औरंगाबाद - इंग्रजीच्या पहिल्याच पेपरला नियमांचा फज्जा 

12th Board Exam -  Violation of rules to English papers
12th Board Exam - Violation of rules to English papers

औरंगाबाद : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेला मंगळवारी (ता.१८) सुरुवात झाली. पहिलाच पेपर इंग्रजीचा असल्याने प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात नियोजन करण्यात आले होते. परंतू, पहिल्याच पेपरला शिक्षण मंडळाच्या नियमांचा फज्जा उडाला होता. ग्रामीण भागातील काही केंद्रामध्ये भौतिक सुविधांचा अभाव; तर काही केंद्रांवर पेपर सुरु असताना विद्यार्थ्यांकडे चक्क मोबाईल आढळले. 

कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासंदर्भात शिक्षण विभाग, एसएससी बोर्ड व पोलिस प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आली असली तरी ग्रामीण भागातील काही केंद्रावर नियमावली धाब्यावर बसवण्यात आली होती. औरंगाबाद तालुक्यातील केंद्र क्रमांक ४० (ढवळापुरी) येथे पेपर सुरु झाल्यानंतर सुमारे एक तासानंतर मुलांची तपासणी केली असता, अनेक विद्यार्थ्यांकडे नवनीत गाईड, मोबाईल, पॉकेट गाईड असे साहित्य आढळून आले. तसेच परीक्षार्थ्यांनी चप्पल, बूट, सॉक्स, बेल्टसह परीक्षा कक्षात प्रवेश देण्यात आला होता. 

हे ही वाचा -  शाळांच्या अनुदानाची वाट मोकळी  

शहरी भागात चोख व्यवस्था 
शहरी भागात अनेक केंद्रांवर नियमांचे तंतोतंत पालन करण्यात आले होते. परीक्षार्थीं मंगळवारी परीक्षा केंद्रांवर पेपरपूर्वी अर्धा तास आधी हजर होते. त्यामुळे पालकांची प्रचंड गर्दी झाली होती. पोलिसांचाही चोख बंदोबस्त होता. परीक्षार्थींना चप्पल, बूट, सॉक्स, बेल्ट बाहेर ठेवून परीक्षा कक्षामध्ये प्रवेश देण्यात आला होता. तसेच मोबाईल, कॅमेरा, स्मार्ट वॉच, स्मार्ट पेन असे तांत्रिक साहित्य वापरण्यास बंदी घालण्यात आली होती. तसेच पर्यवेक्षक, कर्मचारी यांना परीक्षा केंद्रांवर मोबाईल वापरण्यास बंदी होती. 


सात भरारी पथकांची नजर 
बारावीची परीक्षा १८ मार्चपर्यंत जिल्ह्यातील १४२ केंद्रांवर परीक्षा सुरु राहणार आहे. कॉपीमुक्त अभियानासाठी जिल्ह्यात एकूण सात भरारी पथके नेमली आहेत. जिल्हा प्रशासनाची भरारी पथके, दक्षता पथके गोपनीय पद्धतीने कार्यरत असल्याचे शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले. 


भौतिक सुविधांचा होता अभाव 
सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. सकाळी अकरा ते दोन व दुपारी तीन ते सहा यावेळेत पेपर घेण्यात येत आहे. ग्रामीण भागातील ढवळापुरी या केंद्रातील पाच ते सहा परीक्षा कक्ष पत्र्याचे होते. या परीक्षा कक्षात फॅन व लाईटची व्यवस्था नसल्यामुळे ऐन उन्हाळ्यात विद्यार्थी घामाघूम होवून अंधाऱ्या कक्षात पेपर सोडवताना दिसत होते. या भौतिक सुविधांच्या अभावाचा विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. 
-- 
एकाच कक्षात ४८ विद्यार्थी 
केंद्रातील एका कक्षात २५ पेक्षा जास्त विद्यार्थी बसवू नये, असा शिक्षण मंडळाचा नियम असताना औरंगाबाद तालुक्यातील केंद्र क्रमांक ४३ (लाडसावंगी येथील जि.प. शाळेच्या केंद्रामधील दोन खोल्यांमध्ये ४८-४८ विद्यार्थी बसवण्यात आले होते. 

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावी परीक्षेसाठी औरंगाबाद जिल्ह्यातील १४२ केंद्रावर एकूण ६२ हजार ७९२ विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत. यामध्ये ३८ हजार१८४ मुले तर २४ हजार ६०८ मुलींची संख्या आहे. आपल्या पाल्यांना सोडण्यास आलेल्या पालकांमुळे शहरातील प्रत्येक परीक्षा केंद्राबाहेर प्रचंड गर्दी झाली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com