घनसावंगीच्या शिक्षकाचा औरंगाबादेत निर्घृण खून 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - शिंदेवडगाव (ता. घनसावंगी, जि. जालना) येथील शिक्षकाचा दगड, फरशीने ठेचून निर्घृण खून करण्यात आला. शिक्षकाच्या तोंडावर ऍसिड टाकून त्यांची ओळख लपविण्याचा प्रयत्न केला. विशेषत: खुनानंतर रेल्वे रुळावर शिक्षकाला आडवे टाकण्यात आले. ही गंभीर घटना बुधवारी (ता. 21) सकाळी साडेआठच्या सुमारास उघड झाली. 

औरंगाबाद - शिंदेवडगाव (ता. घनसावंगी, जि. जालना) येथील शिक्षकाचा दगड, फरशीने ठेचून निर्घृण खून करण्यात आला. शिक्षकाच्या तोंडावर ऍसिड टाकून त्यांची ओळख लपविण्याचा प्रयत्न केला. विशेषत: खुनानंतर रेल्वे रुळावर शिक्षकाला आडवे टाकण्यात आले. ही गंभीर घटना बुधवारी (ता. 21) सकाळी साडेआठच्या सुमारास उघड झाली. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार दत्तात्रय माधवराव पोकळे (वय 43, रा. शिंदेवडगाव, जि. जालना) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक पाच येथील रेल्वे रुळावर मृतदेह एका प्रवाशाला दिसला. त्यांनी ही बाब रेल्वेस्टेशन मास्तर यांना सांगितली. स्टेशन मास्तर यांनी लोहमार्ग पोलिसांना ही बाब कळविल्यानंतर सहायक निरीक्षक बी. डी. कांबळे, आनंद बनसोडे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. श्‍वानपथकाला पाचारण करण्यात आले. श्‍वान रुळालगतच घुटमळले. 

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह अर्धनग्न अवस्थेत होता, तसेच शेजारी फरशी व दगड पडलेला होता. पोलिसांनी खिशांची चाचपणी केल्यानंतर जालना ते औरंगाबाददरम्यानचे त्यांच्याकडे तिकीट होते; तसेच आधारकार्ड व डायऱ्याही पोलिसांना सापडल्या. दत्तात्रय माधवराव पोकळे असे आधारकार्डवर नाव व पत्ताही होता. त्यामुळे त्यांची लगेचच ओळख पटली. घटनास्थळी पिशवी व त्यात काही कागदपत्रेही सापडली. 

या घटनेनंतर शिक्षकाच्या नातेवाइकांना माहिती देऊन पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात दाखल केला. या प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाच्या गुन्ह्याची लोहमार्ग पोलिस ठाण्यात नोंद झाली. सायंकाळी मृताचे नातेवाईक आल्यानंतर या प्रकरणाची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 

निकालाआधीच... 
पानेवाडी (ता. घनसावंगी) येथील महात्मा फुले विद्यालयात पोकळे शारीरिक शिक्षक होते. शिंदेवडगाव येथे टेलरिंगचे काम करून त्यांनी "बीपीएड'पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. नोकरी मिळावी, म्हणून पोकळे यांनी शेतजमीन विकून आठ ते दहा लाख रुपये नोकरीसाठी भरले होते. त्या वेळी शाळा विनाअनुदानित होती. काही वर्षे शिक्षकाची नोकरी केल्यानंतर शाळेला अनुदान सुरू झाले; पण अनुदान सुरू झाल्यानंतर पोस्ट बसत नसल्याचे सांगत संस्थेने पोकळे यांना नोकरीवरून काढले होते. याविरोधात पोकळे यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. मंगळवारी (ता. 21) न्यायालयात तारीख असल्याने ते औरंगाबादेत आले होते. त्यानंतर मात्र त्यांचा खून झाला. यामुळे खुनाचे गूढ वाढले आहे. या आठवड्यातच याचिकेवर निर्णय होणार होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

मारेकरी दोनपेक्षा अधिक 
शिक्षकाचा अत्यंत निर्घृणपणे खून झाला. त्यांच्यावर कुणाची तरी पाळत असावी, दोनपेक्षा अधिक जणांनी त्यांचा खून केल्याची शक्‍यता आहे. आधी डोक्‍यात दगड व फरशीने ठेचण्यात आले, त्यानंतर हल्लेखोरांनी शिक्षकाच्या तोंडावर ऍसिड टाकल्याची प्राथमिक माहिती आहे. 

दीड महिन्यात दुसरी घटना 
रेल्वेस्थानकातील मालधक्‍क्‍यावर याकूब जोसेफ कांबळे या मुलाचा खून झाला. त्यानंतर दत्तात्रय पोकळे या शिक्षकाचा खून झाला. दीड महिन्यात दोन खून झाले. स्थानकातील खुनांच्या प्रकारामुळे सुरक्षेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे. 

Web Title: Aurangabad teacher brutally murder