शिवसेनेचा अध्यक्ष, कॉंग्रेसचा उपाध्यक्ष? 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

औरंगाबाद - जिल्हा परिषदेत पंचायत समितीप्रमाणेच शिवसेना-कॉंग्रेस एकत्र येणार हे जवळपास निश्‍चित झाले असून, शिवसेनेचा अध्यक्ष तर कॉंग्रेसचा उपाध्यक्ष राहणार आहे. चारपैकी प्रत्येकी दोन सभापतिपदे दोन्ही पक्ष वाटून घेणार आहेत. मुंबईत दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या झालेल्या बैठकीत हे सत्तेचे सूत्र पक्के करण्यात आले आहे. सध्या शिवसेना-कॉंग्रेसचे 34 तर भाजप, राष्ट्रवादी, मनसे, एक अपक्ष असे 28 सदस्य दुसऱ्या बाजूने आहेत. शिवसेनेकडून सध्या अध्यक्षपदासाठी चौघांची नावे चर्चेत आहेत. 

औरंगाबाद - जिल्हा परिषदेत पंचायत समितीप्रमाणेच शिवसेना-कॉंग्रेस एकत्र येणार हे जवळपास निश्‍चित झाले असून, शिवसेनेचा अध्यक्ष तर कॉंग्रेसचा उपाध्यक्ष राहणार आहे. चारपैकी प्रत्येकी दोन सभापतिपदे दोन्ही पक्ष वाटून घेणार आहेत. मुंबईत दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या झालेल्या बैठकीत हे सत्तेचे सूत्र पक्के करण्यात आले आहे. सध्या शिवसेना-कॉंग्रेसचे 34 तर भाजप, राष्ट्रवादी, मनसे, एक अपक्ष असे 28 सदस्य दुसऱ्या बाजूने आहेत. शिवसेनेकडून सध्या अध्यक्षपदासाठी चौघांची नावे चर्चेत आहेत. 

जिल्हा परिषदेत एका पुरस्कृत सदस्यासह भाजप 23 जागा जिंकून सर्वांत मोठा पक्ष ठरला होता. मात्र शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांच्या निर्णयामुळे भाजपला मोठा पक्ष असूनही जिल्हा परिषदेत सत्तेपासून दूर राहण्याची वेळ आली आहे. औरंगाबाद, सोयगाव पंचायत समितीमध्ये कॉंग्रेस-शिवसेना युती झाली तर वैजापूरमध्ये भाजप-राष्ट्रवादी एकत्र आले. सत्तेसाठी जिल्ह्यात हे विचित्र समीकरण तयार झाले आहे. आता हेच समीकरण जिल्हा परिषदेतसुद्धा बघायला मिळणार आहे. 

शिवसेनेत अध्यक्षपदासाठी रस्सीखेच 
शिवसेनेकडून अध्यक्षपदासाठी चौघांची नावे चर्चेत आहेत. यामध्ये कन्नड तालुक्‍यातील शुभांगी काजे, पैठण तालुक्‍यातील मनीषा सोलाट, वैजापूरमधील वैशाली पाटील तर गंगापूरमधील देवयानी डोणगावकर यांची नावे चर्चेत आहेत. शिवसेनेकडे ओबीसी जात वैधता प्रमाणपत्र असलेल्या सात महिला सदस्य आहेत. प्रत्येक जण आपल्याच गटातील सदस्य अध्यक्ष व्हावा यासाठी प्रयत्न करताना दिसतो. यामध्ये पैठण तालुक्‍यात सात तर पैठण मतदारसंघातून आठ सदस्य विजयी झाल्याने पैठण तालुक्‍यातील मनीषा सोलाट यांनी अध्यक्षपदावर दावा केला आहे. आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी संजना जाधव यांचा पराभव करणाऱ्या शुभांगी काजे यांचे नावसुद्धा आघाडीवर आहे. यासाठी स्वतः खासदार चंद्रकांत खैरे प्रयत्नशील आहेत. देवयानी डोणगावकर यासुद्धा अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. वैजापूरमध्ये रामकृष्ण बाबा पाटील यांचा भविष्यात पाठिंबा मिळावा यासाठी वैशाली पाटील यांचे नावसुद्धा चर्चेत आले आहे. 

सदस्य फोडाफोडीचा प्रयत्न 
जिल्हा परिषदेतही कॉंग्रेस-शिवसेना दोन्ही पक्ष एकत्र येणार याची कल्पना आल्याने भाजपने हालचाली करत कॉंग्रेसचे पाच ते सहा सदस्य फोडण्याची व्यूहरचना आखली होती. मात्र कॉंग्रेस नेत्यांनी सदस्य वेळीच मुंबईला सहलीवर पाठविल्याने हा धोका आता कमी झाला आहे. भाजपने राष्ट्रवादीचे तीन, मनसेचा एक, एक अपक्ष सदस्य अशी 28 सदस्यांची जुळवाजुळव केली आहे. तरीही ऐनवेळी काही सदस्य फुटतील का? याची भीतीसुद्धा कॉंग्रेस-शिवसेनेला आहे. 

ठरविला सत्तेचा फॉर्म्युला 
शिवसेना-कॉंग्रेस नेत्यांनी बैठकीत सत्तेचा फॉर्म्युला ठरविला आहे. शिवसेनेकडून विनोद घोसाळकर, खासदार चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी तर कॉंग्रेसकडून आमदार अब्दुल सत्तार, कल्याण काळे, नामदेव पवार यांनी चर्चा करून अध्यक्षपद शिवसेनेला तर उपाध्यक्षपद कॉंग्रेसला, तर चारपैकी प्रत्येकी दोन सभापतिपदे दोन्ही पक्षांनी घ्यायची हा फॉर्म्युला ठरला आहे. यामध्ये बांधकाम, अर्थ समिती सभापती कॉंग्रेसचे पक्के मानले जात आहे. 

वैजापूर पंचायत समितीमध्ये भाजप-राष्ट्रवादी एकत्र आल्याने येथे दोघांचा सभापती, उपसभापती झाला आहे. आता जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत आमचे तीनही सदस्य भाजपला पाठिंबा देणार आहेत. 
- आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी) 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. अध्यक्ष-उपाध्यक्षसाठी मी भाजपला पाठिंबा देणार आहे. भाजपची सत्ता असल्याने राज्य शासनाकडून मतदारसंघाच्या विकासासाठी मदत होईल. 
- विजय चव्हाण (मनसे जिल्हाध्यक्ष तथा जि. प. सदस्य) 

पंचायत समितीमध्ये आम्ही भाजपला पाठिंबा दिला होता. आता जिल्हा परिषदेतसुद्धा आम्ही भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही कॉंग्रेस-शिवसेनेच्या विरोधात मतदान करू. 
- रमेश गायकवाड (जि. प. सदस्य, रिपाइं डी) 

Web Title: aurangabad zp election