पोलिसांविरोधात शिवसेनेचा शनिवारी मोर्चा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

औरंगाबाद - दंगलीनंतर पोलिस हिंदूंचे रक्षण करणाऱ्या शिवसैनिकांनाच टार्गेट करीत असून, एमआयएमचा दंगेखोर नगरसेवक अद्याप मोकाट आहे. आमचा पोलिस, गृह खात्यावर विश्‍वास राहिलेला नाही. आम्ही एकतर्फी कारवाई खपवून घेणार नाही, असा इशारा शिवसेनेने दिला असून पोलिसांच्या निषेधार्थ शनिवारी (ता. १९) जिल्हाधिकारी कार्यालयावर हिंदू शक्ती मोर्चा काढण्यात येणार आहे. 

दंगलप्रकरणी पोलिसांनी शिवसेना नगरसेवक राजेंद्र जंजाळ व कार्यकर्ते लच्छू पहिलवान ऊर्फ लक्ष्मीनारायण बाखरिया यांना अटक केली. या पार्श्‍वभूमीवर पत्रकार परिषदेत खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले, की दंगलीत दगड समोरून येत होते. पेट्रोल बॉम्ब, रॉकेलचा वापर झाला. त्यामुळे दंगल पूर्वनियोजित होती. शिवसैनिकांनी संकटात सापडलेले हिंदू नागरिक व पोलिसांचेही संरक्षण केले. मात्र, आता पोलिसच शिवसैनिकांवर उलटले आहेत. घटनेच्या दिवशी पोलिस आयुक्त शहरात नव्हते, दोन उपायुक्त सुटीवर होते. एसआरपीची तुकडी उशिरा आली. दंगा नियंत्रण, क्‍यूआरटी (शीघ्र कृती दल), वज्र वाहन कुठे होते? उशिरा येऊन पोलिसांनी दंगल घडविणाऱ्यांना मदत केली, असा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, मोर्चा सकाळी साडेनऊ वाजता पैठण गेट येथून निघून गुलमंडी, सिटी चौक, शहागंज, चेलीपुरामार्गे जाणार आहे.

रॉकेल माफिया, क्‍लबचालकांचा सहभाग 
दंगलीत रॉकेल माफिया, पत्त्यांचा क्‍लब चालविणाऱ्यांचा समावेश असल्याचा आरोप जिल्हाप्रमुख दानवे यांनी केला. सीसीटीव्हीचे सीडीआर गायब झाल्यानंतर पोलिस पुरावे गोळा करत आहेत. पेट्रोल बॉम्बसाठी पेट्रोल आले कोठून याचा शोध घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.

साडेतीनशे गोळ्या गेल्या कुठे? 
पोलिसांनी साडेतीनशे प्लॅस्टिक गोळ्यांचा वापर केल्याचे सांगितले जात आहे. गोळ्या लागलेले जखमी गेले कुठे? असा प्रश्‍न संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी केला.

Web Title: aurangabad riot case Shiv Sena rally against the police on Saturday