Aurangabad : प्रेयसीचे हट्ट पुरविण्यासाठी चोरल्या दुचाकी

गुन्हे शाखेने घेतले ताब्यात, एमआयडीसी वाळूज
Police
Policesakal

औरंगाबाद : तिघा चोरट्या ‘प्रेमवीरा’नी एका ॲपच्या माध्यमातून ओळखी होऊन प्रेमात रूपांतर झालेल्या ‘प्रेयसीचे’चे हट्ट पुरविण्यासाठी दारू पिऊन नऊ लाख रुपयांच्या ११ दुचाकी चोरल्याचा ‘प्रताप’ उघडकीस आला आहे. अखेर गुन्हे शाखेच्या पथकाने त्रिकुटांना ३० नोव्हेंबर रोजी वाळूज भागातून बेड्या ठोकल्या. त्यामुळे मात्र तात्पुरते त्रिकुटांचे प्रेम काही केल्या टिकले नाही. तिघा आरोपींना गुन्हे शाखेने एमआयडीसी वाळूज पोलिसांच्या हवाली केले आहे.

नारायण रामराव भंडारे (२१), कृष्णा ज्ञानोबा होळकर (२४), अर्जुन मधुकर वाकळे (२४, रा. तिघेही राजणगांव शेणपूजी) अशी तिघा प्रेमवीर आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी सांगितले की, मद्यपान करून तिघे चोरटे दुचाकी चोरत असल्याची माहिती मिळाली होती. पथकाचे उपनिरीक्षक गजानन सोनटक्के यांनी ओॲसिस चौक परिसरातून नारायण भंडारे यास पकडले. तर उर्वरित दोघे कृष्णा आणि अर्जुन हे दोघे राहत्या घरी सापडले. त्यांची चौकशी केली असता प्रेयसींचे हट्ट पुरविण्यासाठी शहरातील घाटी दवाखाना, पैठण गेट, एमआयडीसी वाळूज परिसरातून अनेक दुचाकी खरेदी करून विक्री केल्याचे तसेच काही दुचाकी राहत्या घरी ठेवल्याचे सांगितले.

पोलिसांनी घर गाठत तब्बल आठ लाख ९० हजार रुपयांच्या ११ चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. चोरीच्या दुचाकींसंदर्भातील गुन्हे अभिलेख तपासला असता, सदर दुचाकी एमआयडीसी वाळूज, बेगमपुरा, क्रांती चौक, लिमगाव नांदेड पोलिस ठाण्याच्या दाखल गुन्हे उघडकीस आले. तिन्ही प्रेमवीर आरोपींना एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. कारवाई निरीक्षक आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गजानन सोनटक्के, विठ्ठल जवखेडे, दत्तात्रेय गडेकर, ज्ञानेश्वर पवार, परभत म्हस्के, संदीप बीडकर, विजय भानुसे, नितीन देशमुख, तात्याराव शिनगारे, अजय चौधरी, संदीप पाटील यांच्या पथकाने केली.

‘शेअर चॅट’ ॲपवरुन ओळख

तिन्ही आरोपी हे मुळचे हिंगोली जिह्यातील वेगवेगळ्या गावातील रहिवासी आहेत. कुटुंबीयांसोबत ते रांजणगाव शेणपूंजी भागात राहतात. तिघेही २४ तास सोबत राहून मद्यप्राशन करून तर्रर्र वाळूज औद्योगिक वसाहतीत परिसरात फिरत असत. चोरीच्या दुचाकी विक्री करून पैसे आल्यानंतर मौजमजा करून त्यात उडवत असत. दरम्यान तिघांनाही ‘शेअर चॅट’ या ॲपद्वारे काही मुलींच्या ओळखी झाल्या. मुलीही पैशाला भाळून मोबाईल क्रमांक देवघेव होऊन भेटीगाठी झाल्या. विशेष म्हणजे ओळखीचे प्रेमात रूपांतर होण्यासाठी ‘खर्च’ करावा लागतो म्हणून आरोपींनी दुचाकी चोरण्याचा सपाटाच लावला होता.

‘मास्टर की’नेच करायचे काम तमाम

तिघा आरोपींनी वर्षभरात एकदाही हॅन्डल लॉकची तोडफोड करून दुचाकी चोरली नाही. तर ‘मास्टर की’ घेऊन ते चार पाच दुचाकींना लावून दुचाकी सुरु झाली की पळवीत असत. सर्व दुचाकी अशाच चोरल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली. त्यामुळे दुचाकी पार्क करताना ‘हॅन्डल लॉक’ सोबतच दुसरे मेटल लॉकसारखे लॉकही लावण्याचे आवाहन उपनिरीक्षक गजानन सोनटक्के यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com