Aurangabad Crime News | आधार देणाऱ्यानेच घोटला गळा; खून करुन मृतदेहाची विल्हेवाट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

murder

आधार देणाऱ्यानेच घोटला गळा; खून करुन मृतदेहाची विल्हेवाट

औरंगाबाद : पैसे चोरल्याचा संशय घेत अठरा वर्षीय युवकाचा बुधवारी (ता.९) रात्री बेदम मारहाण करीत खून करण्यात आला. त्यानंतर पहाटे मृतदेह स्कूटीवरुन नेत कचऱ्यात फेकण्यात आला. ही धक्कादायक घटना गुरुवारी (ता.१०) सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली. मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना गारखेडा परिसरातील कारगिल मैदानाजवळ मृतदेह आढळला. अश्पाक ऊर्फ मुक्या अब्दुल शेख (१८) असे मृत युवकाचे नाव आहे.

या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून सीसीटीव्ही फुटेजमध्ये संबंधित स्कूटी आल्याने खुनाचा उलगडा झाला आहे. शेख मुबारक ऊर्फ बाबा शेख हैदर (३८, रा. आनंदनगर, शिवाजीनगर रस्ता) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. यासंदर्भात पोलिस उपायुक्त दीपक गिऱ्हे यांनी सांगितले, की अश्पाकचे आई-वडील विभक्त राहतात. अश्पाक हा मागील सहा वर्षांपासून संशयित आरोपी शेख मुबारक ऊर्फ बाबाकडे काम करत होता. दरम्यान, अश्पाक पैसे चोरतो, असा संशय बाबाला होता.

निपचित पडलेल्या अश्पाकने सोडले प्राण

बुधवारी (ता. नऊ) दिवसभरात तब्बल तीनवेळा बाबाने अश्पाकला पैसे चोरल्याच्या कारणावरून लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. रात्री मारहाण करताना त्याच्या डोक्यात जबर फटका बसला आणि अश्पाक निपचित पडला. त्याच अवस्थेत सोडून बाबा निघून गेला व इकडे अश्पाकने जीव सोडला. गुरुवारी पहाटे जेव्हा बाबा अश्पाकला झोपेतून उठविण्यासाठी आला तेव्हा अश्पाकची हालचाल बंद होती. तो नाटक करतोय, असे समजून बाबाने त्याच्या अंगावर पाणी टाकले. त्यानंतरही अश्पाकने हालचाल केली नाही. तेव्हा बाबाने त्याचा श्वास सुरु आहे का, हे तपासले. तेव्हा अश्पाकचा मृत्यू झाल्याचे त्याच्या लक्षात आले.

स्कूटीवर नेला मृतदेह

मृत अश्पाकला बाबाने स्कुटीवर नेऊन कारगिल मैदानाजवळच्या कचऱ्यात फेकले. गुरुवारी (ता.१०) सकाळी सात वाजता मृतदेह आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली. उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहायक आयुक्त विशाल ढुमे, गुन्हे शाखा निरीक्षक अविनाश आघाव, पुंडलिकनगरचे निरीक्षक गांगुर्डे, सहायक निरीक्षक शेषराव खटाने आदींनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता, त्यात बाबाची स्कुटी आढळल्याने प्रकरणाला वाचा फुटली अन् खुनाचा उलगडा झाला.

Web Title: Aurangabad Crime News Murder Person Dead Body Corpse

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top