औरंगाबाद- 'त्या' तोडलेल्या चिंचेचा अंकुरला वंश! 

अतुल पाटील
शुक्रवार, 29 जून 2018

औरंगाबाद : शहानुरमिया दर्गा चौकातील वाहतुकीस अडथळा ठरणारे चिंचेचे झाड बरोबर दोन महिन्यांपूर्वी तोडण्यात आले. यावर कथित पर्यावरणप्रेमींनी कळवळा दाखवला. मात्र, तरुणांच्या एका गटाने त्या चिंचेच्या बिया गोळा करुन मातीत टाकल्या. विशेष म्हणजे त्या तुटलेल्या चिंचेचे वंश आता तरारुन अंकुरले आहेत.

औरंगाबाद : शहानुरमिया दर्गा चौकातील वाहतुकीस अडथळा ठरणारे चिंचेचे झाड बरोबर दोन महिन्यांपूर्वी तोडण्यात आले. यावर कथित पर्यावरणप्रेमींनी कळवळा दाखवला. मात्र, तरुणांच्या एका गटाने त्या चिंचेच्या बिया गोळा करुन मातीत टाकल्या. विशेष म्हणजे त्या तुटलेल्या चिंचेचे वंश आता तरारुन अंकुरले आहेत.

"प्रयास'ने त्या तुटलेल्या चिंचेच्या बिया तेव्हाच गोळा केल्या. तब्बल दीड महिने जपल्या. पाऊस सुरु होताच, आठवड्यापूर्वी त्या बिया जमिनीत टाकल्या. दोन-तीन पावसातच त्यातील काही बिया हिरव्यागार होत जमिनीवर डोकावत आहेत. तर काही बोटभर उंचीची रोपटी होऊन वाऱ्यांच्या झुळकीने डोलू लागली आहेत. जवळपास 20 रोपटी तयार झाली आहेत. आणखी 30 रोपटी तयार करण्यात येणार आहेत. 
"प्रयास'चे रवी चौधरी यांनी घराजवळील कुंड्यांमध्ये बीजरोपण केले आहे. तयार झालेली रोपटी शहरातील विविध भागात लावून त्यावर तोडलेल्या झाडाचा इतिहास लिहला जाणार आहे. झाड तोडल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर गळा काढत कोरडे ताशेरे ओढले. बरोब्बर दोन महिन्यांपूर्वीच्या प्रसंगाचा साऱ्यांना विसरही पडला आहे. प्रयासने मात्र, याला शाश्‍वत विरोधाची धार लावली आहे. 

ओळख अन्‌ विरोध 
चिंचेचे झाड असलेला दर्गा चौक, अशी ओळख त्या झाडाने निर्माण केली होती. संग्रामनगर उड्डाणपुल झाल्यानंतर वाहतुकीस अडथळा ठरु लागले. ते झाड तोडण्यासाठी महापालिकेने अनेकदा प्रयत्न केले. मात्र, त्यांना विरोध झाला. पोलिसांना हाताशी धरुन अखेर 27 एप्रिलला ते झाड तोडले. त्यानंतर शहरात दोन-तीन दिवस सोशल मीडियावर घमासान झाले. यात अभिजन विरुद्ध बहुजन इथपर्यंत हा वाद पोचला. याचवेळी शहरात पर्यावरणावर काम करणाऱ्या "प्रयास युथ फाऊंडेशन'ने त्याबाबत शाश्‍वत विरोधाची भुमिका घेतली. 

झाड तोडल्यानंतर वाईट वाटले. पण यातून सकारात्मक संदेश देण्याचे ठरले. तयार केलेली रोपटी शहरभर लावण्यात येतील. शाश्‍वत विरोधाचा भाग म्हणून तोडलेल्या झाडाचा इतिहास त्यावर नोंदविणार आहे. 
- रवी चौधरी, प्रयास युथ फाऊंडेशन.

Web Title: aurangabad prayas foundation youth news