गर्भपात करणारी महिला डॉक्‍टर रंगेहाथ जाळ्यात

मनोज साखरे
बुधवार, 24 मे 2017

अन्य एका महिलेची गर्भपात करण्याची प्रक्रिया सुरु असताना डॉ. चंद्रकला गायकवाड हिला रंगेहाथ पकडण्यात आले. तिला ताब्यात घेवून सर्व साहित्य जप्त करण्यात आले. तसेच रूग्णालय सील करण्यात आले

औरंगाबाद: दोन हजारांत गर्भपात करणारी महिला डॉक्‍टर जिन्सी पोलिसांच्या जाळ्यात अडकली. ही कारवाई दुपारी जिन्सी भागात झाली. चंद्रकला रामराव गायकवाड असे संशयित महिला डॉक्‍टरचे नाव आहे. 

पोलिस उपायूक्त राहूल श्रीरामे यांनी माहिती दिली की, जिन्सी भागात गर्भपात सूरू असल्याची तक्रार एका महिलेने पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांच्याकडे तक्रार दिली. या बाबींची पडताळणी करण्यासाठी उपनिरीक्षक वर्षा काळे यांच्यासह महिला कर्मचाऱयांचे पथक बुरखा घालून जिन्सीतील गायकवाड हिच्या रूग्णालयात गेले. गर्भपात करण्याबाबत त्यांनी डॉक्‍टरांना विचारणा केली, त्यावर डॉक्‍टरांनी होकार दर्शविला. गर्भपातासाठी दोन हजार रूपये मागितले. डमी ग्राहक बनून आलेल्या महिला पोलिसांनी पैशांची पुर्तता केली. त्यानंतर डॉक्‍टरांनी बुधवारी (ता. 24) दुपारची वेळ वर्षा काळे यांना दिली. डॉक्‍टरने सांगितल्यानुसार, वर्षा काळे व त्यांचे पथक ग्राहक बनून आले. बुरखा घालून त्या रूग्णालयात बसल्या. त्यावेळी अन्य महिलाही तेथे गर्भपातासाठी उपस्थित होत्या. काळे यांनी अन्य महिलांची विचारपूस व खातरजमा केली, त्यानंतर अन्य एका महिलेची गर्भपात करण्याची प्रक्रिया सुरु असताना डॉ. चंद्रकला गायकवाड हिला रंगेहाथ पकडण्यात आले. तिला ताब्यात घेवून सर्व साहित्य जप्त करण्यात आले. तसेच रूग्णालय सील करण्यात आले. 

म्हणे महापालिकेत अधिकारी होते.. 
पोलिसांनी चौकशी केली असता, डॉ. चंद्रकला गायकवाड हिने आपण यापूर्वी महापालिकेत वैद्यकीय अधिकारी असल्याचे सांगितले, तसेच एमबीबीएसचे शिक्षणही पूर्ण केल्याचे तिने पोलिसांना सांगितले. या सर्व बाबींची तसेच कागदपत्रांची खातरजमा व तपासणी पोलिस करीत आहेत. 
 
रूग्णालय नव्हे अड्डा 
जिन्सी परिसरातील डॉ. गायकवाड हिच्या रूग्णालयाला कोणतेही नाव नाही, केवळ माऊथ पब्लीसीटीवरच तेथे महिला गर्भपातासाठी येत होत्या. बऱ्याच दिवसांपासून गर्भपात करण्याचे प्रकार तेथे सुरु होते, एका गर्भपातासाठी दोन हजार रूपये घेतले जात होते. 

Web Title: aurangabad news:lady doctor arrested