औरंगाबाद : रीडिंगनुसार ग्राहकांना येणार पाण्याचे बिल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

water-tax

औरंगाबाद : रीडिंगनुसार ग्राहकांना येणार पाण्याचे बिल

औरंगाबाद : आम्हाला पाणीपट्टी(water tax) जास्त आली, आमचा वापर कमी असतानाही पाणीपट्टी वाढून येत आहे, अशा तक्रारी नेहमीच ऐकायला येतात. यामुळे आता विद्युत मीटरच्या धर्तीवर नळांनाही जलमीटर बसणार आहेत. नळधारक जेवढे पाणी वापरेल. त्यानुसार त्यांना पाणीबिल भरावे लागणार आहे. या वर्षभरात शहरातील तब्बल २ हजार ७०० व्यावसायिक नळांना हे जलमीटर बसवले जाणार आहेत. महापालिका प्रशासनाने(aurangabad carporation) यासाठी तब्बल १३ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

हेही वाचा: 95वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणेंची निवड; पाहा व्हिडिओ

राज्य सरकारने औरंगाबाद शहरासाठी १६८० कोटी रुपयांची नवीन जलयोजना मंजूर केली आहे. या योजनेचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. योजना पूर्ण करताना शहरातील नळांना मीटर बसविण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात व्यावसायिक नळांना मिटर बसविण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत शहरातील सुमारे ५ हजार व्यावसायिक नळांना जलमीटर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अल्ट्रॉसॉनिक स्मार्ट प्रकारचे हे जलमीटर राहणार आहेत. मोठ्या आकाराच्या नळ कनेक्शनच्या एका जलमीटरची किंमत लाखाहून अधिक असण्याची शक्यता आहे. यासाठी ५ हजार मिटरसाठी तब्बल १३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेच्या नोंदीनुसार शहरात सध्या २ हजार ७०० एवढे व्यावसायिक नळ आहेत. वर्षभरात शहरातील सर्व व्यावसायिक नळांना मिटर लागतील, असे महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी नववर्षाच्या संकल्प अहवालात नमूद केले आहे.

हेही वाचा: Aurangabad Crime : वाळूज परिसरात सात घरफोड्या, लाखोंचा ऐवज चोरला

औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या संचालक मंडळाच्या बैठकीत विषयाला मंजुरी देण्यात आली आहे. या कामासाठी आता लवकरच निविदा प्रसिद्ध केली जाणार आहे. सुमारे पाच हजार नळांसाठी १३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यापूर्वी समांतर जल योजनेत शहरातील नळांना मीटर बसविण्याचा निर्णय झाला होता. त्यावेळी मीटरच्या किमतीवरून मोठा वाद झाला. त्यामुळे स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत बसविल्या जाणाऱ्या जलमीटरची किंमत किती असेल, ती रक्कम महापालिका भरणार की व्यावसायिक नळधारकांकडून केली जाणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

व्यावसायिक नळांना बसवले जाणारे मीटर अत्याधुनिक पद्धतीचे अल्ट्रासॉनिक स्मार्ट मिटर असतील. त्यामुळे कर्मचाऱ्यांना जलमीटरची रीडिंग घेणे अत्यंत सोपे जाणार आहे. त्या भागातून फेरफटका मारला तरी मीटरची रीडिंग कळेल, असे तंत्रज्ञान या जलमीटरमध्ये असेल. महापालिकेने विविध आकाराचे व्यावसायिक आकाराचे नळ कनेक्शन दिलेले आहेत. त्यात पाऊन इंचापासून ते आठ इंचापर्यंतच्या कनेक्शनचा समावेश आहे. मोठ्या आकाराच्या कनेक्शनसाठीच्या जलमीटरची किंमत लाखाच्यावर असू शकते, असा अंदाज त्यांनी स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी येथील निवासी डॉक्टर संपावर

मीटर लागल्यानंतर पाणीपट्टी येणार कमी

सध्या महापालिकेकडून अर्धा इंची व्यावसायिक नळासाठी वर्षाची २० हजार रूपये पाणीपट्टी वसूल केली जाते. नळांच्या आकारानुरूप सर्वाधिक पाणीपट्टी रक्कम ही वर्षाकाठी १० लाखापर्यंतही आकारली जाते. सद्यः स्थितीत पालिका पाचव्या ते सहाव्या दिवशी पाणीपुरवठा करते. त्यामुळे मिटर लागल्यास ग्राहकांना कमी पाणीपट्टी येऊ शकते, असे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Aurangabad NewsWater Bill
loading image
go to top