
औरंगाबाद : अपघात करणाऱ्या अधिकाऱ्याच्या मुलाला वाचवण्यासाठी खटाटोप
औरंगाबाद : गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अपघाताच्या गुन्ह्यात अडकलेल्या पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाला वाचवण्यासाठी त्याच्याऐवजी डमी आरोपी उभा करुन त्याच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या पोलिसांच्या कृतीविरुध्द मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झालेली आहे. यात न्यायमूर्ती व्ही. के. जाधव आणि न्यायमूर्ती एस. सी. मोरे यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक, पोलिस आयुक्तांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.
नगर रोडवरील ढोरेगाव येथील राधिका पेट्रोलपंपासमोर १८ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास एका कारने मोटार सायकलस्वार बाबासाहेब बोराडे यांना धडक दिली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. बाबासाहेब यांचे भाऊ पुंजाराम यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार अमरजित बावीस्कर याच्याविरुध्द गुन्हाही दाखल झाला. परंतु, न्यायालयात मात्र रिक्षाचालक रवी सोनीराम काकडे याच्याविरुध्द दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. हे दोषारोपपत्र लक्षात घेऊन पुंजाराम बोराडे यांनी ॲड. रविंद्र गोरे यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली. अॅड. गोरे यांनी युक्तीवाद केला की, आरोपी अमरजित हा पोलिस अधिकाऱ्याचा मुलगा आहे. तसेच अपघाताच्या वेळी त्याचा कारचा विमा नसल्याने त्याला नुकसान भरपाईपासून आणि गुन्ह्यापासून वाचवण्यासाठी पोलिसांनी डमी आरोपी उभा केला आहे. पोलिसांनी अशी केस तयार केली की, बाबासाहेबांच्या दुचाकीचा रवि काकडे याच्या रिक्षाला धक्का लागला. त्यामुळे मोटारसायकल व बाबासाहेब हे डिवायडरला धडकले व पलिकडच्या रस्त्यावर नगरकडून येणाऱ्या कारला त्याची दुचाकी धडकली. या गुन्ह्यात सीसीटीव्ही फुटेजचा पुरावा दाखल करणे गरजेचे असताना तो दाखल केलेला नाही. डमी आरोपी उभा करताना दाखवलेली रिक्षा भंगारमधील आहे. रवि काकडे याचा गंगापूरचा पत्ता दाखवला असला तरी तो तेथे राहात नाही.
पंचनाम्यात अमरजित याची कार आणि बाबासाहेब याची दुचाकी यांच्यात अपघात झाल्याचा उल्लेख टाळला आहे. अमरजीतच्या कारचे बंपर फुटलेले व त्याला रक्त लागलेले असल्याचे सिध्द करणारा साक्षीदार उपलब्ध आहे. डमी असलेल्या आरोपी रवि याने आपला निष्काळजीपणा मान्य केल्यासारखा आहे. या सर्व गोष्टीवरुन अमरजित याला वाचवण्यासाठीच डमी आरोपी उभा केल्याचा दावा याचिकेत करण्यात आलेला आहे. या युक्तिवादानंतर न्यायालयाने पोलिस अधिक्षक आणि पोलिस आयुक्त यांना नोटीस बजावण्याचा आदेश दिले आहे. या प्रकरणी ॲड. गोरे यांना अॅड. चंद्रकांत बोडखे, अॅड. स्वप्नील मुळे व अॅड. पल्लवी वांगीकर सहकार्य करीत आहेत.
Web Title: Accident Victims Caused Save The Officer Son Superintendent Of Police
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..