औरंगाबाद : शिवसेनेची नव्याने बांधणी

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा निर्धार
Shiv Sena leader Chandrakant Khaire
Shiv Sena leader Chandrakant Khaire

औरंगाबाद : ‘‘एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाला मराठवाड्यातून पाठबळ मिळाले. जिल्ह्यातील शिवसेनेचे पाच आमदार त्यांच्यासोबत गेले. असे असले तरी आजवरचा इतिहास आहे की, शिवसेनेशी गद्दारी करणारे पुन्हा निवडून येत नाहीत. मराठवाड्यात शिवसेनेची आम्ही नव्याने बांधणी करणार आहोत,’’ असा निर्धार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला.

शिवसेना नेते व पदाधिकाऱ्यांची शनिवारी मुंबईत बैठक पार पडली. यात शिवसेनेची नव्याने बांधणी करून पक्ष मजबूत करण्याचा निर्धार करण्यात आला. या बैठकीनंतर श्री. खैरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यापुढे मराठवाड्यातून बंडखोरांना साथ मिळणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, ‘‘मी मराठवाड्यात शिवसेनेची नव्याने मजबूत बांधणी करण्यासाठी कंबर कसली आहे. यापुढे पक्षात बंडखोरी होणार नाही, मराठवाड्यातील एकही शिवसैनिक बंडखोरांसोबत जाणार नाही, ही जबाबदारी मी स्वीकारली आहे.

शिवसैनिक आणि सामान्य लोकांमध्ये बंडखोरांबद्दल संताप, चीड आहे. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांचे काय होते, याची अनेक उदाहरणे आहेत. गद्दार पुन्हा निवडून येत नाहीत. शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. शिवसेनेला येणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये विजय मिळवून भगवा फडकवायचा आहे, तो आम्ही निश्चितच फडकवू.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली आहे. कारवाईचा निर्णय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत झाला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. पण, त्यानंतर पक्षप्रमुख म्हणून पक्षविरोधी काम केल्याबद्दल कारवाईदेखील केली’’, असेही श्री. खैरे यांनी स्पष्ट केले.

कोणीही शिवसेना सोडून जाणार नाही

मराठवाड्यातून शिवसेना कोणीही सोडणार नाही. मराठवाड्यातील सर्व शिवसैनिक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. काही खासदार शिवसेना सोडून जाणार असल्याच्या अफवा आहेत. त्यात काहीही तथ्य नाही. मराठवाड्यात शिवसेना मजबूत आहे. शिवसेना प्रमुखांच्या काळातही अशा अफवा पसरवल्या जात होत्या. मात्र, तेव्हाही शिवसेना सोडून कोणीही गेलेले नाही आणि आताही जाणार नाही असा विश्वास श्री. खैरे यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com