नवीन असताना संधी दिली, चांगले काम करून दाखवा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

औरंगाबाद - महापालिकेतील शिवसेनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर जाऊन सोमवारी (ता.19) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या वेळी श्री. ठाकरे यांनी या पदाधिकाऱ्यांना चांगले काम करून दाखविण्याचा सल्ला दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

औरंगाबाद - महापालिकेतील शिवसेनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर जाऊन सोमवारी (ता.19) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या वेळी श्री. ठाकरे यांनी या पदाधिकाऱ्यांना चांगले काम करून दाखविण्याचा सल्ला दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

नवनिर्वाचित उपमहापौर स्मिता घोगरे व नवनियुक्‍त सभागृहनेते गजानन मनगटे आणि गटनेता मकरंद कुलकर्णी यांनी सोमवारी (ता.19) सकाळी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत आमदार संजय शिरसाट आणि जिल्हाप्रमुख अंबादास दानवे उपस्थित होते. उपमहापौरपदासाठी शिवसेनेने अपक्ष नगरसेविका स्मिता घोगरे यांना संधी दिली. या बदलाबरोबरच पक्षाने सभागृहनेता आणि गटनेताही बदलून त्या पदावर गजानन मनगटे आणि मकरंद कुलकर्णी यांची निवड केली. या निवडीनंतर तिन्ही पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागतिली होती. त्यानुसार सोमवारी सकाळी ही भेट झाली. या वेळी श्री. ठाकरे यांनी तुम्ही नवीन असून पक्षाने तुम्हाला संधी दिली, आता चांगले काम करून दाखवा, अशी सूचना केल्याचे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, महापालिकेतील या तीनही पदांवर नव्यांना संधी दिल्याने पक्षातील ज्येष्ठ नगरसेवक विकास जैन, राजू वैद्य, नंदकुमार घोडेले, तसेच इतरही काही नगरसेवक नाराज झाले होते. त्यांनी ही नाराजी नेत्यांमार्फत मुंबईला कळविली होती. तसेच उद्धव ठाकरे यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली होती; मात्र नवीन पदाधिकाऱ्यांना भेट देणाऱ्या पक्षप्रमुखांनी या नाराज नगरसेवकांना मात्र अद्यापही भेटीसाठी वेळ दिली नाही हे विशेष!

Web Title: aurangabad shivsena politics