ला
परभणी - जिल्ह्यात ६३ टक्के पेरणी झाली असून केवळ १३६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट असताना जे काही उगवले आहे त्यावर किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. 

जिल्ह्यात पावसाची वार्षिक सरासरी ७७४.६२ मिलिमीटर आहे. मंगळवारपर्यंत (ता.११) केवळ १३६.१५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. खरिपासाठी एकूण पाच लाख २१ हजार ८७ हेक्‍टर प्रस्तावित असून त्यापैकी तीन लाख ३० हजार ६३७ हेक्‍टवर म्हणजे ६३ टक्के पेरणी झाली आहे. कपाशी, सोयाबीनचा पेरा सर्वाधिक आहे. कपाशी लागवडीची वेळ निघून गेल्याने अनेक शेतकऱ्यांना उर्वरित क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करावी लागेल. बहुतांश भागांत पावसाच्या हलक्‍या सरी कोसळ्याने पिकांना जीवदान मिळाले आहे; परंतु काही भागांत पेरणी करून तुरळक उगवण झालेल्या क्षेत्रात दुबार पेरणी करावी लागणार आहे. दुसरीकडे सोयाबीनवर करडे भुंगे, मिलीपेड (पैसा) या किडींनी हल्ला केला आहे. 

अडीच लाख हेक्‍टर धोक्‍यात
हिंगोली - जिल्ह्यात वीस दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने पिके कोमेजून जात असून, सुमारे अडीच लाख हेक्‍टरवर दुबार पेरणीचे संकट आहे.  खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र तीन लाख २५ हजार हेक्‍टर असून साडेतीन लाख हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी केली जाते. सोयाबीन, कपाशी, तूर, उडीद, मूग, ज्वारी आदी पिकांना प्राधान्य दिले जाते. आतापर्यंत ६७ टक्के पेरणी झाली आहे. पावसाची वार्षिक सरासरी ८९० मिलिमीटर असून आतापर्यंत तीनशे मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित असताना केवळ १९८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. 

बीड जिल्ह्यात सध्या पीकस्थिती बरी असली, तरी पावसाची नितांत गरज आहे. उगवणीनंतर पावसाने उघडीप दिल्याने पिके संकटात सापडली आहेत. आगामी आठ दिवसांत पाऊस न झाल्यास काही भागांतील पिके अडचणीत सापडतील. 
- बी. एम. गायकवाड, कृषी उपसंचालक, बीड

Web Title: aurangabad news weather marathwada agriculture