
औरंगाबाद : 'जिल्हा कृषी कार्यालयाचे' गोडाऊन आगीत खाक
औरंगाबाद : शहानूरमिया दर्गा परिसरातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय परिसरात गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या आगीत परिसरातील गोदाम भस्मसात झाले. ही आग नेमकी कशी लागली. याचे कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. तर शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
दर्गा परिसरातील जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या परिसरातील गोदामाला सकाळी अचानक आग लागली. सुरुवातीला किरकोळ आग लागल्याचे दिसत असतानाच अचानक आगीचे लोळ पसरले. काही क्षणातच संपूर्ण गोदामाला आगीने कवेत घेतले. कर्मचाऱ्यांनी आगीची माहिती अग्निशमन दलाला दिल्यानंतर शहरातील तीन बंब काही मिनिटात घटनास्थळी दाखल झाले.
पाण्याचा प्रचंड मारा करत तीन तास अग्निशमन दलाच्या जवानांनी झुंज दिली. मुख्य अग्निशमन अधिकारी आर. के. सुरे, डी. डी. साळुंखे, विजय राठोड, विनायक लिमकर, कृष्णा होळंबे, रामू बामणे, रवी हरणे आदींनी आगीवर नियंत्रण मिळविण्यास मदत केली. ही आग कशी लागली या बाबत अस्पष्टता असून, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या आगीत जुनी कागदपत्रे आणि काही साहित्य जळाल्याचे कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी सांगितले.