Ahilyadevi Holkar Jayanti : महान योद्धा अहिल्यादेवी होळकर आणि अस्वस्थ वर्तमान! Ahilyadevi Holkar Jayanti Punyashloka sambhaji nagar news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ahilyadevi Holkar Jayanti

Ahilyadevi Holkar Jayanti : महान योद्धा अहिल्यादेवी होळकर आणि अस्वस्थ वर्तमान!

अखंड भारत वर्षाचा दैदिप्यमान इतिहास संपूर्ण जगाला थक्क करणारा असून महाराष्ट्राच्या मातीने आपल्या कार्य-कर्तृत्वाचा ठसा भारताच्या ललाटी स्पष्टपणे उमटवून आपली कायम ओळख निर्माण केली आहे. मग तो १८५७ चा उठाव असो, पानिपतचा रणसंग्राम असो किंवा भारतीय स्वातंत्र्य युद्ध असो, इथला बहाद्दर मराठी योद्धा नेहमीच अग्रेसर राहिला आहे ! या सर्वच दैदिप्यमान इतिहासामध्ये स्त्रीयांचे योगदानसुद्धा तेवढेच महत्वपूर्ण आहे ! अगदी झाशीची राणी, जिजाऊ आईसाहेब यांचे योगदान इतिहासाने नोंदवून ठेवले आहे.

मात्र या सर्वच लढाऊ बाण्याच्या स्त्रियांमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे स्थान दिपस्तंभासारखे आहे ! अठराव्या शतकांत मराठ्यांच्या इतिहासामधील बाजीराव पेशव्यांचे माळवा प्रांताचे सरदार श्री मल्हारराव होळकर यांनी अहिल्यादेविंना आपली सून करून घेतले. वयाच्या ८ व्या वर्षी विवाह आणि वयाच्या २९ व्या वर्षी त्यांना वैधव्य आले. सासरे श्री मल्हारराव होळकरांनी आपल्या सुनेला आपल्या मुलीसारखे सांभाळून सती जाण्यास प्रतिबंध केला.

त्यानंतर त्यांनी १२ वर्षे आपल्या सासऱ्यांना राज्यकारभार करायला मदत केली. दुर्दैवाने १७६६ साली श्री मल्हारराव होळकर यांचे निधन झाले आणि राज्यकारभाराची संपूर्ण जबाबदारी श्रीमती अहिल्याबाई यांच्यावर येऊन पडली.

अठरावं शतक म्हणजे सर्वत्र कर्मकांड आणि जुनाट परंपरांनी थैमान घातलेलं असतांना अहिल्यादेविंना पेशव्यांनी माळवा प्रांत सांभाळण्याची परवानगी दिली आणि तेथूनच सुरु झाला त्यांचा थक्क करून सोडणारा राजकीय आणि सामाजिक कार्याचा अलौकिक प्रवास ! तत्कालीन समाजाने स्त्री केवळ चूल आणि मुल, पडदा पद्धती (घोषा) मध्ये बंदिस्त केलेली असतांना अहिल्यादेवींनी सर्व बंधने झुगारून रयतेसाठी कार्य करायचे ठरवले. काही बुरसटलेल्या परंपरावाद्यांनी देवींना राज्य करण्यास विरोध केला, मात्र कुणाच्याही विरोधाला त्यांनी भिक घातली नाही. पुत्र भोळसर असल्यामुळे मल्हाररावांचे दत्तकपुत्र तुकोजीराव होळकरांना माळवा सैन्याचा सेनापती नेमले आणि मोठ्या सन्मानाने माळवा प्रांताचा कारभार सुरु केला.

मातोश्री अहिल्यादेवींच्या मातृहृदयाला तत्कालीन अडचणींची जाण होती. आपल्या राज्यात कुठेही स्त्रीवर आणि गरीबांवर अन्याय-अत्याचार होणार नाही याची सदोदित काळजी घेतली. त्यांनी सामान्य लोकांचे प्रश्न एकूण घेण्यासाठी आणि समस्येची सोडवणूक करण्यासाठी नियमित जनता दरबार भरवायला सुरुवात केली. त्यांच्या जनता दरबारात शेतकरी आणि स्त्रियांच्या समस्या आणि प्रश्नांना विशेष प्राधान्य होते.

शेतकरी आणि गृहिणी जर सुखी राहीले तर प्रत्येक घर आनंदाने बहरून येईल हे लोकमानस मातोश्रींच्या ठिकाणी असल्याकारणाने त्यांनी हे दोन घटक प्राधान्याने सुधारणेसाठी समोर ठेवले होते. या जनता दरबाराचे फलित म्हणजे मातोश्रींनी शेतकऱ्यांसाठी सरकारी तिजोरीतून ठिकठिकाणी विहिरी आणि तलाव बांधून सिंचनाची व्यवस्था केली.

तसेच शेतकऱ्यांना छोटे उद्योग सुरु करण्यासाठी प्रोत्साहन देऊन गोपालन आणि अन्य व्यवसाय करण्यासाठी सहकार्य केले. त्या अनुषंगाने गावोगाव शेतकरी जागृतीसाठी मेळावे घेऊन लोकप्रबोधन केले. त्याशिवाय विधवा स्त्रियांना दत्तक पुत्र घेण्याचा अधिकार नाकारलेला असतांना स्त्रियांना दत्तक पुत्र घेणे, वडिलोपार्जित किंवा पतीची शेती आणि संपत्ती त्या स्त्रीच्या नावावर लावण्यासाठी त्या आग्रही राहिल्या आणि तशी सरकार दरबारी नोंद घेण्यास महसूल विभागांस आदेशित केले.

  काही दिवसांतच मातोश्रींची लोकप्रियता गगनाला भिडली आणि सामान्य लोकांबरोबरच विविध विषयांची जाण असणारे विद्वान, शास्त्री, पंडित, लेखक, कीर्तनकार, ज्योतिषी, पुजारी, वैद्य, हकीम मातोश्रींना भेटून लोकसेवेचा आग्रह धरू लागले. परिणामी त्यांच्या राज्यातील सामान्य जनतेला हे तज्ञ लोक सहज उपलब्ध होऊ लागले. त्यामुळे त्यांची महेश्वर नगरी विद्वानांचे माहेरघर म्हणून ओळखली जाऊ लागली. त्यांची राजधानी म्हणजे संगीत, कला आणि संस्कृतीचे आनंदभुवन झाले.

याशिवाय चोर, दरोडेखोर, भिल्ल आणि अन्य चोरी-लुटमार करणाऱ्या लोकांचे मन-मत परिवर्तीत करून त्यांना गाई-म्हशी-जमिनी देऊन शेती-उद्योग करण्यास प्रवृत्त केले. याचा परिणाम असा झाला की; त्यांच्या राज्यातील चोऱ्या, दरोड्यांचे प्रमाण कमी झाले, परंतु एवढे करूनही कुणी ऐकत नसेल त्यांना तोफेच्या तोंडी देऊन दुष्ट लोकांमध्ये दहशत पसरवली. तसेच त्यांनी राज्यांत सर्वत्र रस्ते आणि किल्ले बांधून आपले राजकीय कर्तृत्व सिद्ध करून दाखविले. अशाप्रकारे मातोश्री अहिल्यादेवी एक गुणग्राहक आणि जनकल्याणार्थ राज्यकारभार करणाऱ्या स्त्री राज्यकर्त्या म्हणून भारतभर नावारुपास आल्या !

मातोश्री अहिल्यादेवींचे कार्य केवळ त्यांच्या राज्यापुरते मर्यादित राहिले नाही. आपल्या माळवा प्रांतात अनेक हिंदू मंदिरांचा जिर्णोद्धार करून तिथे नियमित पुजेची व्यवस्था केली. त्याचबरोबर त्यांनी देशभर अनेक मंदिरांचा आणि विविध नदी घाटांचा जिर्णोद्धार करून आपल्या वैश्विक विचारांचे प्रकटीकरण केले. आपल्या राज्यातील श्रीमंत लोक मातोश्रींना नेहमी मदत करण्यास अग्रेसर असत. यातूनच त्यांनी भारतभर काशी, गया, सोमनाथ, अयोध्या, मथुरा, हरिद्वार, कांची, अवंती, द्वारका, बद्रीकेदार, रामेश्वर व जगन्नाथपुरी आदि ठिकाणी घाट बांधले तसेच तेथील मंदिरांचा जिर्णोद्धार केला. त्याचबरोबर महाराष्ट्रातील जवळपास सर्व जोतिर्लिंग आणि इतर मंदिरांची झालेली पडझड पाहून त्यांनी त्या मंदिरांचा देखील जिर्णोद्धार केला. परिणामी संपूर्ण देश त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी म्हणून ओळखायला लागला ! 

आज आपण भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करत असतांना, आज सुद्धा, महायोद्धा अहिल्यादेवी होळकर यांचेच राज्य आदर्श राज्य वाटायला लागते. आज देशात अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत. पाणी टंचाई, महागाई, बेरोजगारी, स्त्री असुरक्षितता, महागडे शिक्षण, धार्मिक कट्टरता आदी समस्या देशाला भेडसावत आहेत. सर्व राजकारणी संपत्ती कमावण्यात मश्गुल झाले असून पाच वर्षे देशाची लुट करायची आणि शेवटी त्यातील काही पैसे वाटून मतपेट्या विकत घ्यायच्या!

असा देशद्रोही, जीवघेणा दुष्ट खेळ चालू आहे! सर्वत्र स्त्रियांना ३३ टक्के आरक्षण दिल्याचा आव आणला जात असून स्त्रीला केवळ कळसूत्री बाहुली म्हणून वापरले जात आहे! सरपंच, सभापती, अध्यक्ष, आमदार, खासदार अशा महत्वपूर्ण ठिकाणी असलेल्या स्त्री प्रतिनिधी ह्या (काही अपवाद वगळता) आरक्षणाचा फायदा घेऊन देश लुटण्यासाठी बसवलेल्या केवळ शोभेच्या वस्तू आहेत की काय(?) असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. एकीकडे रणरागिणी अहिल्यादेवींचा उदोउदो करायचा आणि दुसरीकडे स्त्री शक्तीला बंदिस्त करायचे, वंचित ठेवायचे! हे पुरुषप्रधान समाजाचे दुटप्पी-बेगडी वागणे थांबले पाहिजे.

प्रत्येक स्त्रीला उच्चशिक्षित करून तिला स्वतंत्रपणे कारभारात सर्वत्र सहभागी करून घेणे ही काळाची गरज आहे. आज किती राजकीय पक्ष स्त्रियांना आमदार-खासदारकीची तिकिटे देतात? किती टक्के स्त्रिया विधानसभेत आणि लोकसभेत राज्य-देशाचे प्रतिनिधित्व करताहेत? दुर्दैवाने आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात एकही स्त्री मंत्री नाही! हा इथल्या तमाम स्त्री शक्तीचा अपमान नोव्हे काय? तिकडे दिल्लीत भर दिवसा, भर रस्त्यावर एका अल्पवयीन मुलीचा अमानुषपणे भोसकून, डोक्यात दगड घालून निर्घृण खून होतोय! हे सगळे ऐकून आणि पाहून मनाचा थरकाप उडाल्याशिवाय रहात नाही! हे सगळेच अत्यंत कळीचे मुद्दे असून,

स्त्रिया काय केवळ मतदानासाठीच आहेत का? त्या माणूस नाहीत का? हा प्रश्न ठासून विचारण्याची वेळ आज आली आहे. तेंव्हा, आज शिक्षित महिलांनी आपापल्यापरीने लिखाण आणि प्रबोधन करून स्त्री जागृतीसाठी अभियान सुरु करणे गरजेचे असून समाजसुधारक, विचारवंत, लेखक, कवी आदि पुरुष मंडळीनी त्यांना खंबीर साथ देण्याची वेळ आली आहे. तेंव्हा, चला तर मग, आज मातोश्री महान योद्धा अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी शपथ घेऊयात की; स्त्रियांना सर्वत्र समान प्रतिनिधित्व देऊन संपूर्ण भारत समृद्ध करूयात! असे झाले तरच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी झाल्याचे सार्थक होईल

प्रा.डॉ.विठ्ठल खंडूजी जायभाये