
औरंगाबाद : तीन किमी 'बर्निंग बस' चा थरार
वैजापूर : बसच्या मागच्या चाकाला आग लागल्याचे चालकाच्या लक्षातच न आल्याने सुमारे ३ किमी अंतरापर्यंत धावणाऱ्या बसचा दोन तरुणांनी दुचाकीवर फिल्मी स्टाइल पाठलाग करून बस चालकाला आगीची माहिती दिली. यानंतर चालकाने बस थेट वॉशिंग सेंटरवर नेऊन तिच्यावर पाणी मारल्याने मोठा अनर्थ टळला. रविवारी दुपारच्या सुमारास शहराजवळील रोटेगाव पुलाजवळ ही घटना घडली. वेळीच तरुणांच्या ही आग लक्षात आल्याने एसटीतील ३० प्रवासी बालंबाल बचावले.
याबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबादहून वाशिमकडे जाणारी (एम.एच-४० वाय-५६६१) बस दुपारी दोन वाजेच्या सुमारास औरंगाबाद- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून वैजापुरकडे येत होती. खंडाळा बस स्थानकावर प्रवासी उतरल्यानंतर बस पुढे निघाली. याच दरम्यान, बसच्या पाठी मागून मोठा धूर निघत असल्याचे दुचाकीवर असलेल्या सचिन साखला व माजेद शेख यांच्या लक्षात आले.
मात्र, बघता-बघता बसच्या पाठीमागील साईडने आगीने रौद्ररूप धारण केले. पण बसची गती अधिक असल्याने दुचाकीवर असलेल्या तरुणांना बसच्या पुढे जात येत नव्हते. यावेळी या दोघां मित्रांनी जिवाची पर्वा न करता ९० च्या गतीने दुचाकी पळवून तब्बल ३ किमी पर्यंत पाठलाग करून शहरा जवळ असलेल्या रोटेगाव पुलाजवळ बसला ओव्हरटेक करून बसला आग लागल्याची माहिती दिली.
यानंतर चालकाने बस थांबविली. त्वरित माजेद व सचिन यांनी बसमधील २५ ते ३० प्रवाशांना खाली उतरविले. यानंतर जळत असलेल्या बसला जवळच असलेल्या वॉशिंग सेंटरवर नेऊन बसवर पाण्याच्या फवारे मारण्यात आले. यामुळे आग आटोक्यात आली. घटनेनंतर बस वैजापूर डेपोत जमा करण्यात आली आहे. यावेळी घटनेची माहिती मिळताच बिट जमादार मोइज बेग घटनास्थळी येऊन मदत केली.
Web Title: Aurangabad Bus Back Wheel Fire Accident Passenger Rescued
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..