औरंगाबाद : पाणीप्रश्‍नावर भाजप-मनसे युती! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad BJP MNS alliance on water issue

औरंगाबाद : पाणीप्रश्‍नावर भाजप-मनसे युती!

औरंगाबाद : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजप-मनसे युती होणार का? याविषयी चर्चा सुरू असतानाच शहरातील पाणी प्रश्‍नावरून हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. सिडको-हडकोतील भाजपच्या माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी सिडको एन-७ येथील पाण्याच्या टाकीसमोर शुक्रवारपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात मनसेचे पदाधिकारीदेखील सहभागी झाले आहेत.

सिडको-हडको भागात अद्याप पाणी पुरवठा सुरळीत न झाल्याने शुक्रवारी भाजप, मनसेतर्फे पदाधिकाऱ्यांनी सकाळी १०.३० वाजेपासून ठिय्या आंदोलन केले. यावेळी पाणी द्या पाणी द्या, हल्लाबोल हल्लाबोल, महापालिका प्रशासकांचे करायचे काय...अशा घोषणा देण्यात आल्या. रात्री उशिरापर्यंत आंदोलन सुरु होते. यावेळी महापालिका अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन समजूत घातली पण आंदोलक ठाम होते.

आंदोलनात भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय केणेकर, मनसे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर, माजी जिल्हाध्यक्ष बस्वराज मंगरूळे, माजी नगरसेवक शिवाजी दांडगे, नितीन चित्ते, महेश माळवदकर, राजगौरव वानखेडे, सरचिटणीस समीर राजूरकर, सतीश खेळकर, विकास पाटील, सोहन प्रधान, चंदु नवपुते, गणेश साळुंके, अविनाश फोकळे, अनिकेत निलावर, सागर पाटील, भदाने पाटील, राजू शेजवळ, मंदा शेजवळ, माधुरी अदवंत, सरीत घोरपडे, पुजा सोनवणे, अभय देशमुख, राहुल बोधनकर, मुकेश जैन सहभागी झाले होते. हे आंदोलन राजकीय नसून, जनतेचे आंदोलन असल्याचे सुमीत खांबेकर यांनी सांगितले.

पाणी मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन

भाजप व मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरु केले आहे. जो पर्यंत स्वच्छ आणि वेळेवर पाणी मिळत नाही तो पर्यंत आंदोलन सुरु राहील, अशा इशारा भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी यावेळी दिला.

अधिकारी आयुक्तांची करतात दिशाभूल

पाण्यासाठी आम्ही एप्रिल महिन्यात आंदोलन केले होते. त्यानंतर प्रशासकांनी बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी पंधरा दिवसात सिडको-हडकोतील पाणी सुरळीत करू, असे आश्‍वासन दिले. परंतु पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही. आठव्या-नव्या दिवशी, पाणी मिळत आहे. अधिकारी आयुक्तांची दिशाभूल करत आहेत, असा आरोप माजी नगरसेवक नितीन चित्ते यांनी केला.

Web Title: Aurangabad Bjp Mns Alliance On Water Issue Cidco Office Bearers Movement

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top