
Aurangabad Crime News : अखेर हिंमत करून पोलिसांत धाव घेतल्याने गुन्हा दाखल
औरंगाबाद : तो कधी पत्नीला उठाबश्या काढायला लावायचा, तर कधी स्वतःचे पाय धुऊन पाणी प्यायला लावायचा! एक दिवस गंभीर मारहाण केल्याने पतीचा तीन महिन्यांचा गर्भपातही झाला. हा सर्व प्रकार तीन वर्षे सहन केल्यानंतर अखेर हिमतीने विवाहितेने पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली. त्यानंतर पतीसह छळ करणाऱ्या सासू-सासरा, दीर, तीन नंदा यांच्याविरोधात छावणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार ३० सप्टेंबर २०१९ ते ३० मार्च २०२२ दरम्यान एकतानगर सोसायटी, नंदनवन कॉलनीत घडत होता.
पती अन्वर शफीयोद्दीन सय्यद, सासू रेहाना बेगम शफीयोद्दीन सय्यद, दीर एजाज सय्यद (रा. तिघेही प्लॉट क्र. पाच, एकतानगर सोयायटी, नंदनवन कॉलनी), नणंद समीना अनिस शेख, नंदोई अनिस शेख (रा. दोघेही बारी कॉलनी), नणंद तहमीना असीफ बेग (रा. पडेगाव), शबाना इम्रान शेख (रा. चिनार गार्डन, पडेगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी ३० वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा विवाह ६ मार्च २०१९ रोजी अन्वरसोबत झाला होता. सुरवातीला चांगले वागविले, नंतर तिला सासरच्या मंडळींनी त्रास देण्यास सुरवात केली. अनेक दिवस जाच सहन केला, तरीही सासरच्या मंडळींमध्ये फरक पडला नाही. नऊ मे रोजी तिने महिला तक्रार केंद्रात अर्ज दाखल केल्याने परंतु विवाहिता ही देवगाव रंगारी येथे माहेरी राहत असल्याने ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयात वर्ग करण्यात आला होता.
पीडितेला झालेल्या त्रासाबद्दल पोलिसांचेही मन हेलावले. पीडितेला सासरच्या मंडळींनी शिळे अन्न खायला देण्यापासून गंभीर छळ करण्यास सुरवात केली. यासंदर्भात दोन्हीकडच्या मंडळींची बैठक झाल्यानंतर विवाहिता सासरी राहू लागली. त्यानंतर अवघ्या काही दिवसांत पहिले पाढे पंचावन्न झाले. मेडिकल टाकण्यासाठी त्यांनी माहेरहून ३० लाख रुपये घेऊन ये म्हणत छळ केला. इतकेच नव्हे तर पती नेहमी छळ करून सर्वांसमोर कधी उठाबश्या काढायला लावायचा तर कधी त्याचे पाय धुऊन पाणी प्यायला भाग पाडायचा. माहेरच्या मंडळींनी बैठक घेतल्यापासून आजउद्या सर्व सुरळीत होईल या आशेवर विवाहिता गर्भवती असतानाही हा प्रकार निमूट सहन करायची.
दरम्यान एक दिवस पतीने भांडण करून तिला मारहाण केली अन् पोटात लाथ घातली. त्यात विवाहितेचा गर्भपात झाला. ३० मार्च २०२२ रोजी पतीसह सासरच्या मंडळींनी अंगावरील सर्व दागिने, राणीहार, शर्ट पोत, इअररिंग, ग्लसर, नेकलेस असे सहा तोळे दागिने काढून घेतले अन् घराबाहेर हाकलले. विशेष म्हणजे या प्रकारात विवाहितेची कोणालाही दया आली नाही, उलट सर्वांनी एका आड एक असे मारहाण केली. अखेर सहन न झाल्याने माहेरी गेली आणि देवगाव रंगारी पोलिस ठाण्यात सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल केला. परंतु घटना शहरात घडल्याने सदर गुन्हा छावणी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक सचिन डाके करत आहेत.