Aurangabad : पोलिसाच्या मदतीने सराफानेच सराफाला २१ लाखांना लुटले! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 अटक

Aurangabad : पोलिसाच्या मदतीने सराफानेच सराफाला २१ लाखांना लुटले!

औरंगाबाद : शेंद्र्यातील सराफाने जळगावच्या सराफाला डिझाइन दाखविण्याच्या बहाण्याने बोलावले. नंतर चक्क पोलिसाच्या मदतीने तब्बल २४ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोख आठ लाख ४० हजार असा तब्‍बल २० लाख ७५ हजार ५३७ रुपयांचा ऐवज लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

रामचंद्र दत्तात्रय दहिवाळ (४२, रा. साईबाबा मंदिरासमोर हिरापूर, घर क्र.पाच) असे त्या सराफाचे आणि संतोष तेजराव वाघ (३५, रा. महाल सोसायटी, फ्लॅट क्र.१०५, साई मंदिरासमोर, चिकलठाणा) असे संशयित आरोपी पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. दोघांना एमआयडीसी सिडको पोलिसांनी अटक केली. आरोपींच्या ताब्यातून दागिने आणि रोकड साडेआठ लाखांपैकी अडीच लाख रुपये जप्त केल्याची माहिती निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी

दिली. याप्रकरणी अशोक विसपुते (५३, रा. पिंप्राळा, जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे जळगावात ज्वेलर्स दुकान आहे. चार महिन्यांपूर्वी त्यांचा आरोपी रामचंद्र दहिवाळसोबत फोनवरून परिचय झाला होता. दहिवाळचे शेंद्रा येथे भवानी ज्वेलर्स नावाने दुकान असून ते नेहमी विसपुतेंच्या संपर्कात असत. १२ सप्टेंबररोजी दहिवाळने विसपुतेंना फोन करून ‘मला मालाची गरज असून तुमच्या डिझाइन दाखवा’ असे म्हणाल्याने व्यापारी विसपुते हे नगरमार्गे कारने (एमएच १९, डीव्ही ६३३६) चालक दिनेश वाव्हळसह औरंगाबादेत आले.

व्यवहार फिसकटला अन्...

व्यापारी विसपुतेंनी दहिवाळला त्याच्या दुकानात दागिन्यांच्या डिझाइन दाखविल्यानंतर आरोपीने दहिवाळ यांना ‘मला डिझाइन आवडल्या, हे सोने मी ठेवून घेतो अन् तुम्हाला चेक देतो’ म्हणाला. त्यावर विसपुतेंनी नगदी रुपये द्या, नाहीतर उद्या आरटीजीएस करा, मी उद्या सोने पाठवून देतो असे म्हणून दुकानाबाहेर पडले. त्यावेळेस रात्रीचे दहा वाजले होते. शेंद्राहून केंब्रिज चौकात आल्यानंतर विसपुतेंच्या कारच्या मागून एक कार (एमएच २०, एडब्ल्यू २१४४) आली अन् त्याने थांबविण्याचा इशारा केला. कारमधून एक पोलिस संतोष वाघ उतरला, त्याने ‘मुख्यमंत्र्यांचा दौरा सुरू आहे, दौरा म्हणजे काय कळते का? तुम्ही कोण आहात असे म्हणत कारची तीन वेळेस झडती घेतली. दोघांनाही मोबाइल बंद करण्यास सांगितले. त्यावर व्यापारी विसपुते यांना आधीच हृदयविकाराचा आजार असल्याने ते पुरते घाबरून गेले होते. कारमध्ये दागिने, रोकड सापडल्यानंतर तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल करतो म्हणत आरोपी वाघ याने १२ लाख ३५ हजार ५३७ हजारांचे दागिने आणि रोख ८ लाख ४० हजार रुपये असा २० लाख ७५ हजार ५३७ रुपयांचा ऐवज घेऊन गेला, दरम्यान विसपुतेंनाही जायला सांगितले. त्यावेळी विसपुतेंची अचानक तब्येत बिघडल्याने त्यांनी नातेवाइकाला बोलावून घेतले, त्यांच्याकडे थांबून ते पुन्हा आपल्या गावी गेले. तब्येत ठीक झाल्यानंतर त्यांनी एमआयडीसी सिडको पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली. पुढील तपास उपनिरीक्षक अर्जुन राऊत करत आहेत.

तब्येत विचारताच घटना उघडकीस

विशेष म्हणजे व्यापारी विसपुतेंना लुटणारा पोलिसाची वर्दी घातलेला माणूस हा संतोष वाघ असल्याचे विसपुतेंना माहीत नव्हते. मात्र, पैसे, दागिने घेऊन जाताना अचानक विसपुतेंची तब्येत खालावल्याचे वाघ याने पाहिले होते. नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे १३ सप्टेंबर रोजी सकाळी आरोपी व्यापारी रामचंद्र दहिवाळ याने फिर्यादी विसपुतेंना फोन करून तब्येतीविषयी विचारणा केली, त्याचवेळेस विसपुतेंना आपल्याला याच व्यापाऱ्याच्या माध्यमातून लुटले गेल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर गुन्हा दाखल होताच पोलिसांनी पोलिस कर्मचारी वाघ याला बेड्या ठोकल्या. न्यायालयाने दोन्ही आरोपींना १८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सुनावणीदरम्यान सरकारी वकील एस. एल. दास यांनी पोलिसांची बाजू मांडली.

Web Title: Aurangabad Help The Police Sarafa Robbed Sarafa

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..