दंगलीच्या जखमा अन्‌ भीतीचे राजकारण

शेखलाल शेख
सोमवार, 14 मे 2018

कचराकोंडी आणि त्यातून उद्‌भवलेल्या दंगलीने औरंगाबादची देशभर नाचक्‍की झाली. यातून शहराची प्रतिमा अजूनही सुधारलेली नसताना आता दंगलीने शहराच्या नावावर पुन्हा एकदा काळिमा फासली. शहराची वारंवार नकारात्मक छबी राज्यात आणि देशात गेल्याने शहराचा ‘कचरा’ झाला; मात्र मागील काही वर्षांत शहरात विकासाऐवजी वारंवार धार्मिक, भावनिक, जातीय तेढ निर्माण करणाऱ्या मुद्यांची ठिणगी सदैव धगधगती ठेवल्याने कित्येक वर्षांपासून शांत असलेल्या शहराला पुन्हा एकदा जातीय दंगलीला सामोर जावे लागले. संवेदनशील असलेल्या शहरात जातीय दंगलीने समाजमन हळहळले.

कचराकोंडी आणि त्यातून उद्‌भवलेल्या दंगलीने औरंगाबादची देशभर नाचक्‍की झाली. यातून शहराची प्रतिमा अजूनही सुधारलेली नसताना आता दंगलीने शहराच्या नावावर पुन्हा एकदा काळिमा फासली. शहराची वारंवार नकारात्मक छबी राज्यात आणि देशात गेल्याने शहराचा ‘कचरा’ झाला; मात्र मागील काही वर्षांत शहरात विकासाऐवजी वारंवार धार्मिक, भावनिक, जातीय तेढ निर्माण करणाऱ्या मुद्यांची ठिणगी सदैव धगधगती ठेवल्याने कित्येक वर्षांपासून शांत असलेल्या शहराला पुन्हा एकदा जातीय दंगलीला सामोर जावे लागले. संवेदनशील असलेल्या शहरात जातीय दंगलीने समाजमन हळहळले. क्रिया आणि प्रतिक्रियांच्या आगीत काही जणांनी तेल ओतण्याचे काम केल्याने याच्या सर्वाधिक जखमा नेहमीप्रमाणे सर्वसामान्यांना सहन कराव्या लागल्या. वैयक्तिक, सार्वजनिक मालमत्तेचे या दंगलीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. दंगलीने अनेकांच्या मनात भीती निर्माण झाली. आता याच भीतीचे नेहमीप्रमाणे राजकारण सुरू झाले आहे. निवडणुका आल्या, की याच भीतीचे दोन्ही गटांकडून मुद्दे केले जातील. हेच वर्षानुवर्षे सुरू आहे. या सर्वांमध्ये विकासाचा श्‍वास गुदमरत आहे.

मागील कित्येक वर्षांपासून औरंगाबादमधील रहिवासी पाण्याच्या समस्येशी दोन हात करीत असताना या समस्येत कचऱ्याने मोठी भर घातली. मागील कित्येक दिवसांपासून कचऱ्याच्या आगीत होरपळणाऱ्या नागरिकांच्या समस्येत दंगलीच्या चिंतेची भर पडली. सध्या बघितले, तर दंगलीसाठी तीन ते चार किरकोळ कारणे सोडली तर कोणतेच ठोस कारण नाही. दंगल घडावी इतके मोठे कारण यामध्ये नक्कीच नाही. दोन गटांतील वादाचे लोण दोन समाजांपर्यंत गेले आणि जुन्या शहरातील काही भाग बेचिराख झाला. दंगलखोरांनी केलेल्या हैदोसात दोन निष्पाप व्यक्तींनाही आपला जीव गमवावा लागला. अडीचशेहून अधिक जण जखमी झाले. शेकडो दुकाने, वाहनांची राखरांगोळी झाली. अनेकांनी बघितलेली स्वप्नेसुद्धा कोट्यवधींच्या नुकसानीत जळून खाक झाली. ज्यांनी या दंगलीच्या आगीत आपले सर्वस्व गमावले त्यांच्या जखमांचे चटके त्यांच्या हृदयावर कित्येक वर्षे घर करून राहतील. 

सध्या दंगलीसाठी जी कारणे पुढे केली जात आहेत ती अतिशय क्षुल्लक आहेत. यातून दंगल घडावी इतके मोठे संवेदनशील कारण मुळीच नाही. ही दंगल नियोजितरीत्या करण्यात आली नाही ना, या शंकेला पेट्रोल बाँब, रॉकेलच्या बाटल्या आणि दगडांचा खच यामुळे पुरेपूर वाव आहे. एका भागातील अतिशय क्षुल्लक कारणावरून शहरातील मोतीकारंजा, गांधीनगर, राजाबाजार, शहागंज, नवाबपुरा, चमन, शहागंज, चंपा चौक, रोशनगेटच्या काही भागापर्यंत दंगलीचे लोण नियोजितरीत्या पोचविल्यासारखे दिसते. औरंगाबादसाठी दंगल नवीन नसली तरी कित्येक वर्षांपासून शांत असलेल्या जुन्या शहरात जाणीवपूर्वक, विनाकारण अचनाक अशांती निर्माण करण्यात आली. आता यात दोन समाजांत निर्माण झालेली दरी भरून काढण्याऐवजी सध्या दंगलीवरून नेहमीप्रमाणे राजकारण सुरू झाले आहे. सर्वजण शांततेचे आवाहन करीत असले, तरी दंगलग्रस्त भागातील चित्र हे चिंता निर्माण करणारे आहे. 

शहरातील पाणी, कचऱ्याच्या समस्येवरून शहरातील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. पाण्यावरून सुरू असलेले आंदोलन आणि पेटलेल्या कचऱ्याने नागरिक हतबल झाले आहेत. याचीच चर्चा मागील कित्येक दिवसांपासून सुरू असताना दंगलीने या दोन्ही समस्यांचे विषयांतर झाले आहे. आता मूळ समस्यांचे विषयांतर करण्यासाठी या दंगलीच्या माध्यमातून राजकारण सुरू झालेले आहे. सोशल मीडियावर तर कित्येकजण आपले परखड मत मांडताना दिसताहेत. आता दंगलीमुळे पुढील कित्येक दिवस तरी शहरातील मूळ समस्यांकडे नागरिकांचे लक्ष जाणार नाही, हे निश्‍चित आहे. इतके दिवस कचरा, पाण्यावर राजकारण सुरू असताना आता सर्वच पक्षांकडून दंगलीचेही जोरदार राजकारण सुरू आहे. दंगलग्रस्त भागांना भेटी देण्यासाठी राजकीय नेत्यांमध्ये चढाओढ सुरू झालेली दिसते. राजकीय पक्ष, नेत्यांकडून शांततेचे आवाहन केले जात असले, तरी त्यांना यातून राजकीय लाभ हवाय ते उघड आहे. मागील काही वर्षांत राजकीय लाभाच्या गणितात नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. औरंगाबादेतील प्रत्येक समस्या, घटनेचे राजकीय भांडवल केले जात असल्याने येथील समस्या सुटण्याऐवजी त्या गंभीर होताना दिसतात. मागील कित्येक वर्षांपासून कचरा, पाण्यावर फक्त राजकारणच केले जात असल्याने या समस्या सुटल्या नाहीत. शहरातील समस्या सोडविण्याऐवजी दोन्ही गटांकडून भावनिक, धार्मिक कारणे पुढे केली जात असल्याने आता नागरिकांनीच शहराला कुठे घेऊन जायचे हे ठरवायला हवे.

Web Title: aurangabad riot fearless politics