औरंगाबादच्या डाळींबाची परराज्यात विक्री

प्रकाश बनकर
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

  • योग्य दर मिळत असल्याने शेतकरी समाधानी 
  • विक्रीसाठी रोज 400 ते 500 कॅरेट डाळिंब कॅरेट उपबाजारपेठत
  • प्रतिकॅरेट 1100 ते 1400 रुपयांचा दर 
  • दिवाळीच्या अगोदरपासून या केंद्रावर डाळिंब विक्री 
  • आजपर्यंत 8 हजार 610 कॅरेट डाळिंबांची विक्री
     

औरंगाबाद  : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या करमाड येथील उपबाजारपेठेतील शेतकऱ्यांसाठी नव्याने उभारण्यात आलेले डाळिंब मार्केट लाभदायी ठरत आहे. औरंगाबाद तालुक्‍यातील डाळींबची गुजरात, मध्य प्रदेश, मुंबईसह इतर राज्यात मोठी मागणी होत आहे. उपबाजारपेठत रोज 400 ते 500 कॅरेट डाळिंब विक्रीसाठी येत आहे. या कॅरटमागे किमान 400 ते जास्तीत जास्त 2300 रुपयापर्यंत दर मिळत असल्याने डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना मात्र यातून दिलासा मिळत आहे. 

बाजार समितीतर्फे करमाड उपबाजारपेठेत डाळिंब व टोमॅटो खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. दिवाळीच्या अगोदरपासून या केंद्रावर डाळिंब विक्री सुरू झाली. डाळिंब मार्केटमध्ये 1 नोव्हेंबर ते आजपर्यंत 8 हजार 610 कॅरेट डाळिंबांची विक्री झाली. परतीच्या पावसाचा फटका डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनाही बसला आहे. या संकटानंतरही काही शेतकऱ्यांनी डाळिंबचा माल वाचवला आहे. तोच माल सध्या विक्रीसाठी उपबाजारपेठेत येत आहे. नोव्हेंबरच्या सुरवातीला प्रतिकॅरेटला 1300 रुपयांचा दर मिळाला होता. 

हेही वाचा: शेतकऱ्यांना तारण योजनेत चार कोटींचा फायदा

बुधवारी 274 कॅरेट डाळिंबाची आवक होवून

बुधवारी (ता.27) 274 कॅरेट डाळिंबाची आवक होवून 1100 ते 1400 रुपयांचा दर मिळाला. डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना आपला माल विक्रीसाठी स्थानिक बाजारपेठ नसल्याने नाशिक बाजारपेठत माल विक्रीसाठी न्यावा लागत होता. करमाड समितीत मार्केट सुरू झाल्याने शेतकऱ्यांना मालवाहूतकीचा खर्च आणि वेळही वाचत आहे. येथील माल मालेगाव, राजस्थान, गुजरातसह इतर परराज्यात विकला जात आहे. शिवाय मालाला अपेक्षित दर मिळत असल्याने शेतकरी समाधानी असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

हेही वाचा: बोंडअळीचा धोका टाळण्यासाठी फरदड टाळा! 

उपबाजारपेठेची डाळींब व टोमॅटो बनते हब 
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या करमाड येथील उपबाजारपेठेत डाळींब आणि टोमॅटो खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. औरंगाबाद तालुक्‍यात मोठ्या प्रमाणावर डाळींब आणि टोमॅटोचे पिके घेतली जातात. हे विक्रीसाठी पुर्वी औरंगाबाद बाजार समिती आणि पुणे, नाशिक येथील बाजारपेठेत शेतकऱ्यांना घेऊन जावे लागत होते. मात्र करमाड येथील उपबाजारपेठेत डाळींब आणि टोमॅटो खरेदी केंद्र सुरु झाल्यानंतर शेतकऱ्यांचे वाहतूकीचा प्रश्‍न सुटला. एवढेच नव्हे तर डाळींब आणि टोमॅटोला चांगला भाव मिळत असल्यामूळे शेतकऱ्यांनासाठी हे खरेदी केंद्र लाभदायी ठरत आहे. 

करमाड येथील उपबाजारपेठेत येथे डाळींब आणि टोमॅटो खरेदी केंद्र सुरु करा अशी शेतकऱ्यांची मागणी होती.त्यानुसार आम्ही विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या पुढाकारातून ही खरेदी केंद्र सुरु करण्यात आली. याला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. येथून शेतकऱ्यांना माल बाहेर राज्यात विक्रीसाठी जात आहे. 
- राधाकिसन पठाडे, सभापती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Pomegranates Sell Other States