Atul Save : कर्जदाराच्या चकरा वाचविण्यासाठी बँकांनी करावी ‘चेक लिस्ट’ - अतुल सावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Atul Save Bank should make check list to save borrowers time loan money management

Atul Save : कर्जदाराच्या चकरा वाचविण्यासाठी बँकांनी करावी ‘चेक लिस्ट’ - अतुल सावे

औरंगाबाद : बँकांकडून विविध योजनांअंतर्गत कर्ज घेण्यासाठी जाणाऱ्यांना कागदपत्रांसाठी अनेक चकरा मराव्या लागतात. यामुळे कर्ज घेणारा कागदपत्रे तयार करण्यातच घायाळ होतो. यामुळे अनेक वेळा वादही होतात.

हा प्रकार टाळत कर्जदारास सुलभरित्या कर्ज मिळावे यासाठी बँकेने त्या योजनेसाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांसाठीची चेकलिस्ट तयार करावी. याच चेकलिस्टच्या माध्यमातून कर्जदार कागदपत्रे तयार करील. यासाठी बँकेने पुढाकार घ्यावा, असा सल्ला सहकारमंत्री अतुल सावे यांनी सोमवारी (ता.१३) दिला.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे लाभार्थ्यांसाठी चिकलठाणा येथील भाग्यलक्ष्मी लॉनवर संवाद मेळावा घेण्यात आला. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सहकारमंत्री अतुल सावे बोलत होते.

महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार हरिभाऊ बागडे, अनुराधा चव्हाण, बँक ऑफ महाराष्ट्राचे झोनल मॅनेजर महेश डांगे, लिड बँकेचे मॅनेजर महेश केदार, किशोर शितोळे, विजय औताडे, मनिषा मराठे, सुवर्णा मोहिते, सुनील कोटकर, अरुण नवले, सचिन मिसाळ, संभाजी राचूरे, गणेश दहिहंडे, अशोक मोरे, रमेश गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक आकाश मोरे यांनी प्रास्ताविक केले.

अतुल सावे म्हणाले, की नरेंद्र पाटील हे मराठा समाजातून उद्योजक तयार करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात फिरत आहेत. प्रत्येक मराठा समाजाचा तरुण उद्योजक झाला पाहिजे, अशी सर्वांची इच्छा आहे. बॅंकांनी कोणत्या योजनेसाठी काय कागदपत्रे लागतात,

याची एक चेक लिस्ट तयार करावी त्यानुसार कर्ज घेणाऱ्यांनाच त्याची माहिती सांगावी. त्यामुळे त्यांच्या चकरा वाचतील. तसेच योजनांसाठी बँकांनी सहकार्य करावे. एनपीए व इतर गोष्टी सरकार बघून घेईल, त्याची काळजी बँकांनी करु नये, असा टोलाही त्यांनी बँकांना लागावला.

यावेळी आमदार हरिभाऊ बागडे, महाबँकेचे झोनल मॅनेजर डांगे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विविध ३० बँकांचे स्टॉल लावण्यात आले होते. तसेच मराठवाड्यातील विविध जिल्‍ह्यातून लाभार्थी या मेळाव्यास आले होते. मेळाव्यात सचिन पेरे, सोमनाथ खांडेभराड, राहुल पोटफाडे, दिपाली पाटेकर, विशाल सोळंखे, रामेश्वर पाटोळे, दादासाहेब निकम यांचा प्रातिनिधीक स्वरुपात सत्कार करण्यात आला.

बँकांनी छोट्या ग्राहकांकडे लक्ष द्यावे ः नरेंद्र पाटील

एक लाख उद्योजक घडविण्याचे उद्दिष्ट मला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. त्यानुसार मी प्रत्येक जिल्ह्यात जाऊन संवाद मेळावा घेत आहे. यामुळे अनेक गोष्टी समोर आल्या. अनेक बँकांमध्ये परप्रांतीय व्यवस्थापक असल्यामुळे त्यांना महामंडळ कळत नाही. त्यामुळे कर्ज मंजूर करीत नाहीत. दुसरीकडे मोठ्या उद्योजकांना कर्ज देतात, ते पळून जातात. इकडे छोट्या ग्राहकांकडे बँका दुर्लक्ष करतात.

हे छोटे ग्राहक कर्ज बुडवत नाहीत, यामुळे या छोट्या ग्राहकांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले.

संजय राऊतांमुळे टीव्ही पाहणे बंद केले ः सावे

संजय राऊत रोज सकाळी नऊ वाजता काही ना काही बोलतात. त्यांचा आता लोकांना कंटाळा आला आहे. मी पूर्वी नाष्टा करताना टीव्ही पहायचो. मात्र, आता संजय राऊतांचे ‘लुज टॉक’ ऐकावे लागेल म्हणून आजकाल आम्ही टीव्ही पाहणे बंद केले असल्याचा टोला सावे यांनी लगावला.