खैरे साहेब, आपण सर्वांचे खासदार आहात! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

औरंगाबाद - "आपण केवळ हिंदूंचे नव्हे, तर या सुंदर शहरातील हिंदूंबरोबरच माझ्यासह सर्व मुस्लिम, ख्रिश्‍चन, दलित, शीख, जैन, पारसी अशा सर्वांचे खासदार आहात. मात्र, आपलं हे मत वाचून एक संवेदनशील मानवतावादी औरंगाबादी नागरिक म्हणून मला खूप वेदना झाल्या...' शहरातील दंगलीनंतर आमदार इम्तियाज जलील यांनी खासदार चंद्रकांत खैरे यांना खुले पत्र लिहून असे अनेक प्रश्‍न उपस्थित केले आहेत. 

आमदार इम्तियाज जलील यांनी खासदार खैरे यांना उद्देशून म्हटले, ""आपण स्वत:ला एका धर्माचे व जातीचे नेते समजणे चूक नव्हे काय? आपण चुकीचं बोलता आहात. औरंगाबादच्या लाखो नागरिकांनाही हे मत बोचलं आहे. आपले हे मत म्हणजे काही गुन्हा नसला तरी आपल्या संकुचित मनाचे दर्शक आहे. खासदार व लोकप्रतिनिधी या नात्याने सर्वांची काळजी घेणे व संरक्षण करणे हे तुमचे काम आहे. आपण आपल्या या लाडक्‍या शहराचे नेते आहात, हे कसे नाकारता?'' 

""गेल्या आठवड्यात आपल्या शहरात जे काही दुर्दैवी, अभद्र व शांती भंग करणारे घडले त्याला ना तुमचा हिंदू धर्म जबाबदार आहे, ना माझा इस्लाम. याला जबाबदार आहेत या दोन्ही धर्मांतील अपप्रवृत्तीची मूठभर माणसे. दंगल करणारे मूठभर हिंदू किंवा मुस्लिम असतील; पण औरंगाबाद शांत राहावे, हिंदू व मुस्लिमांनी गुण्यागोविंदाने राहावे, असे वाटणारे लाखो नागरिक हिंदू व मुस्लिमही आहेत हे खरे नव्हे का?'' 

""शहरात शांततेसाठी आपण पुढाकार घ्यायला हवा होता; मात्र आपण तणाव वाढविण्याचे प्रयत्न करीत आहात. वीस वर्षांपूर्वीचे शहर आता राहिले नाही. दंगलीत निरपराध्यांचाच बळी जात असतो. दंगल घडविणारे समाजकंटक हिंदू असो की मुस्लिम त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असे मी पोलिस आयुक्तांना सांगितले आहे,'' असे अनेक मुद्दे जलील यांनी खुल्या पत्रात नमूद केले आहेत. 

""शहरातील सर्वसामान्य जनतेसाठी कचरामुक्ती, पाणी, रस्ते, शिक्षण व आरोग्य ही अधिक महत्त्वाची कामे आपण खासदार व मी आमदार म्हणून करावीत, असे औरंबादकरांना वाटत आहे. ते काम तुमच्यासोबत करायला मी तयार आहे. तुमच्या प्रतिसादाची वाट पाहतो आहे,'' असा उल्लेख पत्राच्या शेवटी इम्तियाज जलील यांनी केला आहे.

Web Title: aurangabad news you are the MP of all says Imtiyaz Jaleel