इन्सानियत जल रही है...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

औरंगाबाद - डोळ्यांदेखत जळणारे घर, दगडांचा वर्षाव, लाठ्याकाठ्यांचा मार, जाळपोळ, तोडफोडीने शहरवासीयांचे मन सुन्न झाले. राजाबाजार, नवाबपुरा येथे गुण्यागोविंदाने राहणारे लोकच आपसांत भिडले. गत काही वर्षांत कधीही येथे जाळपोळ झाली नव्हती; पण शुक्रवारी (ता. ११) रात्रीतून दंगल घडली. लूटही झाली, राहते घरच नव्हे; तर माणुसकीही पेटविण्याचे काम झाले. 

औरंगाबाद शहराला दंगलीचा इतिहास आहे; परंतु गत चार महिन्यांत शहर व दंगल हे समीकरण बनू पाहत आहे परंतु औरंगाबादकरांना शांतता हवी आहे. शहरात एकीकडे नवाबपुरा, राजाबाजार, मोतीकारंजा आणि शहागंज पेटत असताना उर्वरित शहर पूर्णपणे शांत होते. अर्थातच शहरातील काही समाजकंटक वगळल्यास शांततेसाठी  अनेक जण प्रयत्नशील आहेत. दंगलग्रस्त भागात अनेक घरे पेटवण्यात आली. दंगलीत वाहने बेचिराख झाली. याचाच आढावा नवाबपुरा आणि राजाबाजार भागात घेतला. त्यावेळी अनेकजण रस्त्यावर उभे होते. नवाबपुऱ्याच्या तोंडावर काही तरुण राजाबाजारकडे रोखून पाहत होते. अशीच परिस्थिती राजाबाजारातील तरुणांचीही होती. शनिवारी या परिसरात झालेली दुकानांची जाळपोळ, हॉटेल पेटल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाचा झालेला मृत्यू यातून असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे. अनामिक भीती येथील रहिवाशांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवली. अनेक दुकाने भीतीपोटी बंद होती. 

भयग्रस्त चेहरे अन्‌ हताश भावना
नवाबपुरा असो, की राजाबाजार. दोन्ही भागांतील महिला आणि मुलांचे चेहरे भयग्रस्त होते. कधी न अनुभवलेला हिंसाचार बालकांनी पाहिला. त्यामुळे ते हादरून गेले. महिलांची स्थितीही काहीशी अशीच होती. त्यांनाही दंगल नको होती. हताशपण व उद्याची चिंता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती.

व्यावसायिकांचे मोठे नुकसान 
शहागंज भागात व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यांची दुकाने पेटवली, अक्षरश: दंगेखोरांनी लूटही केली. येथील रहिवासी तसेच छोट्या- मोठ्या व्यापाऱ्यांसाठी शनिवारची पहाट निराशा घेऊन आली. व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. रविवारी तरी असा फटका बसू नये म्हणून दुकान न उघडता दुकानासमोर व्यापारी बसलेले दिसले. 

Web Title: aurangabad riot huminity is burning