नवाबपुऱ्यातून उडाला होता दंगलीचा भडका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

औरंगाबाद - दंगलीचे लोण नवाबपुऱ्यात पसरल्यानंतर येथील एका उंच इमारतीत गुलेर बांधण्यात आली होती. येथूनच दगडांचा मारा, रॉकेलचे गोळे फेकण्यात आले. एकाअर्थी दंगलीचा केंद्रबिंदू ही इमारत होती. येथूनच दंगल ऑपरेट झाली; परंतु एसआयटीकडून अद्याप या इमारत मालकाविरुद्ध कारवाई केली नसल्याचा आरोप होत आहे.   

औरंगाबाद - दंगलीचे लोण नवाबपुऱ्यात पसरल्यानंतर येथील एका उंच इमारतीत गुलेर बांधण्यात आली होती. येथूनच दगडांचा मारा, रॉकेलचे गोळे फेकण्यात आले. एकाअर्थी दंगलीचा केंद्रबिंदू ही इमारत होती. येथूनच दंगल ऑपरेट झाली; परंतु एसआयटीकडून अद्याप या इमारत मालकाविरुद्ध कारवाई केली नसल्याचा आरोप होत आहे.   

मोतीकारंजा येथील दंगलीचे लोण नवाबपुरा भागात पोचले. तेथूनच दंगलीने उग्र स्वरूप घेतले. नवाबपुरा भागात हजारोंच्या संख्येने जमाव राजाबाजारकडे चालून गेल्यानंतर परिस्थिती पोलिसांच्या हाताबाहेर गेली. त्यावेळी एका इमारतीतून पूर्ण दंगल ऑपरेट केली जात होती. इमारतीच्या गच्चीवर चाळीसच्या आसपास दंगेखोर गुलेरद्वारे गोट्यांचा तसेच दगडा-विटांचा वर्षाव पोलिस व जमावावर करीत होते. कुमक पोचल्यानंतर  पोलिसांनी या इमारतीत कारवाई सुरू केली. त्यावेळी इमारतीमध्ये रॉकेलचे ड्रम, गुलेर आणि दगडांचा खच दिसून आला. तसेच येथून ३१ संशयित दंगेखोरांना पकडण्यात आले; पण या संशयितांचे पुढे काय झाले याची माहिती कुणीच देऊ शकले नाही. दंगलीला पाच दिवस उलटले; परंतु येथील दंगेखोरांवर कारवाई झाली नाही. या संशयितांना एसआयटीकडून अटक झालेली नाही, असा आरोप नागरिक करीत आहेत. 

आदेश का दिले नाहीत?
दंगलीचा भडका उडण्यापूर्वीच जिन्सी पोलिसांना चाहूल लागली होती. यानंतरही कोणतीही ठोस कृती झाली नाही. पोलिसांनी सांगितले की, आम्हाला पहाटे चारपर्यंत कोणतेही आदेश ठाणेस्तरावरून देण्यात आलेले नव्हते. त्यामुळे पोलिस ठाण्यातच बसावे लागले. पोलिसांना आदेश का दिले नाहीत, याची चौकशी होण्याची गरज आहे.

जिन्सी पोलिसांचे अपयश
स्फोटक परिस्थितीत जिन्सीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ठोस कृती होणे गरजेचे होते. हद्दीतील नवाबपुरा भागात जमाव जमत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नवाबपुरा येथील जमाव हुसकावण्याची गरज होती; परंतु जमाव राजाबाजारकडे चाल करीत असतानाही त्यांना रोखण्यात आले नाही. हे जिन्सी पोलिसांचे अपयश असल्याची बाब समोर आली आहे.

व्हिडिओ व्हायरल 
नवाबपुरा भागातील एका इमारतीतून राजाबाजारकडे दगड, विटांच्या माऱ्यासह रॉकेलचे गोळे भिरकावण्यात आले. राजाबाजार येथील नागरिक जमावाचा हल्ला रोखण्यासाठी पत्रे, रॅकचे शेड उभारून बचाव करीत होते. त्यानंतर पोलिसही तेथे पोचले. त्यांच्यावरही दगडफेक होत असल्याचे व्हायरल व्हिडिओत दिसून आले आहे. 

Web Title: aurangabad riot case riots spread to Nawab