दिवाळीच्या धामधुमीत पावसाचा धुमाकूळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Heavy rains

दिवाळीच्या धामधुमीत पावसाचा धुमाकूळ

औरंगाबाद : दिवाळीच्या तयारीची धामधूम सुरू असताना पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. दिवसभर ढगाळ वातावरणाने झाकोळलेल्या औरंगाबादेत शहरात सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे बाजारपेठांतील गर्दीची तारांबळ उडाली. बीड जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांपासून पावसाचा कहर सुरू असून आजही तो कायम होता. मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाचा मुक्काम आहे. औरंगाबाद शहरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते.

दुपारी काहीकाळ हे वातावरण निवळले. पण सायंकाळी सहानंतर पुन्हा आभाळ दाटले आणि कानठळ्या बसविणाऱ्या विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात सुमारे तासभर मुसळधार कोसळला. शहरात सव्वासहा ते सव्वासातपर्यंत २३.६ मिलिमिटर नोंद झाली.

वीज पडून शेतकरी ठार

बीड : बीज जिल्ह्याला गत पंधरा दिवसांपासून परतीचा पाऊस झोडपून काढत आहे. आजही काही भागात तो झाला. अनेक भागांत अतिवृष्टीची नोंद आहे. शिरूर कासार तालुक्यातील रायमोह परिसरात ढगफुटी सदृश पाऊस कोसळला. याच तालुक्यातील दगडवाडी शिवारात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाला. रावसाहेब जायभाये (वय ५५) असे त्यांचे नाव आहे. ते शेतात जनावरे चारत होते. त्यावेळी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला.

रावसाहेब जायभाये यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती तलाठी विलास रसाळ यांनी दिली.दरम्यान, पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही येथे वीज पडून शेतकरी जखमी झाला. त्याच्या दोन शेळ्या दगावल्या. पावसामुळे सोयाबीन, कपाशी, बाजरी, मका आदी पिकांचे नुकसान झाल्याचे शेतकरी हवालदिल आहेत.

वीज पडून आठ शेळ्या दगावल्या

उमरगा : तालुक्यातील कोराळ येथे आज दुपारी वीज पडून आठ शेळ्या दगावल्या. शेतकरी हरिदास लाळे आणि बिभीषण लाळे यांच्या या शेळ्या चरत होत्या. पाऊस सुरू झाल्याने शेळ्या झाडाखाली थांबलेल्या असताना वीज कोसळली.

पशुवैद्यकीय अधिकारी आणि महसूल अधिकाऱ्यांनी पंचनामा केल्याची माहिती दाळिंब सज्जाचे तलाठी गजेंद्र पाटील यांनी दिली. दरम्यान सुपतगाव शिवारात गुंडू करके यांच्या मालकीची म्हैस वीज पडून दगावली.