Aurangabad : सहकार मंत्र्यांच्या घरासमोर शिवप्रेमींनी केले आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंदोलन

Aurangabad : सहकार मंत्र्यांच्या घरासमोर शिवप्रेमींनी केले आंदोलन

औरंगाबाद : राज्यपालांच्या विरोधात असलेला सर्वसामान्यांमधील राग अजूनही शांत झालेला नाही. औरंगाबादेत रविवारी (ता.४) शिवप्रेमींच्या वतीने राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव अशा घोषणा देत सहकार मंत्री अतुल सावे यांच्या ज्योतीनगर परिसरातील घरासमोर ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या अवमानाचा तीव्र निषेध करण्यासाठी शेकडो शिवप्रेमींनी या आंदोलनात सहभाग घेतला.

‘राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव’ आंदोलनांतर्गत सर्वपक्षीय नेत्यांच्या घरासमोर ढोल वाजवून निषेध आंदोलनाचा निर्णय शनिवारी मराठा संघटना व शिवप्रेमींच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार रविवारी सकाळी मंत्री सावे यांच्या घरासमोर हे आंदोलन करण्यात आले. मराठी अस्मितेचा अवमान करणाऱ्या महाराष्ट्र द्वेषी राज्यपालांची तत्काळ हकालपट्टी करावी, अशी जोरदार मागणी शिवप्रेमींनी यावेळी केली. तसेच राज्याच्या मंत्रिमंडळात असूनही अतुल सावे यांनी राज्यपालांचा स्पष्ट आणि थेट निषेध केला नाही, याबद्दल तीव्र नाराजी शिवप्रेमींनी व्यक्त केली.

छत्रपती शिवरायांचा अवमान महाराष्ट्र कुठल्याही परिस्थितीत सहन करणार नाही, असा इशारा मंत्री सावे यांच्या घरासमोर आंदोलन करून देण्यात आला. शिवभक्तांच्या भावना वरिष्ठ पातळीवर पोहोचवण्यात येतील, असे आश्वासन मंत्री सावे यांनी दिले.

यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे विनोद पाटील, अभिजित देशमुख, बाळासाहेब थोरात, जगन्नाथ काळे, चंद्रकांत भराट, सुनील कोटकर, सुकन्या भोसले, बाळासाहेब औताडे, रवींद्र काळे, रेखा वहाटुळे, सचिन पिसाळ, शैलेश भिसे, ज्ञानेश्वर शेळके, अशोक मोरे यांच्यासह शिवप्रेमी सहभागी झाले होते.