कलेत झपाटलेपण असू द्या, यश मिळतेच

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

औरंगाबाद - कला क्षेत्रात झपाटलेपण असायला हवे, नाहीतर हे क्षेत्र मिळमिळीत, रसहीन होते, असे मत प्रसिद्ध सिनेअभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात केंद्रीय युवक महोत्सव ‘सृजन २०१७’च्या उद्‌घाटनप्रसंगी रविवारी (ता. २९) त्या बोलत होत्या. 

औरंगाबाद - कला क्षेत्रात झपाटलेपण असायला हवे, नाहीतर हे क्षेत्र मिळमिळीत, रसहीन होते, असे मत प्रसिद्ध सिनेअभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात केंद्रीय युवक महोत्सव ‘सृजन २०१७’च्या उद्‌घाटनप्रसंगी रविवारी (ता. २९) त्या बोलत होत्या. 

प्रतीक्षा लोणकर म्हणाल्या, की हल्ली यश खूपच सहज मिळते. अर्थात दुसऱ्यांच्या यशाची सूत्रे आपणही वापरतो; परंतु अशी आयती सूत्रे वापरून यश मिळविण्यापेक्षा स्वतः यश मिळवून आपली सूत्रे जगाला द्या. तीच खरी परिणामकारक आहेत. आपला प्रवास सांगताना त्या म्हणाल्या, ‘‘माझ्या कारकिर्दीची सुरवातही औरंगाबादेतून या युवक महोत्सवातूनच यश मिळून झाली आहे. आपल्या कलेतून सतत वेगळेपण शोधून त्यास खतपाणी घाला. प्रसिद्धीच्या मागे लागू नका.’’ या वेळी मंचावर कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, कुलसचिव प्रदीप जबदे, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. मुस्तजीब खान, डॉ. जयंत शेवतेकर, प्रा. दासू वैद्य, संजय मोहोड, सुधाकर शेंडगे, संजय नवले, लक्ष्मीकांत शिंदे यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

पॅशन देते नवी उमेद
कला क्षेत्रात पॅशन वाढविण्याची गरज असून, आपल्या भविष्यात हे झपाटलेपण घेऊन जाणे महत्त्वाचे आहे. क्षेत्र कोणतेही असो; तुमच्यात झपाटलेपण असावे. आपला ध्यास, कीर्ती, नाव यापेक्षाही माझ्यातील काहीतरी वेगळेपण समाजासाठी द्यायचे आहे, असे पॅशन तुमच्यात असले पाहिजे. ते नवीन काहीतरी करण्याची उमेद देते. यातूनच आपल्यातील जाणतेपणाची जाणीव होते, असे प्रतीक्षा लोणकर म्हणाल्या.

व्यक्तिमत्त्व विकासासाठी  ३६ कलाप्रकार पुरेसे
विद्यापीठाच्या युवक महोत्सवात सादर होणारे विविध ३६ कलाप्रकार व्यक्तिमत्त्व विकासासाठी पुरेसे आहेत. यातून आपल्याला सुप्त गुणांची जाणीव होऊ द्या. त्यावरच लक्ष केंद्रित करा, असे आवाहन प्रतीक्षा लोणकर यांनी केले.

मराठवाड्यातील विद्यार्थी  प्रतिभावान ः कुलगुरू 
मराठवाड्यातील विद्यार्थी हे उत्साही, प्रतिभासंपन्न आहेत, हे मला माहीत आहे. सहभागी महाविद्यालयांचा विचार करता प्रत्येकाच्या मनात स्पर्धेविषयी, निकालाविषयी चिंता असेल; परंतु स्पर्धा यालाच म्हणतात. त्यामुळे निकोप स्पर्धा करा, असे आवाहन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केले. पारितोषिक मिळाले नाही म्हणून खचून जाण्यापेक्षा कला सादर करून त्यातील आनंद घ्या, असेही ते म्हणाले.

‘शिवाजी महाराजांनी’ वेधले लक्ष 
उद्‌घाटनापूर्वी विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून संगीत विभागापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यात छत्रपती शिवाजी महाराज, भारतमाता, स्त्री-भ्रूणहत्या, शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, कॉपीमुक्त परीक्षा, पर्यावरण वाचवा या देखाव्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. रामरहिम बाबा, आसारामबापू अशा भोंदूंनी भोळ्या लोकांची कशी फसवणूक केली, यावर भाष्य करणारे जिवंत देखावे विद्यार्थ्यांनी सादर केले. यात कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी सहभागी झाले होते.

सातही स्टेजवर अवतरले  विविध ‘कला-रंग’
कवी दासू वैद्य यांच्या संकल्पनेतून विद्यापीठ परिसरात उभारण्यात आलेल्या सात स्टेजला सृजनरंग, लोकरंग, नाट्यरंग, नटरंग, ललितरंग, शब्दरंग, नादरंग अशी नावे देण्यात आली आहेत. सात स्टेजवर ३६ कलाप्रकार सादर करण्यात आले. यामध्ये सुगम गायन, पाश्‍चात्त्य, भजन, मूक अभिनय, मिमिक्री, कोलाज, काव्यवाचन हे कलाप्रकार सादर झाले.

मिमिक्रीतून नोटाबंदीवर केले भाष्य
चौथ्या ‘नाट्यरंग’ मंचावर विद्यार्थ्यांनी विविध अभिनेत्यांच्या आवाजांत ‘नोटाबंदी’वर भाष्य केले. नरेंद्र मोदी यांच्या आवाजाची मिमिक्री करीत नोटाबंदी, जीएसटीचा फायदा कसा झाला? भ्रष्टाचार रोखण्यास मदत कशी होईल, आदींवर भाष्य केले.  

कवितेतून मांडली शेतकऱ्यांची व्यथा
उस्मानाबाद येथील व्यंकटेश महाजन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने कवितेतून शेतकऱ्यांची व्यथा मांडली. कर्जमाफी देण्याची घोषणा करून शेतकऱ्यांच्या आशेवर सरकारने कसे तणनाशक फवारले यावर सादर केलेल्या या कवितेला प्रेक्षकांनी भरभरून साद दिली.

‘जनधन - जनधन’ म्हणुनी गाजर हे दाखविले, 
नोटाबंदीचा काढून फतवा रांगेला लाविले...’

अशा कवितेतून सरकारवर टीकाही केली. यामध्ये ११८ महाविद्यालयांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १०३ महाविद्यालयांनी कविता सादर केल्या. कवितांचे परीक्षण इंद्रजित घुले (मंगळवेढा), श्रीराम गव्हाणे (नांदेड), डॉ. कैलास दौड (नगर) यांनी केले.

सूरवाद्य कार्यक्रमाला स्पर्धकांची पाठ
शास्त्रीय सूरवाद्य गायनाचा कार्यक्रम सातव्या ‘नादरंग’ मंचावर दुपारी अडीच वाजतापासून सुरू झाला; मात्र चार वाजेपर्यंत केवळ दोनच स्पर्धकांनी गायन सादर केले होते. अनेक स्पर्धक नोंदणी करूनही उपस्थित राहिले नसल्याचे आयोजकांनी सांगितले. स्पर्धेचे परीक्षण नंदकुमार डिंगरे, शशिकांत देशमुख, राम बोरगावकर यांनी केले.

आज काय सादर होणार? 
रंगमंच क्रमांक एक ‘सृजनरंग’ येथे सकाळी ९ ते सायंकाळी ६ समूह गायन (भारतीय) ६ ते १० लोकआदिवासी नृत्य, दुसऱ्या ‘लोकरंग’ मंचावर ८ ते १२ दरम्यान वासुदेव, १२ ते रात्री ७ भारुड, ७ ते रात्री १० या वेळेत गोंधळ, दुसऱ्या ‘नाट्यरंग’ मंचावर ९ ते १२ शास्त्रीय नृत्य, १२ ते रात्री १२ एकांकिका, चौथ्या ‘नटरंग’ मंचावर ९ ते १ लोकगीत, १ ते रात्री १० लोकनाट्य, पाचव्या ‘ललितकला’ मंचावर ९ ते ११ः३० मृद्‌मूर्तिकला, ११ः.३० ते २ पोस्टर, ४ः३० ते ७ चित्रकला, सहाव्या ‘शब्दरंग’ मंचावर सकाळी १० ते रात्री ८ वक्तृत्व, रात्री ९ ते १० प्रश्‍नमंजूषा (लेखी) आणि सातव्या ‘नादरंग’ मंचावर सकाळी ९ ते दुपारी ३ शास्त्रीय गायन, ३ ते रात्री १० शास्त्रीय तालवाद्याचे सादरीकरण होणार आहे.

विद्यार्थी, शिक्षक निवाऱ्याअभावी ताटकळले
युवक महोत्सवासाठी मराठवाड्यातून २५० महाविद्यालयांनी सहभाग घेतला आहे. सकाळी नऊपासूनच नोंदणी प्रक्रिया, शोभायात्रा, उद्‌घाटन कार्यक्रम असल्याने उस्मानाबाद, बीडसारख्या जिल्ह्यातील महाविद्यालयांचे संघ शनिवारी रात्रीच विद्यापीठात दाखल झाले. परंतु दिलेल्या निवासस्थानाकडे गेल्यानंतर संघ, शिक्षकांना निवासस्थान पाहिजे असेल तर पत्र दाखवा अशी भूमिका घेण्यात आल्याने शिक्षकांना ऐनवेळी आयोजकांना फोनाफोनी करावी लागली. गरम पाणी नसल्याने सर्वांचे हाल झाले. विद्यार्थ्यांना सर्दी झाल्याने शास्त्रीय गायन कसे सादर करावे, असा प्रश्‍न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला.

विटलेले जेवण अन्‌ थंड चहावर बोळवण 
महोत्सवात सहभागी झालेले संघ, विद्यार्थी, शिक्षक, विद्यापीठातील स्टाफ यांच्यासह सुमारे दोन हजार जणांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये मुगाची भाजी विटलेली असल्याने काही विद्यार्थी रात्री आजारी पडले. त्यांना अचानक दवाखाना करावा लागल्याचे संघप्रमुख शिक्षकांनी सांगितले. सायंकाळी देण्यात आलेला चहाही थंड होता. यावेळी तक्रार करण्यासाठीही कोणी उपलब्ध नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

Web Title: aurangabad news youth festival