Aurangabad : ऐन दिवाळीत घडल्या दोन खुनाच्या घटना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Aurangabad : ऐन दिवाळीत घडल्या दोन खुनाच्या घटना

औरंगाबाद : काही दिवसांपूर्वीच गोदामातून लाखो रुपयांचा माल चोरी झाल्याच्या घटनेनंतर पुन्हा त्याच ठिकाणी चोरी करण्यासाठी गेलेल्या चौघांनी सुरक्षारक्षकाचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार समोर आला. ही घटना बुधवारी मध्यरात्री दोन वाजतानंतर मोंढा नाका परिसरातील बालाजी इंटरप्राईजेस येथे घडली.

याप्रकरणी चौघा संशयितांविरोधात क्रांती चौक पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पाशा मुघल (वय ७२) असे मृत सुरक्षारक्षकाचे नाव आहे. तर दुसरी खुनाची घटना मिटमिटा परिसरात घडली आहे.

याप्रकरणी मृत पाशा यांचा मुलगा कैसर पाशा मुघल (३४, रा. मोंढा नाका) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे वडील पाशा हे मोंढा नाका भागातील बालाजी इंटरप्राईजेसच्या बिडी, सिगारेट गोदामात सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होते. २६ ऑक्टोबरच्या रात्री दोन वाजतानंतर चौघे संशयित चोरीसाठी सदर गोदामात आले असता, मुघल यांनी चोरांना हटकले असावे, त्यामुळे चोरांनी पाशा मुघल यांचे हात पाय बांधले, त्यांच्या तोंडाला नाकाला मफलर आवळून खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

तसेच चोरांनी तब्बल तीन लाख ४४ हजार रुपयांचा बिडी, सिगारेट आदी ऐवज चोरून नेला. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात चौघा संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच क्रांती चौक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनेनंतर पोलिसांचे एक पथक औरंगाबाद ग्रामीणमध्ये चोरटे, मारेकऱ्यांच्या तपासासाठी रवाना झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. पुढील तपास उपनिरीक्षक राजेंद्र होळकर करत आहेत.

दुसऱ्या घटनेत औरंगाबाद शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील मिटमिटा येथे सिद्धू कारभारी सेनबडे (घोणसी खुर्द) जालना या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्याची डोक्यात लाकडाने मारहाण करून हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक माहिती समोर आली.