esakal | साहित्यिक संजय नवले यांचे निधन, विद्यापीठाच्या हिंदी विभागात होते कार्यरत
sakal

बोलून बातमी शोधा

साहित्यिक संजय नवले यांचे निधन, विद्यापीठाच्या हिंदी विभागात होते कार्यरत

साहित्यिक संजय नवले यांचे निधन, विद्यापीठाच्या हिंदी विभागात होते कार्यरत

sakal_logo
By
- अतुल पाटील

औरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील हिंदी विभागातील प्राध्यापक, हिंदीतील साहित्यिक, ज्येष्ठ लेखक डॉ.संजय माणिकराव नवले यांचे गुरुवारी (ता.१५) पहाटे उपचार सुरु असतांना निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर आजारी असल्यामुळे ‘एम्स‘रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. 'कोविड'मधून बरे झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा होत असतानाच गुरुवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. मुळचे चोराखळी (ता.कळंब, जि.उस्मानाबाद) येथील रहिवाशी असलेले डॉ.संजय नवले हे सध्या औरंगाबादेत आदर्शनगर येथे स्थायिक झाले होते.

गेल्या ३० वर्षांपासून ते अध्यापन क्षेत्रात कार्यरत होते. विद्यापीठाच्या युवक महोत्सव सल्लागार समितीचे सदस्य, महात्मा गांधी अध्यासन केंद्राचे संचालक म्हणून ते कार्यरत होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात विद्यार्थी कल्याण संचालक म्हणून त्यांनी कार्य केले. डॉ.नवले यांनी ४६ ग्रंथांचे लेखन संपादन केले आहे. हिंदीत १९, मराठीत १३ पुस्तकांचे लेखन तर १४ पुस्तकांचे संपादन त्यांनी केले. तसेच शंभराहून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. विशेषत: दलित आत्मकथन तसेच फुले-शाहु-डॉ.आंबेडकर विचाराच्या साहित्याचे ते कृतीशील अभ्यासक होते. डॉ.नवले यांच्या पार्थिवावर त्यांच्या गावी गुरुवारी (ता.१५) सायंकाळी ६ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी नीता, मुलगी असा परिवार आहे.

उद्या शोकसभा : दरम्यान डॉ.संजय नवले यांना विद्यापीठाच्यावतीने श्रध्दांजली अर्पण करण्यात येणार आहे. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता ऑनलाईन शोकसभा होईल. प्राध्यापक व संबिधातानी यात सहभागी व्हावे, असे कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी यांनी कळविले आहे.