तापमानाची चाळीशी कायम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 मे 2017

बुधवारपर्यंत (ता.17) वातावरण ढगाळ राहिले तरी शहराचे तापमान 40 अंश आणि त्याच्या वर राहण्याची शक्‍यता आहे. गुरुवारपासून (ता.18) वातावरणात बदल होईल. त्यानंतर तापमानात वाढ होईल आणि आकाशही निरभ्र होण्याची शक्‍यता आहे

औरंगाबाद - तापमानाचा पारा वाढत असतानाच औरंगाबादवर गेल्या चार दिवसांपासून ढगांनी अचानक केलेल्या गर्दीमुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. कालच्या पावसाने थोडा गारवा निर्माण झाला असला तरी तापमानाचा पारा मात्र अद्याप चाळिशीच्या खाली आलेला नाही.

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तापमानाचे आकडे 41 अंशांच्या आसपास राहिले. दुसऱ्या आठवड्यात तापमानात बदल झाले मात्र पारा 40 अंशांच्या खाली आलेला नाही. गुरुवारपासून (ता. 11) शहरावर ढगांची गर्दी होत आहे. त्यात शनिवारी शहरात काहीकाळ पावसाने हजेरी लावली. या पावसाची 6.6 मिलिमीटर एवढी नोंद झाली. त्यामुळे शनिवारी सायंकाळी शहरवासीयांना काहीसा गारवा अनुभवता आला. असे असले तरी रविवारी (ता.14) तापमानात विशेष फरक पडला नाही. शनिवारी (ता.13) 41 अंश तापमान नोंदविले होते. रविवारी (ता.14) हा आकडा 40.6 अंशांपर्यंत खाली आला. किमान तापमानाचा आकडाही 26 अंशांवर कायम राहिला.

बुधवारपर्यंत पावसाचा अंदाज
औरंगाबाद शहर परिसरात झालेला वातावरणातील बदल हा किमान तीन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याच्या वतीने वर्तविण्यात आला आहे. बुधवारपर्यंत (ता.17) वातावरण ढगाळ राहिले तरी शहराचे तापमान 40 अंश आणि त्याच्या वर राहण्याची शक्‍यता आहे. गुरुवारपासून (ता.18) वातावरणात बदल होईल. त्यानंतर तापमानात वाढ होईल आणि आकाशही निरभ्र होण्याची शक्‍यता आहे. किमान तापमानातही घट होण्याची शक्‍यता असून ते 23 अंशांपर्यंत खाली येण्याची चिन्हे आहेत.

Web Title: Aurangabad witness temperature around 40 degrees