esakal | रेमडेसिविर इंजेक्शनची चोरी, भांडार प्रमुखांसह चौघांवर गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

रेमडेसिविर इंजेक्शनची चोरी, भांडार प्रमुखांसह चौघांवर गुन्हा दाखल

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद : रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजार होत असून चढ्या दराने विक्रीचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. महापालिकेच्या भांडार विभागातून तब्बल ४६ रेमडीसिविर इंजेक्शन चोरीला गेल्याचे असेच प्रकरण समोर आले. या प्रकरणात अखेर महापालिकेच्या आरोग्य विभागात कार्यरत संशयितांविरोधात जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी दिली. औषध निर्माण अधिकारी तथा भांडारप्रमुख विष्णु दगडू रगडे, सहायक औषध निर्माण अधिकारी (कंत्राटी) प्रणाली कोल्हे या दोघांसह अज्ञांताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २० ते २३ एप्रिल दरम्यान हा प्रकार झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचा: मराठवाड्यात कोरोना रुग्णसंख्येत काहीशी घट, ६ हजार ३१५ नवे बाधित

या प्रकरणात वैद्यकिय अधिकारी बाळकृष्ण राठोडकर (५२) हे महापालिकेत औषधी भांडार नियंत्रक पदावर आहेत. महापालिकेच्या जुना मोंढ्यात औषधी भांडार आहे. भांडार कक्षातून काही औषधींचा पुरवठा मेल्ट्रॉन कोविड सेंटरला करण्यात आला होता. या ठिकाणी औषध निर्माण अधिकारी संतोष कापूरे आणि पुजा कुलकर्णी यांनी भांडार गृहातून आलेल्या औषधांची तपासणी केली. या तपासणीत एक बॉक्समध्ये रेमडीसिविरचे ४८ इंजेक्शन ऐवजी एमपीएसचे ७५ इंजेक्शन आढळून आले. या प्रकरणी महापालिका आयुक्तांनी संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजाविली होती. मात्र त्यांच्याकडून अपेक्षित उत्तरे मिळाली नाहीत. या प्रकरणी बॉक्समध्ये रेमडीसिविरच्या ४८ इंजेक्शनच्या ऐवजी ७५ वेगळी इंजेक्शन टाकून संबंधितांनी अपहार करून शासनाची फसवणूक केली. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक साईनाथ गिते करित आहेत.

loading image
go to top