मोसंबी बाजारात २५ लाखांची उलाढाल

पाचोड येथील चित्र ः तब्बल पाच महिन्यांनंतर बाजारपेठ गजबजली; रोज सव्वाशे टन मोसंबीची आवक
25 lakhs turnover in pearceite market
25 lakhs turnover in pearceite market

पाचोड - उत्पादनाअभावी पाच महिन्यांपासून बंद असलेली पाचोड (ता.पैठण) येथील मोसंबी खरेदी-विक्रीची बाजारपेठेत सुरु झाली असून रोज येते जवळपास शंभर ते सव्वाशे टन मोसंबीची आवक होत आहे. मोसंबी खरेदी विक्रीतून येथे रोज पंचवीस लाखांवर उलाढाल होत आहे. यामुळे बळिराजाने समाधान व्यक्त केले आहे.

तालुक्यात साडेनऊ हजार हेक्टरवर मोसंबीचे क्षेत्र लागवडीखाली असूनही विक्रीसाठी शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांची वाट पाहण्याशिवाय पर्यायच नव्हता. तुर्तास येथे उभारण्यात आलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शासकीय जागेवर त्रेपन्न नोंदणीकृत व्यापारी, आडत्यांची दुकाने असून येथे औरंगाबाद, जालना, बीड व अहमदनगर जिल्ह्यातील मोसंबी विक्रीसाठी येत आहे. बाजारपेठेची व्याप्ती, होणारी बाजारातील मोसंबीची आवक पाहून दिल्ली, बंगळूर, पुणे, हैदराबाद, अहमदाबाद येथील व्यापारी तळ ठोकून असतात. या बाजारपेठेमुळे आंबट झालेली मोसंबी गोड बनली. आंब्या बहाराच्या फळांना १८ ते २२ हजार रुपये प्रति टनाचा भाव मिळत असून शुक्रवार वगळता दररोज बाजारपेठेत "बोली" चे स्वर गुंजत आहे.

ओस पडलेली बाजारपेठ पाच महिन्यांनंतर नव्याने सुरु करण्यात आल्याने मोसंबी उत्पादक, स्थानिक व परराज्यातील मजुरांनी गजबजून गेली आहे. सकाळपासून रात्री दहा वाजेपर्यंत मार्केट यार्डात गजबज पाहावयास मिळत आहे. एरवी पाच महिने सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता. मोसंबीला स्थानिक बाजारपेठ उपलब्ध झाल्याने बागा उतरवण्यापासून प्रतवारी करून वाहन भरून देईपर्यंत शेकडो मजुरांची गरज वाढली. बाजारपेठेत एक हजारापेक्षा अधिक मजूरांना रोजगार मिळाला. एवढेच नव्हे तर मजूराप्रमाणेच शेकडो वाहनधारक, वजनकाटा चालकांनाही हक्काचा रोजगार मिळाला.

सध्या दररोज शंभर ते सव्वाशे टन मोसंबीची आवक होऊन पंचवीस ते तीस लाख रुपयाची प्रतिदिवस उलाढाल होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीलाही यातून उत्पन्न सुरु झाले. दररोज येथे मोसंबीचे ४० ते ५० ट्रक दिल्ली, आग्रा, बंगळूर, हैदराबाद, मथुरा, अहमदाबाद, बनारस आदी ठिकाणी पाठविले जातात. एका ट्रकमध्ये १६ ते २० टन मोसंबी भरण्यात येते. मजुरांना मोसंबीची बाजारपेठेत येणारे वाहन रिकामे करण्यासाठी पन्नास रुपये प्रति टन तर भरण्यासाठी २०० रुपये प्रति टनाप्रमाणे मजुरी दिली जाते. फळ तोडणीसाठी महिलांना ३०० तर युवकांना ४०० रुपये मजुरी दिली जाते. तोलाई करण्यासाठी वजन काट्यावाल्या कडून लहान वाहनास ५० तर मोठ्या वाहनांकडून १०० रुपये शुल्क आकारतात. आठ दिवसांपासून सुरू झालेला हा हंगाम आठ महिने अव्याहतपणे तर कधी मोसंबीच्या उपलब्धतेपर्यंत चालतो,हा हंगाम सर्व बेरोजगारासाठी पर्वणीकाळच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com